आम्ही वंशज तुकाराम वर्देचे, वामन वर्देचे नव्हे!

0
447

मनस्वी

– विष्णू सुर्या वाघ

संतकाळापासून गोव्यात मराठी आहे. तुकारामापासून प्रेरणा घेऊन साहित्यरचना करणारे तुकाराम वर्दे हे खरे तर आमचे पूर्वज आहेत. मराठीरूपी सूर्यावर थुंकणारे वामन वर्दे आमचे पूर्वज होऊच शकत नाहीत. निदान बहुजन समाजात जन्मलेल्या माझ्यासारख्या स्वाभिमानी सूर्यपुत्राचे तरी वामन वझे ऊर्फ शणैं गोंयबाब हे पूर्वज ठरू शकत नाहीत!

* मराठी ही गोव्याची भाषा नाही; ती महाराष्ट्रातून आयात केली आहे!
* पोर्तुगिजांनी गोवा जिंकून घेतल्यानंतर कोकणी भाषेवर बंदी घातली, त्यामुळे गोमंतकीयांना मराठीचा आधार घ्यावा लागला!
* मराठीचे गोव्यातील काम पोर्तुगिजांची सत्ता संपुष्टात आली तेव्हाच संपले. आता पुन्हा मराठीची पाठवणी महाराष्ट्रात केली पाहिजे!
* कोकणी हाच गोमंतकीयांना जोडणारा दुवा आहे. मराठीतून भावना व्यक्त करणे गोमंतकीय माणसाला कधीच जमणार नाही!
मराठीचा आत्यंतिक दुस्वास करणार्‍या महाभागांकडून नेहमीच उधळली जाणारी ही मुक्ताफळे. या मराठीद्वेषाचा प्रारंभ वामन रघुनाथ वर्दे वालावलीकार ऊर्फ शणैं गोंयबाब यांनी केला. शणैं गोंयबाब यांनी मराठीचा द्वेष का व कधीपासून करायला सुरुवात केली त्यावर गोमंतकीय इतिहाससंशोधक कै. अ. का. प्रियोळकर यांनी उत्तमरीत्या प्रकाश पाडला आहे. ‘हिंदुस्थानचे दोन दरवाजे’ या पुस्तकात प्रियोळकर लिहितात- ‘‘आपल्यास पारतंत्र्य प्राप्त झाले, ते कसे नष्ट करावे याचा विचार न करता आपले लोक जातीय भांडणात मग्न होते, ही खेदाची गोष्ट होय. हा जातीयवाद प्रथम केवळ जातीपुरताच मर्यादित होता. त्यात मराठी भाषेला ओढण्याची सुरुवात वामनराव वर्दे वालावलीकर या ‘शणैं गोंयबाब’ या टोपण नाव धारण करणार्‍या गृहस्थाने प्रथम केले. हे गोमंतकातील सारस्वत ब्राह्मण. मुंबईत त्यांनी एका जर्मन कंपनीत नोकरी धरली.’’
मुंबईमध्ये सुमारे एका शतकाअगोदर चाललेले हे जातीय भांडण कुठले होते व शणैं गोंयबाबनी त्यात मराठी भाषेला का ओढले हे आधी समजून घेतले पाहिजे. सारस्वतांच्या मासे खाण्याच्या सवयीमुळे इतर ब्राह्मण त्याना अस्पृश्यांसारखीच वागणूक देत. यामुळे वर्दे वालावलीकरांचा स्वाभिमान दुखावला. सारस्वतांना ‘अब्राह्मण’ ठरवणार्‍या चित्पावन व कर्‍हाडे ब्राह्मणांचा त्यांना एवढा संताप आला की हे लोक मूळचे हिंदूच नव्हते, ते कोणत्या तरी म्लेंच्छ (म्हणजे मुसलमान) देशातून आले होते, असे सनसनाटी माजवणारे इतिहाससंशोधन त्यांनी केले. चित्पावन व कर्‍हाडे या दोन्ही जाती बिगर भारतीय वंशाच्या, म्हणजे बाहेरून आलेल्यांच्या असून भारतात आल्यानंतर पाचशे वर्षांच्या अंतराने त्याना हिंदू करण्यात आले व त्यांच्या गळ्यात जानवी घातली गेली- असा निष्कर्ष शणैं गोंयबाबनी काढला. आपल्या ‘काही मराठी लेख’ या १९४५ साली प्रकाशित केलेल्या पुस्तकात ते लिहितात- ‘‘चित्पावन व कर्‍हाडे या दोन जाती हिंदुस्थानाबाहेरील वंशांच्या असून पाचशें वर्षांच्या अंतराने जानव्याच्या अधिकारी झाल्या, असे दिसते. त्या काळीं यवन, शक, तुर्क, आभीर, बर्बर, हूण वगैरे अनार्य लोकांना व्रात्ययज्ञ करून हिंदुधर्मात घेण्याची चाल होती. खानदेशात सांप्रत अहिर जातीचे ब्राह्मण, सोनार, सुतार, कासार, शिंपी वगैरे पुष्कळ लोक आहेत. ह्यांतील ब्राह्मण आपणाला माध्यंदिन शाखेचे म्हणवितात. हे सर्व आभीर वंशातील मूळचे अनार्य असून व्रात्ययज्ञाने हिंदु करण्यात आले हे सांगणे नकोच. अस्सल हिंदूंपासून ह्यांना चित्पावन व कर्‍हाडे जातींना विशिष्टपणाने ओळखण्यासाठी ‘नवहिंदु’ म्हटले असता ठीक होईल.’’
