आयुर्वेदिक संकल्पनेनुसार आचारण व्हावे

0
478
  •  डॉ. मनाली म. पवार

आरोग्याची व्याख्या करताना जागतिक आरोग्य संघटनेने १९४८ मध्ये म्हटलेले आहे की ‘केवळ आजार किंवा अपंगत्वाचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर चांगले आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुस्थिती होय’.

‘निरामय आरोग्य’ हे जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य जरी असले तरी हे ‘आरोग्यरक्षण’ यावर्षी आयुर्वेदिक संकल्पनेनुसार आचरण करून आरोग्यसंपन्न व्हावे, असा संकल्प करण्याबाबत विचार करण्यास काय हरकत आहे?

शुक्र धातुचे वर्धन व रक्षण हेही आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. शरीराचे परम, उत्कृष्ट तेज म्हणजे शुक्र धातू. हे शुक्र म्हणजे आहाररसाचे सारस्वरूप असल्याने मनावर संयम ठेवून प्रत्येकाने त्याचे रक्षण करावे. शुक्ररक्षणानेच शरीर सुंदर, निरोगी होते व संपन्न संततीचा लाभ होतो.

७ एप्रिल हा दिवस सर्वत्र ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना ही युनोची एक विशेष शाखा आहे. ७ एप्रिल १९४८ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेमध्ये जगातील जवळजवळ १९२ देशांचा सहभाग आहे. लोकांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे जास्तीत जास्त लक्ष पुरवणे हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरील उपाय यावरच मर्यादित नसून त्यामध्ये मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याचाही विचार केला आहे.

७ एप्रिल हा संघटनेचा स्थापना दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी एक विषय निवडला जातो. त्या संदर्भात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चर्चा, परिसंवाद, पथनाट्य, फिल्म्स, प्रसारमाध्यमे आदिंमार्फत त्या विषयाबाबत लोकांत जागृती निर्माण केली जाते. यापूर्वी पोलिओ, क्षयरोग, एच.आय.व्ही.-एड्‌स, बर्ड-फ्ल्यू, लेप्रसी, डिप्रेशन, मधुमेह आदी विषयांवर जनजागृती या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने होते आहे. एखाद्या विषयाचे किंवा एखाद्या आरोग्य समस्येचे प्रबोधन संपूर्ण वर्षभर केले जाते. हेच या दिवसाचे वैशिष्ट्य होय.
आरोग्याची व्याख्या करताना जागतिक आरोग्य संघटनेने १९४८ मध्ये म्हटलेले आहे की ‘केवळ आजार किंवा अपंगत्वाचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर चांगले आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुस्थिती होय’. या व्याख्येत प्रकृतीचे इतर पैलूदेखील समाविष्ट केलेले आहेत. म्हणजे शरीररचनात्मक, शरीरक्रियात्मक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक व अध्यात्मिक. प्रकृतीच्या बिघाडाची सुरुवात कोणत्याही एका घटकापासून झाली असली तरी त्या विकाराचा परिणाम इतर घटकांवरही पडतो. एकाच घटकामधील जरी दोष वाढत असले तरी आरोग्य एकाच घटकापुरते मर्यादित नसते. शरीराच्या रचनेचा शरीराच्या क्रियांवर परिणाम होतो. बिघडलेल्या शारीरिक क्रिया मनाला अस्वस्थ, बेचैन करतात. दुभंगलेले मन, मनाची एकाग्रता घालवून बुद्धीचे कार्य बिघडवते. अकार्यक्षम बुद्धीकडून प्रज्ञापराध घडतात व अशाप्रकारे विविध रोगांची उत्पत्ती होते.

‘निरामय आरोग्य’ हे जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य जरी असले तरी हे ‘आरोग्यरक्षण’ यावर्षी आयुर्वेदिक संकल्पनेनुसार आचरण करून आरोग्यसंपन्न व्हावे, असा संकल्प करण्याबाबत विचार करण्यास काय हरकत आहे? कारण आयुष्य कसे जगावे याचे मार्गदर्शन करणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद शास्त्र. आयुर्वेदाची मुळात व्याख्याच पुढीलप्रमाणे केलेली आढळते…
‘हिताहितं सुखं दुःखं आयुस्तस्य हिताहितम् |
मानं च तत्व यत्रोक्तं आयुर्वेदः म उच्यते ॥
आयुष्य हितकर, अहितकर, सुखदायक किंवा दुःखदायक रीतीने जगता येऊ सकते. मात्र आयुष्यासाठी हितकर काय आणि अहितकर काय आणि आयुष्याचे मान ज्यामध्ये समजावले आहे त्याला आयुर्वेद म्हणतात. त्याचप्रमाणे या आयुर्वेद शास्त्राचे मुख्य प्रयोजन म्हणजे रोगांचे निवारण करणे किंवा पीडितांची चिकित्सा करणे व त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे शरीराला, मनाला रोगच होऊ न देणे म्हणजे नेहमी आरोग्यसंपन्न, निरोगी राहणे. मग अशा या आयुर्वेदशास्त्रात जिथे सूक्ष्मतम विचार करून निरंतर स्वास्थ्य टिकवण्याचे कानमंत्र दिलेले आहेत त्याचा अंगीकार का करू नये? प्रत्येकाने… नुसते शरीराचे आरोग्य नाही तर मनाचे, इंद्रियांचे व आत्म्याचे आरोग्य नीट राहील यासाठी प्रत्येकाने दक्ष राहायलाच हवे.
आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या, ऋतुचर्या, सद्वृत्त पालन तसेच आहार-निद्रा-ब्रह्मचर्य या त्रयोपस्तंभाच्या संबंधीचे नियम वगैरे सगळ्या गोष्टी आरोग्यरक्षणाच्या उद्देशानेच सांगितलेल्या आहेत.

