आप सत्तेवर आल्यास ३०० युनिट वीज मोफत

0
99

>> पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांची घोषणा

>> गोमंतकीयांना बदल हवा असल्याचा दावा

राज्यात २०२२ मध्ये आपचे सरकार आल्यास प्रत्येक परिवाराला महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिली जाणार आहे, अशी घोषणा काल आपचे राष्ट्रीय निमंत्रक, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.

राज्यातील नागरिकांना चोवीस तास, अखंडित वीजपुरवठा केला जाणार आहे. वीज बिलांची थकबाकी माफ केली जाणार आहे. तसेच, शेतकर्‍यांना मोफत वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लीतील ७३ टक्के लोकांनी शून्य बिल भरले. आप सत्तेत आल्यानंतर गोव्यातील ८७ टक्के लोकांना शून्य बिल भरावे लागेल. सर्व जुनी बिले माफ केली जातील, भाजप आणि कॉँग्रेसने गोव्यातील जनतेला खूप त्रास दिला, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

गोव्यातील लोक एका पक्षाला मतदान करतात, पण दुसर्‍या पक्षाचे सरकार स्थापन होते. या राजकीय अस्थिरतेला नागरिक कंटाळले आहेत. त्यांना बदल हवा आहे, असेही श्री. केजरीवाल यांनी सांगितले.
मगोपचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांच्यासह अनेक नेत्यांनी आपली भेट घेऊन राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. तथापि, निवडणूक युतीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे केजरीवाल यांनी सांगितले.

आपचा दिल्लीतील कोणताही आमदार भाजपला शरण गेला नाही. गोव्यात आम्ही स्वच्छ राजकारण आणू. आजच्या काळात कॉँग्रेस किंवा भाजपमध्ये काही फरक नाही. तुम्ही कोणत्याही पक्षाला मत दिले, तरी ते भाजपला जाईल, असेही श्री. केजरीवाल यांनी सांगितले.

गोवा राज्यासाठी विजेसंबंधीची मुख्य समस्या सोडविण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे, असे केजरीवाल म्हणाले. सरकार स्थापन करण्यासाठी आमदार दुसर्‍या पक्षाकडे जेव्हा स्थलांतर करतात. तेव्हा निवडणूक एक रंगमंच ठरतो. आम्हाला राजकारण कसे करावे हे माहीत नाही, असेही केजरीवाल यांनी म्हटले. गोव्यातील काजू शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने आपचे राष्ट्रीय निमंत्रक केजरीवाल यांची भेट घेऊ न एक निवेदन सादर केले. काजू शेतीसंदर्भात एमएसपीशी संबंधित मुद्यांचा उल्लेख केला. यावेळी आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे, उपाध्यक्ष सुरेल तिळवे, ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांची उपस्थिती होती.

भाजपवर परिणाम नाही ः तानावडे
दिल्लीचे मुख्यमंत्री, आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या मोफत वीज देण्याच्या घोषणेचा भाजपच्या मताधिक्क्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. गोव्यातील लोकांचा भाजप सरकारवर पूर्ण विश्वास आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली म्हणजे गोवा नव्हे हे केजरीवाल यांनी लक्षात घेतले पाहिजे. भाजप सरकारकडून महिला, युवती व इतरांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे केजरीवाल यांनी केलेल्या मोफत विजेच्या घोषणेमुळे भाजपच्या मताधिक्क्यात कोणतीही कमी होणार नाही. आप या पक्षाकडून केवळ निवडणुकीच्या काळात घोषणाबाजी केली जाते, असेही तानावडे यांनी म्हटले आहे.