शणैं गोंयबाब यानी वर केलेले प्रतिपादन हे केवळ आकसापोटी केले होते. कर्‍हाडे ब्राह्मणांना त्यानी भारताबाहेरून आलेल्यांचे वंशज म्हटले. पण कर्‍हाडे ब्राह्मणांचा गोव्याशी पुरातन संबंध असल्याचे अनेक संशोधकांनी सिद्ध केले आहे. गोमंतकातील जुन्या ताम्रपटांत कर्‍हाड्यांचे नामोल्लेख आढळतात हे अ. का. प्रियोळकरांनी दाखवून दिले होते. ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांची कूळदेवी म्हार्दोळची म्हाळसा होती. लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब मावळंकर, रियासतकार र. गो. सरदेसाई, साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर यांची मूळ कुलदेवता कवळ्याची शांतादुर्गा होती असा उल्लेख त्यानी आपल्या संशोधनपर पुस्तकात केला आहे.
सुमारे पाचशे वर्षांपूर्वी आजची मुंबई म्हणजे सात-आठ लहानमोठ्या बेटांचा एक समूह होता. भंडारी, कोळी व आगरी या तीन जमाती म्हणजे मुंबईचे मूळनिवासी. कालांतराने पठारे प्रभू, पारशी असे अनेक लोक मुंबईत आले. पोर्तुगिजांनी ब्रिटिशांना आपल्या कन्येच्या लग्नात आंदण म्हणून मुंबई बहाल केली. ब्रिटिश लोकांनी मुंबईचा विकास केला. हळूहळू संपूर्ण भारतातून हरेक जातीधर्माचे लोक मुंबईत येऊ लागले. त्यांपैकी गोव्यातून गेलेले सारस्वतही होते. सारस्वतांची बोलीभाषा अर्थातच कोकणी होती. इंग्रजांच्या काळात आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचा झपाट्याने विकास झाला. साहजिकच संस्कृतीचा जो केंद्रबिंदू पेशवाईच्या काळामध्ये पुण्यात होता तो मुंबईकडे सरकला. छापखान्याचे युग आले. मुंबईत गणपत कृष्णाजी या भंडारी माणसाने नागरी लिपीतील पहिला छापखाना टाकला तेव्हापासून ग्रांथिक मराठीचा विकास झाला. कर्‍हाडे व चित्पावन या दोन्ही प्रकारच्या ब्राह्मणांमध्ये आपापल्या स्वतंत्र बोल्या होत्या. पण ग्रांथिक मराठी जसजशी आकार घेऊ लागली तसतशी ब्राह्मणांनी आपल्या बोलीच्या जागी ग्रांथिक मराठी रूढ केली. सारस्वतांनी मात्र मुंबईतही आपली बोलीच आपापसात बोलण्याचा प्रघात चालू ठेवला. कर्‍हाडे व चित्पावनांनी या बोलीला ‘हेंगाडी’ म्हणून हिणवले. शणैं गोंयबाबना आधीच या दोन्ही जमातींचा तिरस्कार होता. त्यात भर पडली ती भाषिक अवहेलनेची. त्यामुळे त्यानी चिडून ‘वड्याचे तेल वांग्यावर’ या म्हणीप्रमाणे चित्पावन- कर्‍हाड्यांवरचा राग मराठीवर काढला व विश्‍वामित्राप्रमाणे कोकणी भाषेची प्रतिसृष्टी उभी करण्याचा निर्धार केला. ‘आजची मराठी ही चित्पावन व कर्‍हाडे यांनी भ्रष्ट केली आहे. त्यांची ती उष्टी भाषा आहे’ यासारख्या उद्गारांतून त्यांना मराठीबद्दल वाटणारा तिरस्कारच व्यक्त होतो.
