आयुष्यातली अपूर्व घटना ः गोवा मुक्ती
भाग-12

0
18
  • गो. रा. ढवळीकर

मला मात्र मुक्त गोवा पाहाण्याची खूप उत्कंठा लागून राहिली होती. केव्हा एकदा गोव्याला जातो असे झाले होते. कॉलेजला दांडी मारून कसे जायचे? परंतु मन सारखे उचंबळून येत होते. अखेर मनाने निर्णय केला की गोव्याला जायचेच!

माझे कॉलेज शिक्षण सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात झाले. बी.एसस्सी.च्या शेवटच्या वर्षी घडलेली महत्त्वाची घटना म्हणजे गोवा मुक्ती. भारत स्वतंत्र होऊन 13-14 वर्षे उलटली तरी गोवा मुक्त झाला नव्हता. परराष्ट्रांशी असलेले प्रश्न शांततेच्या मार्गानेच सोडवण्याच्या पं. नेहरूंच्या धोरणामुळे भारताला स्वातंत्र्य मिळूनही गोव्याची जनता मात्र पोर्तुगिजांच्या दडपशाहीखाली भरडली जात होती. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गोव्यातील स्वातंत्र्यसैनिक हिंसक व अहिंसक अशा दोन्ही मार्गांनी चळवळ करीत होते. पोर्तुगीज सरकार अतिशय क्रूरपणे ती दडपण्याचा प्रयत्न करीत होते. मारझोड व हालअपेष्टा सोसत अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. तरीही भारत सरकार उदासीनच होते. पं. नेहरूंवर देशभरातून मोठ्या प्रमाणावर टीका होत होती. त्यावेळी श्री. व्ही. के. कृष्ण मेनन नेहरू मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री होते. त्यांनी नेहरूंना सैनिकी कारवाई करण्यास भाग पाडले असे त्यावेळी बोलले जात होते.

1961 सालचा डिसेंबर उजाडला आणि गोव्यावरील सैनिकी कारवाईच्या बातम्या पसरू लागल्या. अमेरिका व युरोपीय देश पोर्तुगालच्या बाजूने असल्याने तिकडून भारताला विरोध होऊ लागला. इजिप्त व युगोस्लाविया या राष्ट्रांचा पाठिंबा होता आणि रशिया तर भक्कमपणे भारताच्या पाठीशी उभा होता. कारवाईचा निर्णय झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर सैन्याच्या हालचाली सुरू झाल्या. रेल्वे गाड्या भरभरून सैन्य सीमेकडे रवाना होऊ लागले. सांगलीहून मिरज जवळ असल्याने मोठ्या प्रमाणावर होत असलेली सैन्याची, लष्करी साहित्याची वाहतूक आम्ही पाहत होतो. बेळगाव शहराला मोठ्या लष्करी तळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. हवाई हल्ल्यांसाठी बेळगावचा सांब्रा विमानतळ वापरला जाणार होता. तिथे भारतीय विमाने हल्ल्यासाठी सज्ज ठेवण्यात आली होती. संपूर्ण लष्करी कारवाईचे नेतृत्व भारतीय लष्करात असलेले जनरल के. पी. कँडेथ करणार होते. सुमारे चाळीस हजारांची फौज घेऊन ते गोव्यावर चढाई करण्यास निघाले होते. वास्तविक गोवा जिंकण्यासाठी एवढ्या मोठ्या सैन्याची गरज नव्हती. कारण पोर्तुगिजांकडे फारसे सैन्य नव्हते. जे सैन्य होते त्याची भीतीने गाळण उडाली होती व आपले प्राण कसे वाचवायचे हीच चिंता प्रत्येकाला लागून राहिली होती. गोव्याच्या उत्तर, दक्षिण व पूर्व या तिन्ही दिशांनी भारतीय सैनिक पूर्ण तयारीनिशी खडे होते. नाविक दलाने पश्चिमेकडून समुद्र मार्ग बंद केला होता. पोर्तुगिजांची अल्बुकर्क नावाची एकच युद्धनौका मुरगाव बंदरात उभी होती. 18 डिसेंबर उजाडला आणि गोव्याच्या तिन्ही बाजूंनी भारतीय पायदळाने चढाई केली. पायदळाला विमानदलाने आवश्यक साथ दिली. मूळ गोव्याचे व भारतीय हवाई दलात असलेले कॅ. पिंटो यांच्याकडे हवाई कारवाईची सूत्रे होती. सकाळी सकाळीच त्यांना कारवाईचा हुकूम मिळाला. अजून त्यांनी चहा-नाश्ताही घेतला नव्हता. त्यांनी विमान बाहेर काढले व अर्ध्या तासात नाश्ता घेण्यासाठी येतो असे सांगून गोव्यावर उड्डाण केले. त्यांनी सर्वप्रथम मुरगाव बंदरात असलेल्या अल्बुकर्क या बोटीवर बॉम्ब टाकून ती निकाली करून टाकली. नंतर ते आल्तिनोच्या दिशेने गेले व अचूकपणे बॉम्ब टाकून आकाशवाणी केंद्र उद्ध्वस्त केले, संदेश यंत्रणा उखडून टाकली. त्यांनी केलेली कारवाई एवढी अचूक होती की तिचा त्रास नागरिकांना मुळीच झाला नाही.

