बोरकरांनी पाठवलेल्या ई-मेलनंतर आरजीपी-सीईसीकडून तारीख आणि वेळ निश्चित
रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) आमदार वीरेश बोरकर यांनी पक्षाच्या कोअर समितीसोबत बैठक घेण्याची तयारी दर्शविली असून, बैठकीची तारीख व वेळ एक दिवस अगोदर आपणास कळविण्याची विनंती आरजीपीचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रातून केली होती. यानंतर पक्षाच्या सीईसी समितीने शनिवार दि. 30 मे रोजी संध्याकाळी 6.30 वाजता पक्ष कार्यालयात बैठक निश्चित केली आहे. दरम्यान, आरजीपी-सीईसी समितीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधील अंतर्गत चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्या चॅटवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आरजीपी-साईसी समिती गेल्या दोन महिन्यांपासून आमदार वीरेश बोरकर यांच्याशी पक्षातील अंतर्गत वादाबाबत चर्चा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मागील 4 सीईसी समितीच्या बैठकांना बोरकर यांनी हजेरी लावली नव्हती. त्यामुळे पक्षांतर्गत वादावर चर्चा होऊ शकली नव्हती. आता, बोरकर यांनी ई-मेल पाठवून चर्चेची तयारी दर्शविली आहे.
वीरेश बोरकर यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीची तारीख व वेळ निश्चित करून त्यांना आगाऊ माहिती दिली जाणार आहे. आमदार वीरेश बोरकर यांच्याशी मडगाव येथील बैठक व इतर विषयावर चर्चा केली जाणार आहे, असे खजिनदार अजय खोलकर यांनी सांगितले.
आरजीपी-साईसी समितीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधील चॅट सोशल मीडियावर व्हायरल प्रकरण ही अंतर्गत बाब आहे. याबाबत सीईसी बैठकीत चर्चा केल्यानंतर स्पष्टीकरण दिले जाणार आहे, अशी माहिती खजिनदार अजय खोलकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
आरजीपी-सीईसी समितीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पक्षांतर्गत वादावरील चर्चेचे चॅट व्हायरल झाले आहेत. त्यात आमदार वीरेश बोरकर यांच्यावर टीका करण्यात आली आहे.