आयुष्य ः एक गोळी औषधाची

0
9

क्षणचित्रं… प्राणचित्रं…

  • प्रा. रमेश सप्रे

काळाच्या ओघात विश्वातील, या जगतातील असंख्य कण एकत्र येऊन बनतात वस्तू, वास्तू, व्यक्ती, वनस्पती, सर्वकाही… याला जोड मिळते प्राणाची म्हणजेच चैतन्याची. मानवाच्या बाबतीत मनशक्तीचीसुद्धा. या सर्वांच्या संयोगातून साकारतं जीवन नि जीवनातील असंख्य प्रसंग. हीच असतात- प्राणचित्रं….

‘कानून’ पन्नास वर्षांपूर्वीचा एक गाजलेला रहस्यपट. त्यातला एक फार महत्त्वाचा नसलेला पण कायम लक्षात राहणारा प्रसंग. औषधांचं दुकान. अनेक गिऱ्हाइकं वेगवेगळ्या औषधांच्या गोळ्या मागायला येतात. काहीसा कंटाळलेला दुकानदार म्हणतो ते आपल्याला अंतर्मुख बनवते- ‘उठने के लिए गोली, सोने के लिए गोली; भूख लगने के लिए गोली, खाना हजम होने के लिए गोली, सबके लिए गोली… गोली! जिंदगी का नाम बदलकर गोली रखना जाहिए।’
खरेच, आज बहुसंख्य लोक ‘पिल्‌‍पॉपर्स’ (गोळ्या गिळणारे) बनले आहेत. आजी-आजोबाच नव्हेत तर आई-बाबासुद्धा असा गोळीबार स्वतःवर नियमितपणे करत असतात. कधी असह्य झालं तर म्हणतात, ‘आता एक बंदुकीची गोळीच मारावी!’ असो.

आपलं जीवन हे तीन प्रमुख घटकांनी गुंफलेलं एक वस्त्र असतं- क्षण, कण नि प्राण. क्षणांच्या म्हणजे काळाच्या ओघात विश्वातील, या जगतातील असंख्य कण एकत्र येऊन बनतात वस्तू, वास्तू, व्यक्ती, वनस्पती, सर्वकाही… याला जोड मिळते प्राणाची म्हणजेच चैतन्याची. मानवाच्या बाबतीत मनशक्तीचीसुद्धा. या सर्वांच्या संयोगातून साकारतं जीवन नि जीवनातील असंख्य प्रसंग. हीच असतात- प्राणचित्रं. अशा प्राणचित्रांची साखळी म्हणजे आपलं नि अवतीभवतीचं विविधतेनं नटलेलं जीवन.

अशा जीवनाचा आजकाल अभिन्न भाग बनलाय औषधं. विविध आकाराच्या, रंगांच्या गोळ्या. आठवतो तो ‘आनंद’ चित्रपटातील हृद्य प्रसंग. एक ध्येयवादी डॉक्टर नि त्याचा रसिकतेनं जीवन जगणारा मित्र. एकदा डॉक्टरकडे एक श्रीमंत महिला रुग्ण येते. शरीरातील सर्व अवयवांतील निरनिराळ्या प्रकारच्या वेदनांविषयी, व्याधींविषयी तक्रार करते. तिला तपासल्यासारखं करून डॉक्टर तिच्यासमोर सप्तरंगी गोळ्यांचं जणू इंद्रधनुष्य सादर करतो नि सांगतो- ‘या तांबड्या गोळ्या रविवारी घ्यायच्या, या पिवळ्या घ्यायच्या सोमवारी, या निळ्या मंगळवारी, या हिरव्या बुधवारी…’ अशा प्रकारे सात गोळ्यांचा सप्तरंगी वर्णपट संपूर्ण सप्ताहासाठी त्या महिलेला देतो नि पुढच्या आठवड्यात यायला सांगतो. जवळच बसलेला सदैव आनंदी (सदानंदी) मित्र विचारतो, ‘ही गोळ्यांची रंगपंचमी खरंच आवश्यक आहे?’ यावर डॉक्टर हसत म्हणतो, ‘अर्थातच नाही. पण श्रीमंत रुग्णांना काहीही होत नसलं तरी आपल्याला बरंच काही होतंय असं त्यांना सतत वाटत राहतं. याला आमच्या भाषेत म्हणतात हायपोकाँड्रिया. एकप्रकारचा आभासी मानस विकार.’ नंतर डोळे मिचकावत डॉक्टर म्हणतो, ‘पण अशा रुग्णांकडून मिळणाऱ्या पैशावरच इतर गरीब रोग्यांवर मोफत उपचार करता येतात ना! प्रत्यक्षात त्या रंगीबेरंगी गोळ्या टॉनिकच्या होत्या.’ आहे किनई गंमत! आयुष्य ही गोळीच नाही का?