आरोग्याच्या नव्या व्याख्येप्रमाणे शरीर व मनाबरोबरच सामाजिक आरोग्य आणि आत्मिक (आध्यात्मिक आरोग्य) ही संकल्पना जागतिक आरोेग्य संघटनेने स्वीकारलेली आहे. निरामयता केवळ शरीरापुरती मर्यादित न ठेवता मानसिक व आध्यात्मिक शरीरालाही पण लागू करावी लागेल. इर्ष्या, क्रोध, द्वेषादी षड्‌रिपूंचा नायनाट करणे म्हणजेच मनाची निरामयता, चारचौघांमध्ये जमवून घेऊन काम करणे, आपणही समाजाचे देणे लागतो, याची जाणीव ठेवून सामाजिक नीति-नियमांचे पालन करणे म्हणजेच सामाजिक निरामयता व योगसाधनेद्वारे आपल्यातील परम शक्तीला जागृत करणे व निरंतर सत्कृती करणे म्हणजे आध्यात्मिक निरामयता जी फक्त आयुर्वेद शास्त्राद्वारे संपादित करू शकतो.

बदलत्या आधुनिक जीवनशैलीमुळे, विशेष करून भारतात विविध आजार पसरले गेले, उत्पन्न झाले. यात महत्त्वाचा म्हणजे आहार-विहार. आपल्या आहार संकल्पनेमध्ये जो बदल झाला त्या बदलांमुळे बरेचसे व्याधी उत्पन्न झालेत व बळावले. आयुर्वेद शास्त्रांमध्ये आहार कल्पना म्हणजे जेवण बनविण्याची पद्धत, आहार पदार्थांचा स्वभाव. थंड, उष्ण, जड, हलके वगैरे. अन्नावर करण्याचे संस्कार, जेवण करण्याची पद्धत, स्वयंपाकघर व स्वयंपाक करणारा/करणारी, जेवणाचे प्रमाण वगैरे सगळ्या गोष्टींचा विशेषत्वाने विचार करून हितकारक भोजनाचाच आग्रह आयुर्वेद शास्त्रामध्ये केलेला आहे कारण शरीर व मन आहारातून घडत असते.
स्वतःच्या प्रकृतीचा व ऋतुबदलांचा विचार करूनच आहाराची योजना करावी…
* नियमित वेळेला व नियत प्रमाणात जेवण करणे, भूक नसताना, अजीर्ण असता, सारखं दिवसभर खाऊ नये.
* जेवण बनविताना फक्त रसनेंद्रियेचा (चवीचाच) विचार न करता, आरोग्याचा व पचनाचा विचार करावा. नेहमीच जेवण बनवताना सोयीचा किंवा पटकन पाककृतीचा विचार करू नये. आयुर्वेदाने सांगितलेले अन्नयोग संस्कार होतील, यावर लक्ष द्यावे.
* स्वतःच्या प्रकृतीला काय अनुकूल, काय प्रतिकूल हे तज्ज्ञ वैद्याकडून जाणून घेणे. आयुर्वेदाने सर्व प्रकृतीला अनुकूल ठरतील अशा गोष्टी सांगितल्या आहेत. उदा. तांदूळ, गहू, जव, साळीच्या लाह्या, आवळा, मनुका, मूग, तूप, मध, दूध, डाळिंब, सैंधव मीठ वगैरे यांचा अधिकाधिक वापर करणे हेसुद्धा आरोग्याला हितकर होय.
* पाणी हे सर्व जिवांचे ‘जीवन’ आहे. म्हणून तहानलेला पाणी पिण्यानेच तृप्त होतो, सॉफ्ट ड्रिंक, ज्यूसने नाही! अगोदर उकळून शुद्ध केलेले, वाळा चंदन वगैरे सुगंधी द्रव्यांनी सुवासिक केलेले, सुवर्णादी धातूंनी संस्कारीत केलेले पाणी दोषरहित व पिण्यास सर्वोत्तम असते. तसेच पाणी कधीही शिळे होत नसते.
पाणी पिण्याचे काही नियम लक्षात घेतल्यानेही आजार टळू शकतात. अति प्रमाणात पाणी प्यायल्यास अन्न नीट पचत नाही, पाणी कमी प्यायल्यासही अन्न योग्य रीतीने पचत नाही. जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. तहान लागल्यावर पाणी प्यावे. जेवताना किंवा काही रुक्ष पदार्थ खाताना मध्ये-मध्ये घोट-घोट पाणी प्यावे. उत्तम पचनासाठी वरचेवर थोडे थोडे पाणी पिणे श्रेयस्कर आहे.
* उत्तम आरोग्यसाठी मल-मूत्रादी वेगांचे धारण करू नये. मलत्याग, मूत्रविसर्जन, भूक-तहान वगैरेची संवेदना अडवून ठेवू नये. कारण शारीरिक वेग अडवून ठेवणे सर्व आपत्तींचे मूळ कारण आहे.
* मल, मूत्र, अपानवायू, उलटी, शिंक, ढेकर, जांभई, भूक, तहान, अश्रू, झोप, शुक्र व परिश्रम केल्यानंतर लागणारा दम या तेरा वेगांचे धारण किंवा प्रवर्तन करू नये. संवेदना असता अडवून ठेवणे व संवेदना नसताना जबरदस्तीने प्रवृत्त करणे या दोन्हीही गोष्टी अनेक रोगांचे कारण ठरू शकतात.
* शुक्र धातुचे वर्धन व रक्षण हेही आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. शरीराचे परम, उत्कृष्ट तेज म्हणजे शुक्र धातू. हे शुक्र म्हणजे आहाररसाचे सारस्वरूप असल्याने मनावर संयम ठेवून प्रत्येकाने त्याचे रक्षण करावे. शुक्ररक्षणानेच शरीर सुंदर, निरोगी होते व संपन्न संततीचा लाभ होतो.