शणैं गोंयबाब यांच्या मराठीद्वेषाची गाडी पुढे गोव्यात रवींद्र केळेकर, पुरुषोत्तम काकोडकर, उदय भेंब्रे, चंद्रकांत केणी यांनी चालवली. मराठीला त्यांनी सतत शिव्याशाप दिले. स्वतःला ‘गांधीवादी’ म्हणवणार्‍या रवींद्र केळेकरांची मजल ‘मराठीवाद्यांना टाडा लावा’ असे लिहिण्यापर्यंत गेली. शणैं गोंयबाबांचा उल्लेख कोकणीचे प्रकांड पंडित, इतिहाससंशोधक या शब्दात वारंवार करून शणैं म्हणतील ती ‘फातरावरली रेघ’ अशाप्रकारे करण्यात आला. गोव्यातील मराठीची एकूणच परंपरा नाकारण्याचे हे एक पद्धतशीर कटकारस्थान होते.
कोकणीचा जयजयकार करीत मराठीला ‘भायली भाषा’ म्हणून हिणवणार्‍या आजच्या काळातील वटवटसम्राटांना गोव्याचा खरा इतिहास अद्याप ठाऊक नाही. बहुधा त्यांच्या वाडवडिलांनीही त्यांना तो सांगितला नाही. त्यामुळे शणैं गोंयबाबनी लिहून ठेवलेला इतिहास तेवढाच खरा अशा कूपमंडकी वृत्तीने काही अज्ञानी तरुण पछाडलेले आहेत.
शणैंचे अनुयायी म्हणतात त्याप्रमाणे मराठी ही गोव्यातली परकी भाषा नाही. ती परकी असती व गोव्यावर कुणीतरी लादली असती तर पाच शतकांची मराठीची प्रदीर्घ साहित्यिक परंपरा गोव्यात का निर्माण झाली असती? गोव्यातील प्राचीन विद्वानांनी ग्रंथरचना कोकणीऐवजी मराठीतून का केली असती? कोकणीतही ग्रंथरचना होत होती पण इन्क्वीझिशनच्या काळात पोर्तुगिजांनी सर्व कोकणी ग्रंथ जाळून टाकले असा दावा काही स्वघोषित इतिहासकार करतात. असे होते तर अकराव्या शतकापासून गोव्यात जे शिलालेख सापडले ते शिलालेख कोणती साक्ष देतात? श्रवणबेळगोळ येथील ‘श्रीचावुंडरायें करवियलें’ व ‘श्री गंगासुतालें रायें करवियलें’ हे दोन्ही शिलालेख मूळ कोकणीतील असल्याचा दावा शणैं गोंयबाबनी केला होता. वास्तविक त्यातील भाषा ही पूर्णपणे मराठी असल्याचे सिद्ध झाले आहे. फादर थॉमस स्टीफनचे ‘ख्रिस्तपुराण’ हे कोकणीच आहे असेही म्हणण्यापर्यंत काहीजणांची मजल गेली. खुद्द फादर स्टीफननेच ‘मराठीये भासेंत’ हे पुराण लिहिल्याची कबुली दिलेली असतानाही तिला नाकारण्याचा आंधळेपणा अजूनही चाललेला आहे!
शिलालेखांबद्दलच बोलायचे तर मग श्रवणबेळगोळच्या शिलालेखांबद्दल का बोलायचे? श्रवणबेळगोळ तर कर्नाटक प्रांतातले. महाराष्ट्राशी त्याचा कधीच संबंध नव्हता. शके १२२२ साली लिहिलेला एक शिलालेख खांडोळ्यात सापडला. त्यातील भाषा मराठी व लिपी कानडी होती. शके १३२४ मध्ये वेळूस सत्तरी येथे मराठी भाषेतील व देवनागरी लिपीतील शिलालेख लिहिल्याचे उघड झाले. शके १३३५ मध्ये श्रीनागेश बांदिवडेचा शिलालेख देवनागरी मराठीतच लिहिला होता. याचा अर्थ काय होतो? सोळाव्या शतकात लिहिलेले मराठी ग्रंथ सापडतात आणि कोकणीतून लिहिलेला एकही ग्रंथ सापडत नाही हा विरोधाभास काय सांगतो?
