वेर्णा औद्योगिक वसाहतीतील आयएफबी कंपनीतील कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढला जाणार असून, त्या कर्मचार्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिले. सदर कंपनी व्यवस्थापनाने करार संपल्यानंतर कामगारांना सेवेतून कमी केले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनात जवळपास १३० कामगार सहभागी झाले आहेत.
राज्यात वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीतील आयएफबी कंपनीतील कामगारांचा प्रश्न गेले काही दिवस चर्चेत आहे. वेर्णा येथील आयएफबी कंपनीचे कर्मचारी काही दिवसांपूर्वी आपणाला येऊन भेटले होते. राजकीय पक्षांनी केवळ राजकीय लाभ उठविण्यासाठी कामगारांच्या प्रश्नाकडे पाहू नये. कंपनीच्या कामगारांनी पुन्हा एकदा आपल्याकडे यावे, त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
वेर्णा येथील आयएफबी कंपनीच्या कामगारांनी आपणाकडून आंदोलन करण्याची चूक झाल्याचे लिहून देऊन कंपनीत कामावर रुजू व्हावे. यासंबंधी कामगारांनी निर्णय घ्यायला हवा. कंपनीने त्यांच्याशी तीन वर्षांचा करार केला होता, तो करार पूर्ण झाला आहे. सदर कर्मचार्यांना परत कामावर घेण्यास कंपनी तयार आहे, असे कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आमदार विरेश बोरकर आणि कामगारांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.