भारतीय सैन्य एवढ्या मोठ्या संख्येने, ताकदीनिशी व वेगाने गोव्यात घुसले की पोर्तुगीज सैन्य लढण्याऐवजी धूम पळत सुटले. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पळून जाताना त्यांनी बोरी, बाणस्तरी, खांडेपार नदीवरील मोठे पूल तसेच छोटे-मोठे साकव उडवून भारतीय सैन्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय सैन्याने झटपट तरंगते पूल उभारून अडचणीवर मात केली व सैन्याची आगेकूच चालूच ठेवली. दि. 19 रोजी भारतीय सैन्य राजधानी पणजीत दाखल झाले. गोव्याचे गव्हर्नर जनरल, सैन्याधिकारी व वास्को येथे पळून जाण्यासाठी आलेले अडीच-तीन हजार सैनिक शरण आले व दि. 19 रोजीच पणजीच्या सचिवालयावर भारताचा तिरंगा फडकला.
संपूर्ण गोव्यात आनंदोत्सव सुरू झाला. लोकांनी फटाके वाजवून व मिठाई वाटून आनंद साजरा केला. मिरवणुका, प्रभातफेऱ्या काढल्या. भारतमातेच्या जयजयकाराच्या घोषणांनी संपूर्ण गोवा दणाणून सोडला. लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. शहरातच नव्हे तर खेडोपाडी, जिकडे-तिकडे भारतीय सैनिक दिसत होते व रस्त्यांवरून त्यांच्याच गाड्या दिसत होत्या. घरीदारी, रस्त्यांवर सगळीकडे गोवा मुक्तीची चर्चा लोक करीत होते. भारतीय सैन्य चोहोबाजूंनी गोव्यात कसे घुसले व त्याचा धसका घेतलेले पोर्तुगीज सैनिक जीव वाचवण्याकरिता कसे धावत-पळत सुटले हाच चर्चेचा विषय सगळ्यांच्या तोंडी होता. एकाच दिवसात गोवा मुक्त करण्याच्या पराक्रमाबद्दल भारतीय सैन्याला लोक धन्यवाद देत होते. पोर्तुगिजांनी संघर्ष केलाच नसल्याने जीवितहानी फारशी झाली नाही व नागरिकांनाही फारसा त्रास झाला नाही. उलट सगळीकडे नागरिकांमध्ये उत्साह व आनंद ओसंडून वाहत होता. आम्ही काही गोवेकर विद्यार्थी मात्र या आनंदाला पारखे झालो होतो. मला मात्र मुक्त गोवा पाहाण्याची खूप उत्कंठा लागून राहिली होती. केव्हा एकदा गोव्याला जातो असे झाले होते. कॉलेजला दांडी मारून कसे जायचे? परंतु मन सारखे उचंबळून येत होते. अखेर मनाने निर्णय केला की गोव्याला जायचेच!