मराठी भाषा महाराष्ट्रातून आली असे म्हणणार्‍यांनी मध्ययुगीन भारतातला महाराष्ट्र आकाराने व व्याप्तीने केवढा होता याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपल्या कोणत्याही पाठ्यपुस्तकात गोव्याचा खरा इतिहास शिकवला जात नाही. जणू काही १५१० पूर्वी, म्हणजे पोर्तुगिजांचे आगमन होण्यापूर्वी गोवा अस्तित्वातच नव्हता!
ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत गोमंतकावर विविध राजघराण्यांनी राज्य केले. त्यात मौर्य, सातवाहन, कदंब, शिलाहार व यादवांचा समावेश होता. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला, १३१८ साली दिल्लीच्या खिलजी वंशाची मुसलमानी सत्ता गोव्यात आली. १५१० साली आल्बुकर्कने गोवा जिंकला. या १९२ वर्षांच्या एकूण काळात मुसलमानी सत्ता फक्त ५६ ते ५७ वर्षेच गोव्यामध्ये होती. मुसलमानी राजवंश सोडून दिले तर गोव्यावर अधिसत्ता गाजवणार्‍या सर्व राजवंशांपैकी बहुतेक राजघराणी महाराष्ट्र व गोवा या प्रदेशांवर एकाचवेळी राज्य करीत होती असे दिसून येते. विदर्भ, महाराष्ट्र व कुंतल या तिन्ही प्रदेशांवर बदामीच्या पूर्व चालुक्यांचे राज्य होते. या राज्याचा विस्तार मध्यप्रांत विदर्भापासून कर्नाटकापर्यंत पसरलेला होता. चालुक्य राजघराण्यातील दुसर्‍या पुलकेशीचा पुत्र चंद्रादित्य हा सावंतवाडी व गोवा या प्रांतांवर राज्य करीत होता.
राष्ट्रकूटांचे साम्राज्यही फार मोठे होते. दक्षिण गुजरात, मध्यप्रांत, आजचा महाराष्ट्र, कोंकण, तेलंगण व आंध्रचा भाग, कर्नाटक व उत्तर म्हैसूर असा त्या साम्राज्याचा विस्तार होता.
देवगिरीच्या यादवांची राजवट महाराष्ट्रावर होती त्या काळात गोवासुद्धा यादवसाम्राज्याचा एक भाग होता. ज्ञानेश्‍वरीच्या अखेरीस ज्ञानेश्‍वरांनी जे पसायदान लिहिले त्यात रामदेवराय यादवाचा उल्लेख आहे. त्याच काळात गोव्यात जे सुंवारीवादन रूढ झाले तिच्या चंद्रावळीत ‘नमिन आताऽऽ यादवांच्या रायाऽऽ’ असे शब्द आहेत. गोव्याची ही पारंपरिक चंद्रावळ मराठीत आहे व त्यातला उल्लेख देवगिरीच्या राजासंबंधीचा आहे.
शिलाहार घराण्याच्या तीन शाखा होत्या. सर्वात प्राचीन शाखा दक्षिण कोकणात म्हणजेच गोव्यात होती. दुसरी उत्तर कोकणात ठाणे येथे होती व तिसरी कर्‍हाड- कोल्हापूर प्रांतात. दक्षिण शिलाहारांचे राज्य गोव्यापुरते नव्हते. गोवा, सावंतवाडी, रत्नागिरी ते रायगड असा त्याचा विस्तार होता. मुंबईपासून गोव्यापर्यंतची सर्व कोकणपट्टी दक्षिण शिलाहारांच्या राज्यात होती. थोड्याफार प्रमाणात असाच विस्तार दुसर्‍या जयकेशीच्या कारकिर्दीत कदंबांच्याही राज्याचा होता. एकंदरीत गोवा आणि महाराष्ट्र या सलग भूप्रदेशांवर एकाचवेळी व दीर्घकाळपर्यंत ज्या राजवंशांची अधिसत्ता होती, ते (मुसलमान, उत्तर चालुक्य व विजयनगरचे राय वगळता) सर्व वंश क्षत्रिय मराठे होते व त्यांची भाषा मराठी होती. महाराष्ट्री प्राकृत हे तिचे मूळ स्वरूप होते.
