..अन्यथा आजपासून महाराष्ट्रातील चिरे, खडी वाहतूक रोखणार

0
80

>> पेडणे ट्रकमालक संघटनेचा इशारा, स्थानिकांना संधी देण्याची मागणी

पेडणे तालुक्यातील विविध सरकारी प्रकल्पांना लागणार्‍या मालाची वाहतूक करण्यासाठी पेडणे ट्रक मालक संघटनेच्या ट्रक व्यावसायिकांना संधी द्यावी, वाहतुकीचे वाढीव दर द्यावेत अशी मागणी पेडणे ट्रक मालक संघटनेने केली आहे. या मागण्या जर सरकारने चोवीस तासांच्या आत मान्य केल्या नाहीत तर आज गुरुवार दि. ८ पासून महाराष्ट्रातून चिरे, वाळू, खडी असा माल घेऊन येणारी सर्व वाहतूक रोखू असा इशारा संघटनेने काल दिला. न्हयबाग-पोरस्कडे पेडणे येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ या महामार्गावर संघटनेने काल बुधवारी आपले ट्रक रस्त्यावर उभे ठेवून सरकारचा निषेध केला.

यावेळी गोवा फॉरवर्डचे ऍड. जितेंद्र गावकर, मोपाचे माजी सरपंच रुपेश परब, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर, मगोचे प्रवीण आर्लेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, मगोचे प्रवक्ते उमेश तळवणेकर आदींनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला.
पेडणे ट्रक मालक संघटनेअंतर्गत १५० पेक्षा जास्त ट्रक नोंदणीकृत आहेत. सध्या मोपा विमानतळ आणि आयुष इस्पितळ या दोन प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारी वाळू, चिरे, खडी व इतर माल आणण्यासाठी केवळ पेडणे ट्रक मालक संघटनेच्या ट्रकांनाच संधी द्यावी व वाढीव दर द्यावा यासाठी संघटनेने कंत्राटदार, स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना निवेदन दिले. परंतु आजपर्यंत कोणतीच कार्यवाही न झाल्याने आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील ट्रकांना संधी दिली जाते असे संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शेट्ये यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे सचिव उत्कर्ष तेली, उपाध्यक्ष रंगनाथ शेट्ये, सहसचिव प्रेमानंद हळर्णकर, खजिनदार मंगेश बागकर आदी उपस्थित होते.
मोपा विमानतळावर वाहतूक कंत्राटदार आमच्या वाहनांना संधी देत नाही, परस्पर वाहने आणली जातात, हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उद्या गुरुवारपासून हे सर्व ट्रक सीमेवर अडवू असा इशारा दिला. तसेच आम्हाला योग्य तो भाव मिळत नाही तोवर आम्ही आमची वाहने मागण्या मान्य होईपर्यंत रस्त्यावर उभी करून ठेवू, असा इशारा दिला.