गोव्याला जायचे ठरवले परंतु गोव्यात अद्याप लोकांचे जाणे-येणे सुरू झाले नव्हते. गोव्याची सीमा लष्कराच्या ताब्यात होती व त्यांची परवानगी मिळाल्याशिवाय लोकांना सीमेवरच्या प्रदेशात जाता येत नव्हते. गोवा मुक्त होऊन फक्त दोनच दिवस उलटून गेले होते. गोव्यातील रस्तेही लष्कराच्या देखरेखीखाली होते व प्रवासी वाहतूक अजून सुरू व्हायची होती. रस्ते उखडलेले होते आणि पूल उद्ध्वस्त झालेले होते. परंतु कशाचाही विचार न करता मी व माझा मित्र श्री. जगन्नाथ पेठकर गोव्याला यायला निघालो. सांगलीहून आम्ही सावंतवाडीला आलो. सावंतवाडीला त्या दिवशी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत बांदा गाठले. तिथून पुढे सर्व प्रदेश लष्कराच्या ताब्यात होता. पुढे जाण्यास वाहन मिळणे शक्य नसल्याने बांदा ते दोडामार्ग हे 25-30 कि.मी.चे अंतर आम्ही पायी पार केले. वाटेत सैनिकी चौक्या होत्या व येणाऱ्या-जाणाऱ्यांची चौकशीही केली जात होती. ‘आम्ही गोवेकर आहोत व आमच्या घरी जाण्यास निघालो आहोत’ हे सांगितल्य्ाानंतर त्यांनी आम्हाला पुढे जाऊ दिले. चालत चालत आम्ही दोडामार्गला पोचेपर्यंत आम्हाला संध्याकाळचे सहा-सव्वासहा वाजले. डिसेंबर महिन्यात दिवस लहान असल्याने अंधार पसरू लागला होता. तिथून सरहद्द दोन कि.मी.वर होती व ती ओलांडल्यावर नायङ्ीण (वाठादेवजवळ) या गावात माझ्या आत्याचे घर होते व रात्र झाली तरी तिथपर्यंत जायचेच असा निर्धार करून आम्ही सरहद्दीच्या दिशेने निघालो.

माझा मित्र श्री. जगन्नाथ पेठकर (पुढे गायक व संगीत शिक्षक झाला) हा डिचोलीचा असल्याने त्याला चोरवाटांची माहिती होती. तो व त्याचे कुटुंबीय त्या वाटांचा भारतीय प्रदेशात जाण्यासाठी वारंवार उपयोग करीत असत. आम्ही हद्दीच्या दिशेने एक किलोमीटर अंतर पार केले असेल, आमच्या कानावर गस्तीवरील सैनिकांच्या शिटीचा आवाज पडला. आम्ही तिथेच थांबलो. तेवढ्यात चार सैनिक आमच्यासमोर ठाकले. “किधर जा रहे हो? कौन हो तुम?” असे त्यांनी दरडावून विचारले. “आम्ही गोवेकर आहोत व आम्हाला आमच्या घरी जायचे आहे.” आमचे तेच उत्तर. “लेकिन आप आगे नहीं जा सकते। बॉर्डर बंद है।” आता काय करायचे? आमच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले. थंडीचा अंमल वाढत होता व पोटात कावळे ओरडत होते. मागे फिरणे शक्य नव्हते. आम्ही तसेच पुढे जायचा आग्रह त्या गस्तीवाल्या सैनिकांकडे धरला. तेव्हा ते म्हणाले की, पुढे जाणे शक्य नाही. अजूनही काही ठिकाणी गोळाबारी सुरू असल्याने सीमा पार करणे शक्य नाही. ते आम्हाला जीपमध्ये बसवून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे घेऊन गेले.