मराठीचा उगम शके ७०० च्या सुमारास झाला. त्यापूर्वी महाराष्ट्रात संस्कृत व महाराष्ट्री भाषा वापरात होती. सहाव्या शतकापासून प्राकृताचे अपभ्रंश होऊन हल्लीच्या भाषा उत्पन्न होऊ लागल्या. संस्कृतपासून महाराष्ट्री झालीच होती. पुढे महाराष्ट्री व अपभ्रंशित बोली मिळून मराठी तयार झाली. या मराठीची जडणघडण होत असतानाच्या काळात महाराष्ट्र व आसपासच्या प्रदेशांत अनेक प्राकृत भाषा बोलल्या जात होत्या व आपापसात त्यांच्यामधील शब्दांची देवाणघेवाणही होत होती. त्याशिवाय अहिराणी, आगरी, भंडारी, भिल्ली, बाणकोटी, कोळी, कातकरी, गोंडी इत्यादी प्रादेशिक भाषा होत्याच. मालवणी, कोकणी, कारवारी, मंगळुरी या मूळ बोलीच आहेत. पण सिंधुदुर्गवरून आपण जसजसे दक्षिणेकडे जातो तसे या बोलीचे स्वरूप बदलत जाते. होन्नावर पार करून गेल्यानंतर कन्नड भाषेतले अनेक शब्द या बोलीत येतात. त्यामुळे एखादा मंगळुरी भाषेत बोलू लागला तर गोंयकारांनाही त्याची बोली समजून घेणे अवघड जाते.
महाराष्ट्र प्रदेशात बोलल्या जाणार्‍या बोलींचा उल्लेख वर केलाच आहे. त्याशिवाय मराठीच्या पोटभाषा म्हणता येतील अशा वर्‍हाडी, कोल्हापुरी, माणदेशी, नगरी, चित्पावनी अशा आणखी काही बोली होत्या. एकंदरीत त्यावेळी सबंध महाराष्ट्र ते गोकर्णपर्यंत प्राकृत, अपभ्रंश आणि प्रांतिक अशा अनेक बोली पसरल्या होत्या. यावेळी मराठी बनत चालली होती व तिच्याभोवती पसरलेल्या अनेक भाषांतील शब्दांचा मराठीत संग्रह होऊन तिची वाढ होत होती. ज्ञानेश्‍वरीत आलेले पुष्कळसे कोकणी शब्द याचेच निदर्शक आहेत. दळणवळणाची साधने वाढली की माणसांचे एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाणे सोपे होते. भ्रमंतीचे प्रमाण वाढले की भाषांचाही चेहरा बदलू लागतो. बोली भाषांमधील तुटकपणा जाऊन सरमिसळपणा वाढतो. दहाव्या शतकापर्यंत प्राकृत, अपभ्रष्ट व बोलीभाषा साहित्यनिर्मितीसाठी वापरल्या जात नव्हत्या. बाराव्या शतकात मराठीतून मुकुंदराजाने ‘विवेकसिंधु’ लिहून ग्रंथरचनेला प्रारंभ केला. कालांतराने मराठीची ग्रंथभाषा रूढ झाली व वाचनाच्या व्यासंगातून ती सर्व महाराष्ट्र प्रदेशात पसरली. याला कोकण प्रांतही अपवाद नव्हता. कोकणात गोव्याचाही समावेश होतो. साहजिकच गोवापुरीतही ग्रांथिक मराठीचा स्वीकार झाल्याचे दिसून येते.
