घरगुती गॅस सिलिंडरवर बसवला जाणार ‘क्यूआर कोड’

0
14

>> केंद्रीय पेट्रोलियममंत्री पुरी यांची माहिती; सिलिंडरची चोरी आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल

घरगुती गॅस सिलिंडरबाबत केंद्र सरकारने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गॅस सिलिंडरच्या काळ्याबाजाराला आळा घालणे सोपे होणार आहे. सिलेंडरची चोरी यामुळे रोखता येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने रामबाण उपाय शोधला असून, लवकरच घरगुती गॅस सिलिंडरवर ‘क्यूआर कोड’ लावण्यात येणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली. त्याचा फायदा गॅस सिलिंडरचा पुरवठा करणार्‍या कंपन्या आणि ग्राहकांनादेखील होणार आहे. या क्यूआर कोडमुळे गॅस सिलिंडरला ट्रॅक करता येणार आहे.

प्रत्येक ग्राहकाच्या हातात कधी ना कधी कमी वजनाचा सिलिंडर हातात पडला असेल. प्रत्येकाला समस्येचा सामना करावा लागला असेल. डिलिव्हरीमनने एलपीजी सिलिडर दिल्यावर त्याचे वजन केले, तर त्यातून एक-दोन किलो कमी गॅस निघाला असेल. यापूर्वी या तक्रारीचा शोध घेता येत नव्हता. त्यामुळे अनेकदा गॅसची चोरी करणार्‍यांची सुटका व्हायची; पण आता असे होणार नाही.
क्यूआर कोडचे फायदे कोणते?
या क्यूआर कोडमुळे ग्राहकांना, सिलिंडर वितरकाचे नाव, तुमच्या घरी सिलिंडर कुठून येणार, डिलिव्हरी बॉयचे नाव काय, याची माहिती ग्राहकांना मिळणार आहे. या क्युआर कोडमुळे गॅस सिलिंडरचा संपूर्ण प्रवास तुम्हाला जाणून घेता येईल. तसेच गॅस सिलिंडर सध्या कुठे आहे, त्याची माहिती ग्राहकांना मिळेल. सिलिंडरचे वजन, त्याची एक्सपायरी डेटची माहिती मिळेल. गॅस लिकेजची माहिती मिळविता येईल. गॅस सिलिंडरची सेफ्टी टेस्ट केलेली आहे की नाही, याची माहिती देखील मिळेल.

तीन महिन्यांत सर्व सिलिंडरवर क्यूआर कोड

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २० हजार गॅस सिलिंडरना क्यूआर कोड लावण्यात आलेला आहे, तर पुढील तीन महिन्यांत १४.२ किलो वजनाचे सर्व घरगुती गॅस सिलिंडर्स क्यूआर कोडशी जोडले जातील. हा क्यूआर कोड आधीपासून वापरात असलेल्या गॅस सिलिंडरवर चिटकवला जाईल, तर नवीन सिलिंडरला वेल्डेड केला जाईल.