त्या अधिकाऱ्याने आमची चांगलीच हजेरी घेतली. तो म्हणाली की अद्याप परिस्थिती पूर्ण सुधारलेली नाही. गोळीबाराच्या घटना, बॉम्बस्फोटाच्या घटना होतच आहेत. कारवाई सुरू करून आताच दोन दिवस उलटले आहेत. तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालीत आहात. एवढी घाई का केलीत? त्यांच्या प्रश्नांना आमच्याकडे उत्तरे नव्हती. स्वतंत्र गोवा पाहाण्याच्या ओढीने आम्ही मागचा-पुढचा विचार न करता बाहेर पडलो होतो. आम्ही त्यांना एवढेच सांगितले, “हद्दीला लागूनच दोन किलोमीटर अंतरावर आमचे घर आहे. तिकडे जाण्यास आम्ही अधीर झालो आहोत. पण आता आम्ही काय करावे? कुठे जावे?”
त्यावर त्या अधिकाऱ्याने त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना हुकूम दिला की आमची रात्रीची सर्व व्यवस्था करावी. त्याप्रमाणे त्यांनी आमची रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था केली. त्यांनी आमच्यासाठी गरमागरम चपाती-भाजी आणली, जिची चव आजही जिभेवर आहे. आमच्याकडे अंथरुण-पांघरुण काहीच नव्हते व बाहेर थंडी तर कडाक्याची होती. आम्हाला कुडकुडताना पाहून त्यांनी आम्हाला वूलनची ब्लँकेट्स आणून दिली व गरम पाणी पण दिले. त्यांनी आमची पाहण्यासारखी केलेली सरबराई कधीच विसरणे शक्य नाही. आम्ही शांतपणे झोपी गेलो.
एका शिपायाने आम्हाला पहाटे उठवले व त्याने आम्हाला आपल्याबरोबर चलण्यास सांगितले. तो आम्हाला कुठे घेऊन चाललाय याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. काही अंतर चालून गेल्यावर त्याने सांगितले, “ये है गोवा की सरहद्द। अब आप उसपार जा सकते है!”
पेठकरला हद्द कुटून पार करायची हे माहीत होते. तोपर्यंत उजाडले होते व आसपासचा परिसर साफ दिसू लागला होता. आम्ही भीतभीतच घाईघाईने हद्द पार करून नायङ्‌ीणीला सकाळी आत्याकडे पोचलो. आम्हाला एवढ्या सकाळी पाहून माझी आत्या व आमचे भावोजी श्री. सदुभाऊ खेडेकर आश्चर्यचकित झाले. त्यांना सर्व हकीकत सांगितली व त्यांच्याकडून सैनिकी कारवाईच्या हकिकती ऐकल्या. त्यांच्याकडचा पाहुणचार घेऊन दुपारपर्यंत आम्ही डिचोलीला आलो. रस्त्यांवर भारतीय सैनिक फिरताना दिसत होते. घरांवर, कार्यालयांवर तिरंगी ध्वज पाहून ऊर अभिमानाने भरून आला. डिचोलीहून संध्याकाळपर्यंत कसाबसा मिळेल त्या वाहनाने मी मडगावला आमच्या बिऱ्हाडी आलो. मडगावमध्ये खूप आनंदाचे, उत्साहाचे वातावरण होते. परंतु काही घरांमध्ये सुतकी वातावरणही होते असे जाणवले. पोर्तुगीज राजवट संपल्याचे काही लोकांना दुःख वाटत होते. मुक्त गोमंतकात सुमारे आठ दिवस मुक्तपणे संचार करून भरपूर आनंद मिळवला. पणजीच्या पलाशीवर (सेक्रेटरिएटवर) तिरंगा फडकताना पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले. अशा प्रकारे आठ दिवस आनंदात घालवून मी सांगलीला परतलो व परत अभ्यासात गुंतून गेलो.