आमदार बाबुश मोन्सेर्रातांची कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी

0
122

पुन्हा प्रवेश न देण्याचाही निर्णय
हल्लीच झालेल्या पणजी पोटनिवडणुकीच्या वेळी कॉंग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांच्याविरोधात काम केलेले पक्षाचे सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा तसेच कोणत्याही परिस्थितीत त्यांना पक्षात पुन्हा प्रवेश न देण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारी समितीच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे पक्षाचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.काल पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत बाबुश मोन्सेर्रात यांनी पणजी पोटनिवडणुकीच्या वेळी पक्षाच्या विरोधात जे काम केले त्याविषयी कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई केली जावी अशी मागणी लावून धरली. तद्नंतर बाबुश मोन्सेर्रात यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा व त्यानंतर त्यांना कधीही पक्षात पुनर्प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कवठणकर यांनी स्पष्ट केले.
गेल्या २२ डिसेंबर व नंतर २२ व २३ जानेवारी रोजी बाबुश यांनी कॉंग्रेस पक्षाचा पणजी पोटनिवडणुकीत पराभव करा असे आवाहन जनतेला केले होते. त्यांची ही कृती अत्यंत आक्षेपार्ह व पक्षाच्या विरोधात होती. तसेच भाजपाला पाठिंबा द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले होते. पक्षाचे केंद्रीय सचिव चेल्लाकुमार यांच्यावरही त्यांनी गंभीर स्वरुपाचे आक्षेप केले होते. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कवठणकर यांनी स्पष्ट केले. त्यांची पक्षातून नक्की कधी हकालपट्टी करण्यात येईल असे विचारले असता त्याविषयी काहीही सांगण्यात श्री. कवठणकर यांनी नकार दिला.
समितीचा विस्तार
दरम्यान, गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीवर अतिरिक्त पदाधिकार्‍यांची वर्णी लावण्यात आलेली असून हे पदाधिकारी खालीलप्रमाणे आहेत- फिलिप नेरी रॉड्रिग्ज- उपाध्यक्ष, आग्नेलो फर्नांडिस, पांडुरंग मडकईकर, सुनील कवठणकर, यतीश नाईक, विजय पै, जोसेफ डायस (सर्व सरचिटणीस), दुर्गादास कामत, मारिओ पिंटो, वामन चोडणकर, अतुल वेर्लेकर, देवेंद्र देसाई व महादेव देसाई यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.