>> सर्वोच्च न्यायालयात आज चोडणकरांच्या याचिकेवर सुनावणी
कॉंग्रेस तसेच मगोतून पक्षांतर केलेल्या बारा आमदारांच्या विरोधातील दोन अपात्रता याचिकांवर गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर येत्या २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता निवाडा देणार आहेत, दरम्यान, आज मंगळवार ६ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात गिरीश चोडणकर यांच्या आमदार अपात्रता याचिकेवर सुनावणी होणार आहे.
मगोपचे नेते व ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी मगोपतून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोन आमदारांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे, तर गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केलेली आहे.
सभापती राजेश पाटणेकर यांनी दोन्ही आमदार अपात्रता याचिकांवर काल सोमवारी पुन्हा एकदा सुनावणी घेतली. आपल्या अपात्रता याचिकेवर २९ एप्रिल रोजी अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती याचिकादार चोडणकर यांनी दिली. आमदार अपात्रता प्रकरणी याचिकेवर यापुढे आणखी सुनावणी होणार नसल्याची हमी सभापतींनी दिली आहे. अशी माहिती आमदार ढवळीकर यांनी दिली.