Home आयुष आयुर्वेदीय प्रथमोपचार

आयुर्वेदीय प्रथमोपचार

0
  • डॉ. मनाली महेश पवार

आयुर्वेदात तातडीची उपाययोजना नाही, आयुर्वेदीय उपचारांचा गुण फार सावकाश येतो, आयुर्वेदात तातडीचा विचार नाही असा चुकीचा समज जनसामान्यांमध्ये आहे. शास्त्रात तातडीचे उपचार प्रभावी आणि लगेच गुण देणारेही आहेत. मात्र गंभीर आजार, तीव्र वेदना किंवा दीर्घकालीन त्रास असल्यास वैद्यांचा सल्ला घ्यावा.

मानवी जीवन प्रगत होत आहे; पण या प्रगतीसह स्वास्थ्यासंबंधी नवनवीन आव्हानेही समोर येत आहेत. पूर्वीच्या काळी मूल खेळता-खेळता पडलं तर तिथलीच माती घेतली आणि लावली घावाला असं व्हायचं किंवा ओवाळून टाकली की काय आश्चर्य, मूल खरंच रडायचं थांबायचं हो! आज मूल खेळतही नाही, पडतही नाही व तशी मातीही नाही. तसेच काम करता-करता (स्वयंपाकात) कापलं तर लगेच हळद भरली जायची. आज जखमेवर हळद लावून डॉक्टरांकडं गेल्यास प्रथम डॉक्टर ओरडतो की हळद का लावलीस? मग उपचाराला सुरुवात होते. आता प्रथमोपचाराचे स्वरूप बदलले आहे आणि दुखणीही बदलली आहेत. आताची दुखणी म्हणजे आकस्मिक दुखणी- हार्टॲटॅक, मेंदूत रक्तस्राव, अर्धांगवात, फीट, मूतखड्याचं दुखणं, तीव्र ताप, खोकला वगैरे. अशा विविध आजारांमध्ये, दुखण्यांमध्ये तातडीच्या औषधोपचारांची गरजही लागते व पुढेही लागणार.

आजपर्यंत तातडीची वैद्यकीय सेवा म्हणजे ॲलोपॅथिक इमर्जन्सी ट्रिटमेंटच अशी समजूत सर्वांची आहे. इमर्जन्सीमध्ये ग्लुकोज चढवणे, इंजेक्शन देणे असे उपचार केले जातात व हे उपचार जनतेची गरजही भागवतात हे तितकेच खरे! पण यांसारख्या तातडीच्या उपचारांना हॉस्पिटलच हवे, कारण या उपचारांनादेखील मर्यादा आहेत.
आयुर्वेदात तातडीची उपाययोजना नाही, आयुर्वेदीय उपचारांचा गुण फार सावकाश येतो, आयुर्वेदात तातडीचा विचार नाही असा चुकीचा समज जनसामान्यांमध्ये आहे. शास्त्रात तातडीचे उपचार प्रभावी आणि लगेच गुण देणारेही आहेत. उदा. ताप आल्यावर इंजेक्शन देऊन ताप उतरायला जेवढा वेळ लागतो, तेवढाच वेळ आयुर्वेदीय औषधोपचारामध्ये लागतो. फरक एवढाच आहे की पेशंटला आत्मविश्वास द्यायला वैद्यच कमी पडतो.
आयुर्वेदीय ग्रंथात आशुकारी आत्यायिक अवस्था, काष्टसाध्य अवस्था, रोगाच्या प्राथमिक अवस्थेतील उपचार, धोकादायक लक्षणे व त्याकरिता उपचार असा विविध अंगांनी, विविध ठिकाणी विचार केलेला आढळतो. त्याचप्रमाणे औषधी द्रव्याचे गुणधर्म सांगताना द्रव्यांचे आशुकारी कार्य सांगितलेले आहे. विशेषतः विष-उपविषे, कर्पूर वर्गातील द्रवे, सुगंधी द्रव्ये यांना तात्काळ काम करण्याचे गुणधर्म सांगितलेले आहेत.
आजच्या आधुनिक काळात प्रत्येक घरात प्राथमिक औषधपेटी असते. परंतु हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांकडे अशी औषधे नव्हती. त्यांनी निसर्गातील वनस्पती, खनिजे आणि आहार या तत्त्वांचा उपयोग करून आरोग्य राखले राखले होते.

आयुर्वेदीय तातडीच्या उपचारांचा विचार करता रोगांच्या मूळ कारणांचा विचार थोडा बाजूला ठेवून, रोगांच्या प्रमुख लक्षणांचाच विचार डोळ्यांसमोर हवा. उदा. उलट्या, जुलाब होऊ लागल्यावर ते थांबवणे, रक्तक्षय किंवा निर्जलीकरण होऊ न देणे याला फार महत्त्व आहे.
आयुर्वेद शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्यावर भर देते. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वात, पित्त आणि कफ या तीन दोषांवर आधारित असते. या दोषांचा समतोल बिघडल्यास रोग उद्भवतात आणि समतोल राखला तर आरोग्य टिकते. प्रथमोपचाराच्या पातळीवरही हेच तत्त्व लागू होते.

  • वातविकार झपाट्याने येणारे-जाणारे, खात्री-भरोसा देता येणार नाही असे, आपले रंगरूप वारंवार बदलणारे गतिमान व गतिविद्ध्वंसक असे असतात.
  • पित्तामुळे होणारे विकार तीव्र, एकदम झटपट. येथे रोगाचे स्वरूप बघता-बघता रौद्ररूप धारण करते.
  • या दोघांच्या उलट कफविकार आहे. कफविकार कळत-नकळत सावकाश, मंद वेगाने व फार तीव्र वेदना न देता हळूहळू वाढत असतात. या कफ स्वरूपाच्या विकारांसाठी नेहमी तातडीची गरज भासते असे नाही. पण वातकफ, पित्तकफ असा संबंध असल्यास तातडीच्या उपाययोजनेसंबंधी विचार व्हायला हवा.