एका कार्यक्षम नोकराचा एक खुमासदार किस्सा सांगितला जातो. त्याच्याकडे महत्त्वाचं काम असतं आपल्या मालकाला वेळच्या वेळी औषधं देण्याचं. एकदा खूप श्रम झाल्यामुळे मालकाला गाढ झोप लागते. झोपेतून त्याला उठवताना तो नोकर म्हणतो, ‘धनी, उठा उठा, आता झोपेची गोळी घ्यायची वेळ झालीय.’ आता काय म्हणाल याला?

संस्कृतमध्ये एक अप्रतिम अर्थपूर्ण सुभाषित आहे-
अमंत्रमक्षरं नास्ति, नास्ति मूलं अनौषधम्‌‍। अयोग्यः पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः॥
अर्थ सोपा आहे. असं कोणतंही अक्षर नाही ज्यात मंत्राचं सामर्थ्य नाही. असं कोणतंही झाडाचं मूळ नाही ज्यात औषधी गुणधर्म नाहीत अन्‌‍ अशी एकही व्यक्ती नाही जी सर्वार्थानं अयोग्य, निरुपयोगी आहे. गरज असते ती कल्पक (योजक) माणसाची. पालक, शिक्षक, नेतेमंडळी अशी ‘योजक’ असतील तर तिथं चैतन्याचं नंदनवन निर्माण झाल्याखेरीज राहणार नाही. बघा विचार करून.

‘नलदमयंती’ प्रसंगात प्रियकर पती नल याचा वियोग, विरह असह्य झालेल्या दमयंतीला अनेक औषधं देण्याचा प्रयत्न केल्यावर ती आपल्या सखींना म्हणते- ‘औषध ‘न लगे’ मजला, औषध ‘नल गे’ मजला.’ मला नल हेच औषध हवंय, दुसरं कोणतंही औषध चालणार नाही (न लगे). विरहाग्नी शांत करायला कोणती गोळी देणार? (आज अशा अशांत मनासाठीही गोळ्या देतात हा भाग निराळा!) असो.

एक पंचाऐंशी वयाचे खुटखटीत आजोबा म्हणत असत, ‘विज्ञानानं जर संशोधन करून प्रत्येक व्याधीवर गोळ्या बनवल्यायत तर त्या का नाही घ्यायच्या? या वयातही मी मस्त तंदुरुस्त आहे, याचं कारण म्हणजे मी रोज घेत असलेल्या ॲलोपथी- होमिओपथी- आयुर्वेद सर्वांच्या एकवीस गोळ्या!’ वाह क्या बात है!

हा प्रसंग शंभराहून अधिक वर्षांपूर्वीचा. पू. गोंदवलेकर महाराजांना दम्याचा (अस्थमा) विकार होता. एकदा त्यावेळचे प्रसिद्ध डॉ. भाटवडेकर त्यांना म्हणाले, ‘आमच्या वैद्यकीय शास्त्रानं दम्यावर प्रभावी गोळ्या तयार केल्यायत.’ यावर पू. महाराजांनी विचारलं, ‘डॉ. साहेब तुम्ही फक्त विविध जडीबुटी, रसायने यातील औषधी गुण ‘शोधून’ त्यानुसार औषधे बनवलीत; पण त्या जडीबुटीत नि रसायनात मुळात ते गुणधर्म कोणी निर्माण केले?’ यावर डॉक्टर मान हलवत उद्गारले, ‘खरंच, विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही.’

डॉ. सिग्मंड फ्रॉइड याला मनोविश्लेषणशास्त्राचा (सायकोॲनालिसिसचा) जनक समजलं जातं. तो अगदी मृत्युशय्येवर असताना एक भारतीय डॉक्टर त्याला भेटायला गेला. तो भारतीय आहे हे कळल्यावर फ्रॉइड त्याही अवस्थेत त्याला म्हणाला, ‘तू महर्षी पतंजलींच्या देशातून इकडे कशाला आलास? तुझे पाय गंगा नदीच्या किनाऱ्यावर घट्ट, स्थिर करायचे सोडून या लंडनच्या थेम्स नदीच्या काठावर थरथरत्या पायांनी का उभा आहेस? अरे, आम्ही रोगी मनांना बरं करण्यासाठी गोळ्या देण्याचा प्रयत्न करतो. पण तुमचा पतंजली मनाला रोगी न होण्याचे उपाय सुचवतो.’ खरंच, आयुष्याचं एक औषधाची गोळी नव्हे, एकामागून एक अनेक गोळ्या हे स्वरूप बदलायचं असेल तर निरोगी आहार-विहार-विचार-उच्चार असलेली जीवनशैली आवश्यक आहे. तसा संकल्प करूया. नाहीतर आहेच ‘जिंदगी- एक गोली!’