आयपीएल आखातात…

0
184
  • सुधाकर रामचंद्र नाईक

संयुक्त अरब अमिरातमधील तीन स्टेडियम्सवर दोन महिन्यांत ५३ सामन्यांचा बोजा वाटतो. या आठ संघांत तेराव्या आयपीएल अजिंक्यपदासाठी मुकाबला होईल. बहुतेक संघांनी सरावाची तयारी सुरू केलेली असून येत्या २० ऑगस्टपासून संघ संयुक्त अरब अमिरातकडे प्रस्थान करतील.

भारतातील लोकप्रिय इंडियन प्रिमियर लीगचे तेरावे पर्व येत्या दि. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातमध्ये आयोजित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आयपीएल कार्यकारिणीने घेतला आहे. भारत सरकारकडून या प्रतियोगितेसाठी औपचारिक परवानगी मिळालेली असून कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे जवळ जवळ स्थगित ठरलेली ही भारतातीलच नव्हे- जगभरात उदंड लोकप्रिय ठरलेली प्रतियोगिता आता तब्बल सहा महिन्यांनंतर अबुधाबी, दुबई आणि शारजा येथील अद्ययावत स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे जगभरात माजलेल्या ‘न भुतो’ भीतीच्या दहशतीमुळे जवळ जवळ संपूर्ण विश्‍व हादरले असून क्रीडाजगतही बराच काळ अनिश्‍चिततेच्या गर्तेत सापडले होते. ऑलिंपिक, विश्‍वचषक टी-२० क्रिकेट, हॉकी, टेनिस, फुटबॉलसह बहुतेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा प्रतियोगिता स्थगित वा रद्द झाल्या. पण हल्लीच युरोपमधील फुटबॉल स्पर्धा हळूहळू सुरू झालेल्या आहेत. ‘क्रिकेटचे जनक’ इंग्लंडने वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन कसोटींची मालिका तसेच आयर्लंडविरुध्द वनडे मालिकेचे यशस्वी आयोजन केले. शिवाय आता पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळत क्रिकेट विश्‍वाला उभारी देण्याचा प्रयत्न केला आणि त्यापासून स्फूर्ती, प्रेरणा घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आयपीएल कार्यकारिणीने तेराव्या इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेचे आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील ही वार्षिक लोकप्रिय क्रिकेट प्रतियोगिता २९ मार्चपासून खेळविण्यात येणार होती, पण भयावह कोरोना विषाणूचा फैलाव आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे आयपीएल रद्द झाल्यात जमा होती. तथापि, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली व्हावयाची आयसीसी टी-२० विश्‍वचषक स्पर्धा २०२१ पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याने आयपीएल कार्यकारिणीला संयुक्त अरब अमिरातमध्ये आयपीएल आयोजन करण्याची संधी मिळाली आणि गेल्या २ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

२००८ मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रिमियर लीगचे आयोजन तिसर्‍यांदा भारताबाहेर होत आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर २००९ मध्ये संपूर्ण प्रतियोगिता दक्षिण आफ्रिकेत खेळविण्यात आली होती, तर २०१४ मध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये प्रारंभिक २० सामने खेळविण्यात आले होते. यंदा कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण प्रतियोगिता आखाती देशात होणार असून ६० दिवसांत ५३ सामने खेळविण्यात येतील. संयुक्त अरब अमिरातमध्ये अद्ययावत क्रिकेट स्टेडियम्स आहेत, पण केवळ तीन स्टेडियमवर दोनेक महिन्यांच्या कालावधीत तब्बल ५३ सामन्यांचे आयोजन ही थोडीशी अवघड बाब वाटते.