सामान्य आयुर्वेदीय प्रथमोपचार
प्रत्येकाने आयुर्वेदीय प्रथमोपचार पेटी- फर्स्ट एड बॉक्स- घरी तयार करायला हरकत नाही. पण वाचकांनी आपली लक्ष्मणरेषा ओळखावी. जोपर्यंत वैद्यकीय मदत येत नाही, तोपर्यंत तात्पुरता वापर करावा, मग तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा.

  • अजीर्ण, पोटदुखी, करपट ढेकर, पोट डब्ब होणे- शंखवटी, हिंग्वाष्टकचूर्ण.
  • मळमळणे- शंखवटी.
  • ॲसिडिटी, जळजळ- लघुसूतशेखर, प्रवाळपंचामृत.
  • विटाळ जास्त जाणे- कामदुधा, त्रिफळाचूर्ण.
  • अंगदुखी- ज्वरांकुश, टाकणखारलाही, महानारायण तेल.
  • चक्कर येणे- चंद्रकला, लघुसूतशेखर.
  • हातापायांची आग- कामदुधा, शतधौत घृत.
  • अपचन- आले, लिंबू रस व थोडे मीठ, तसेच त्रिफळा, हिंग-पाण्याचा लेप पोटावर लावावा व ओवा चावून खावा.
  • मासिकपाळीदरम्यान वेदना- गोक्षुरादी गुग्गुळ, लघुसूतशेखर.
  • त्वचाविकार, खाज, खवडे- एलादी तेल, करंजतेल + कापूर.
  • अंग जखडणे, सूज- गोक्षुरादी गुग्गुळ, आरोग्यवर्धिनी, तुरटी-वेखंड.
  • चिकट संडास, जेवणानंतर मलप्रवृत्ती, कळ येऊन पोट दुखणे- आरोग्यवर्धिनी, त्रिफळा चूर्ण.
  • रक्ती आव- कुटजवटी, कामदुधा.
  • आवाज बसणे- एलादी वटी
  • उचकी- मयूरपिच्छमशी, प्रवाळपंचामृत.
  • उन्हाळी लागणे- गोक्षुरादी गुग्गुळ, धण्याचा फाण्ट, साळीच्या लाह्या, रसायनचूर्ण.
  • उसण भरणे, पाठदुखी, मान अवघडणे, कंबरदुखी- सिंहनाद गुग्गुळ, महानारायण तेल, तोप गोळी.
  • थंडीताप, फ्लू- त्रिभुवन कीर्ती, ज्वरांकुश.
  • कानदुखी- आरोग्यवर्धिनी, महानारायण तेल.
  • केसतूड- आरोग्यवर्धिनी, एरंडतेल, शनधौत घृत.
  • क्रॉनिक किडनी विकार- गोक्षुरादी गुग्गुळ, चंद्रप्रभा, रसायनचूर्ण, साळीच्या लाह्या.
  • खूप घाम फुटणे, घाम येऊन थकवा- कामदुधा, मौक्तिक भस्म.
  • कोरडा खोकला- खदिरादिवटी, एलादिवटी, गुळण्या.
  • गिळण्यास त्रास- कामदुधा.
  • घसा खवखवणे- एलादिवटी, गुळण्या.
  • छातीत दुखणे- महानारायण तेलाचा हलका मसाज.
  • जखम- आरोग्यवर्धिनी, एलादी तेल, शनधौत घृत, टाकणखार पोटीस.
  • जुलाब, हगवण- कुटज वटी, संजीवनी वटी.
  • झोप न येणे- शनधौत धृत कानशिले, कपाळ, तळहात, तळपायांना चोळणे.
  • डोकेदुखी- लघुसूतशेखर, त्रिफळा चूर्ण.
  • डोळे येणे- कामदुधा, बोरिक पावडरच्या पाण्याने धुणे.
  • गोवर-कांजिण्या- दशांगलेप.
  • तोंड येणे- कामदुधा, इरिमेदादी तेल.
  • दमा, धाप- दमागोळी, ज्वरांकुश.
  • दात दुखणे- कामदुधा, त्रिफळाचूर्ण, इरिमेदादी तेल.
  • धुपणी, श्वेतप्रदर- चंद्रपक्षा, कामदुधा.
  • सर्दी पडसे- ज्वरांकुश, महानारायण तेल नस्य, शतधौत घृत.
  • पोटदुखी केव्हाही, गॉलब्लडर स्टोन- शंखवटी, लघुसूतशेखर.
  • भाजणे- कामदुधा, सर्जरसमलम.
  • मलावरोध- त्रिफळा चूर्ण, गंधर्वहरितकी, बस्ती.
  • मूतखडा, लघवी कोंडणे- सूर्यक्षार, गोक्षुरादी गुग्गुळ, रसायनचूर्ण.
  • मूत्रप्रवृत्ती नियंत्रण नसणे- चंद्रप्रभा.
  • मुरगळणे- लेपगोळी, तुरटी लेप, महानारायण तेल.
    हे उपाय फक्त प्राथमिक उपचार म्हणून करावेत. गंभीर आजार, तीव्र वेदना किंवा दीर्घकालीन त्रास असल्यास वैद्यांचा सल्ला घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, म्हणून कोणतेही औषध दीर्घकाळ स्वतःहून घेऊ नये.