मराठीचा द्वेष करणारे शणैंचे म्हालगडे गोव्यातील मराठीप्रेमींना महाराष्ट्राचे भाट म्हणून हिणवतात. वास्तविक मराठीप्रेमी असण्याचा आणि महाराष्ट्राची भाटगिरी करण्याचा कोणताही संबंध नाही. गोव्यातील मराठीची परंपरा ही स्वयंभू आहे. ती स्वयंप्रेरणेनेच या भूमीत रुजली आहे. मराठीचा प्रसार करायला ज्ञानेश्‍वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम यांना काही पासपोर्ट काढून गोव्यात यावे लागले नाही. इथल्या बहुजन समाजाने आमंत्रणे पाठवून त्याना गोव्यात बोलावून घेतले नाही. लोकगंगेच्या प्रवाहावर आरूढ होऊन संतवाणी देहू, पैठण, आळंदीवरून गोमंतकात आली. संतांनी आपल्या लोकजागरातून अख्खा महाराष्ट्र हलवून सोडला. जातीभेदाची तीव्रता कमी केली. उच्चनीचपणाच्या कल्पनेला हादरा देऊन समतेचा पुरस्कार केला. समानता व सेवाधर्म यांचा आयुष्यभर प्रचार केला. महाराष्ट्रात ज्ञानेश्‍वरी, तुकारामाची गाथा, दासबोध या ग्रंथांचे नित्य वाचन-पठण, भजन-पूजन चालू झाले. एकनाथी भागवत, रामविजय, हरिविजय, पांडवप्रताप, भक्तिविजय, संतलीलामृत, मुक्तेश्‍वराचे महाभारत, मोरोपंत, वामनपंडित वगैरे संतकवींचे ग्रंथ बहुजनसमाजापर्यंत पोचले. गोव्यात तीस-चाळीस वर्षांपूर्वी अनेकांच्या घरी हे ग्रंथ जपून ठेवलेले होते व श्रावण महिन्यात त्यांचे वाचनही होत होते. या ग्रंथांपासून प्रेरणा घेऊन तुकारामबाबा वर्दे या थोर मराठी संतकवीने सतराव्या शतकात गोमंतकामध्ये साहित्यनिर्मिती केली. भर्तृहरीच्या शतकत्रयाचे ‘सुभाषित रत्नावली’ या नावाने त्यानी समश्‍लोकी भाषांतर केले होते. सतराव्या शतकात मंगेशीच्या नायकस्वामींनीही शिवगीतेवर कविताबद्ध टीका केली. पांडोबा कैसरे यांनी द्रौपदीस्वयंवर व इतर स्फुटकाव्ये लिहिली. महेश्‍वरभट्ट सुखटणकर यांनी ‘अमरविवेक’ हा ग्रंथ मराठीतून लिहिला. महेश्‍वरभट्टांचे मराठी साहित्य केवळ गोव्यातच नव्हे तर अखिल भारतात विद्वद्मान्य झाले होते. दैनंदिन संपर्काची बोली कोकणी असतानाही गोमंतकीयांनी ग्रंथभाषा म्हणून मराठीचा स्वीकार केला होता.
वर नमूद केलेला सर्व इतिहास सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट आहे. पण काळोखाचे कातडे डोळ्यांवर ओढून घेतलेल्या मराठीद्वेष्ट्यांना हा इतिहास दिसत नाही. किंबहुना त्याना तो बघायचीच इच्छा नाही. विसाव्या शतकात जन्मलेल्या वामन वर्दे ऊर्फ शणैं गोंयबाबचा ‘कोकणीचा मुळपुरुष’ म्हणून जयजयकार होतो, पण कोकणीतून रोमन लिपीत ग्रंथनिर्मिती करणार्‍या ख्रिश्‍चन धर्मगुरूंचे कर्तृत्व ‘रोमी ही कोकणीची स्वाभाविक लिपी नाही’ असे म्हणून दडवून ठेवले जाते. मग सतराव्या शतकात श्रीधर, अमृतराय, मोरोपंत यांच्याही आधी तुकाराम, रामदास, मुक्तेश्‍वर व वामनपंडित यांच्या तोडीची काव्यरचना करणार्‍या तुकाराम वर्देबुवांची आठवण ते कशी करणार? पण त्यानी आठवण केली नाही म्हणून आम्ही करू नये असे थोडेच आहे? संतकाळापासून गोव्यात मराठी आहे. तुकारामापासून प्रेरणा घेऊन साहित्यरचना करणारे तुकाराम वर्दे हे खरे तर आमचे पूर्वज आहेत. मराठीरूपी सूर्यावर थुंकणारे वामन वर्दे आमचे पूर्वज होऊच शकत नाहीत. निदान बहुजन समाजात जन्मलेल्या माझ्यासारख्या स्वाभिमानी सूर्यपुत्राचे तरी वामन वझे ऊर्फ शणैं गोंयबाब हे पूर्वज ठरू शकत नाहीत!