२०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेंतील ४८ सामने ११ स्टेडियम्सवर खेळविण्यात आले होते तर २०१६ मध्ये भारतात झालेल्या टी २० विश्‍वचषकातील ३५ सामने सात स्टेडियम्सवर खेळविण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर संयुक्त अरब अमिरातमधील तीन स्टेडियम्सवर दोन महिन्यांत ५३ सामन्यांचा बोजा वाटतो, शिवाय सराव सामनेही असतीलच!
चार वेळचा विजेता मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाइटरायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, किंग्ज इलेव्हन पंजाब, दिल्ली कॅपिटल्स आदी आठ संघांत या तेराव्या आयपीएल अजिंक्यपदासाठी मुकाबला होईल. बहुतेक संघांनी सरावाची तयारी सुरू केलेली असून येत्या २० ऑगस्टपासून संघ संयुक्त अरब अमिरातकडे प्रस्थान करतील. आठही फ्रँचाइजना कमाल २४ खेळाडू नेण्याची परवानगी असेल. ‘कोविड १९’ धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रतियोगिता सुरक्षितपणे सफल होण्यासाठी आयपीएल आयोजन कार्यकारिणी तसेच फ्रँचाइज प्रमुखांनी सर्वसंमतीने संघासाठी विशेष मार्गदर्शक प्रणाली आखलेली आहे. खेळाडूंना आखातात दाखल होण्याआधी ९६ तास ‘पीसीआर टेस्ट’ देणे आवश्यक असून तेथे दाखल झाल्यावर सहा दिवस ‘कॉरंटाईन पीरियड’ घालवावा लागेल. सराव तसेच सामन्यादरम्यानही खेळाडूंना खास दक्षता घ्यावी लागणार असून त्यादृष्टीने मार्गदर्शक प्रणाली तयार करण्यात येणार आहे. काही प्रारंभिक सामने विनाप्रेक्षक खेळले जातील, पण नंतर क्रिकेटशौकिनांना थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून होण्याची शक्यताही आहे.
२००८ मध्ये बीसीसीआयने सुरू केलेल्या या इन्स्टंट क्रिकेट प्रतियोगितेने भारतीय क्रिकेटला एक नवा मानदंड प्राप्त झाला.

राष्ट्रीय युवा खेळाडूंना उच्चतम क्रिकेट व्यासपीठ आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी तसेच भरभक्कम मानधनही मिळू लागले. नैपुण्यकुशल क्रिकेटपटूंनी या संधीचा योग्य लाभ उठवीत आपल्या गुणवत्तेचे प्रतियोगितात यथार्थ दर्शन घडवीत आपले नाणे खणखणीत असल्याचे सिध्द केले. या प्रतियोगितेद्वारे भारतीय क्रिकेट संघालाही बरेच नैपुण्यसंपन्न खेळाडू लाभले. इन्स्टंट क्रिकेटच्या या झंझावाताला क्रिकेटवेड्या भारतीयांकडूत अमाप प्रतिसाद लाभला तसेच अग्रणी प्रायोजकांच्या सहयोगामुळे बीसीसीआयच्या खजिन्यातही भरभक्कम निधी उपलब्ध झाला.

तथापि, ‘कोेविड १९’च्या पार्श्‍वभूमीवर यंदा मुख्य प्रायोजक विवो इंडियाने ऐनवेळी माघार घेतल्याने बीसीसीआयला किमान शंभर कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने तात्कालिक प्रायोजकासाठी चाचपणी सुरू केलेली आहे आणि रामदेव बाबांच्या ‘पतंजली’ उद्योग समूहासह काही प्रायोजकांकडून प्रतिसाद लाभत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी- २० विश्‍वचषक स्पर्धा २०२१ पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्यावर काही भारतद्वेष्ट्या, पूर्वग्रहदूषितांनी आयपीएल आयोजन करण्यासाठी भारताने आयसीसीवर दडपण आणले अशी कोल्हेकुई केली. कोरोना महामारीमुळे देशभरात पसरलेल्या भीतीयुक्त आतंकाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आखाती देशात आयपीएल आयोजित करण्याचा घेतलेला निर्णय सकारात्मक असून तो सफल संपन्न ठरेल अशी अपेक्षा बाळगूया!

आयपीएल विजेते उपविजेते
२००८ : राजस्थान रॉयल्स चेन्नई सुपर किंग्ज
२००९ : डेक्कन चार्जर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२०१० : चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्स
२०११ : चेन्नई सुपर किंग्ज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू
२०१२ : कोलकाता नाइटरायडर्स चेन्नई सुपर किंग्ज
२०१३ : मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज
२०१४ : कोलकाता नाइटरायडर्स किंग्ज इलेव्हन पंजाब
२०१५ : मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज
२०१६ : सनरायझर्स हैदराबाद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२०१७ : मुंबई इडियन्स रायझिंग पुणे सुपरजायंट
२०१८ : चेन्नई सुपर किंग्ज सनरायझर्स हैदराबाद
२०१९ : मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज