आमदारांच्या अपात्रता याचिकेवर सभापतींकडून सुनावणीस सुरूवात

0
105

गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांच्याविरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर पहिली सुनावणी काल घेतली.

गेल्या जुलै २०१९ मध्ये कॉंग्रेस पक्षाच्या १० आमदारांनी फुटून चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट तयार करून आपल्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण केले आहे. या विरोधात सभापतीसमोर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी अपात्रता याचिका दाखल केली आहे.

मुख्य राजकीय पक्षात फूट पडलेली नाही. त्यामुळे १० आमदारांच्या वेगळ्या गटाची स्थापना बेकायदा आहे, असा युक्तिवाद चोडणकर यांच्या वकिलांनी केला.
आमदार नसलेली व्यक्ती आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करू शकते का ? या बाबत सभापतींनी स्पष्टीकरण घेतले. कॉंग्रेसच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्याची प्रत सादर केली. त्या आदेशात कुणीही नागरिक अशा प्रकारची अपात्रता याचिका दाखल करू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी सभापती पडताळणी करून सुनावणीची पुढील तारीख जाहीर करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.