शुक्ररक्षणामध्ये शुक्रसंवर्धनाचाही भाग येतो, अर्थात शुक्रापर्यंत पोहचू शकणारे अन्न, औषध, रसायनांचा रोजच्या आहारात समावेश असू देणे उत्तम. तयार झालेले शुक्र मैथुनादी क्रियांनी प्रमाणाबाहेर खर्च करू नये. मन व शरीर स्थिर राहतील एवढ्या प्रमाणातच मैथुन करणे आयुर्वेदाला अभिप्रेत आहे.
आरोग्यरक्षणामध्ये आयुर्वेदानुसार शरीरशुद्धी व रसायनसेवन यांचाही मोलाचा सहभाग आहे. शरीरात अशुद्धी साठत राहिली किंवा आम निर्मिती होत राहिल्यास अनेक व्याधी उत्पन्न होतात. हे टाळण्यासाठी वेळेवर शरीरशुद्धी करून घ्यावी. शास्त्रोक्त पद्धतीने वमन, विरेचन, बस्ती वगैरे पंचकर्मातील उपक्रम प्रकृतीनुसार करणे चांगले असते. याने रोगाला प्रतिबंध तर होतोच, शिवाय उत्साह, तेजस्विता, कल्पकता वगैरे भावांचाही लाभ होतो. शरीराबरोबर मनाचीही शुद्धी होते.

यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी या अष्टांग योगाच्या विशिष्ट पैलूंचे पालन केल्यास मानसिक, सामाजिक तसेच आध्यात्मिक आरोग्य प्राप्त होईल. अहिंसा, अस्तेय (चोरी न करणे), भांडण करणे, सत्य बोलणे, धनाचा संचय करून न ठेवणे, कठोर वचन न बोलणे, असंबद्ध न बोलणे, दुसर्‍याच्या संपत्तीवर डोळा न ठेवणे, ईर्ष्या न करणे, आयुर्वेद शास्त्रावर विश्‍वास ठेवणे व त्यानुसार वागणे या गोष्टी अंगिकारल्या तर मनुष्याचे मानसिक, आध्यात्मिक आरोग्य तर चांगले राहीलच पण सामाजिक आरोग्यालाही हातभार लाभेल.

त्याचबरोबर दिनचर्येचे व ऋतुचर्येचे पालन करणे अत्यावश्यक आहे. अंगाला रोज तेल लावणे, रोज सकाळी उठल्यावर तिळ तेलाने गण्डूष करणे, रोज नाकात तूप किंवा अणू तेलाचे दोन थेंब टाकावे. डोक्याला तेल लावावे. रात्री झोपताना पायांना (तळपायांना) तेल चोळावे. प्रकृतीला अनुरूप व्यायाम, प्राणायाम, योगासने, कपालभाती, भ्रामरी, श्‍वसन क्रिया, ॐकार गुंजन यांचा रोजच्या दिनक्रमात समावेश करावा. ऋतुबदलाप्रमाणे खाण्यापिण्यामध्ये व आचरण्याच्या सवयी बदलणे याही सर्व गोष्टी आरोग्यासाठी हितकर व आवश्यक आहेत.

प्रकृतीनुरूप आहार आचरण ठेवले, दैनंदिन व्यवहारात – आचरणात आयुर्वेदाने सांगितलेल्या नियमांचे पालन केले, आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली, वेळेवर शरीरशुद्धी केली, रसायन कल्पाची योजना केली, शरीरधातूंचे रक्षण केले, योगसाधना केल्यास, शरीर, मन तसेच आत्मा प्रसन्न राहून खर्‍या अर्थाने आरोग्याचा अनुभव घेता येईल.