- ॲड. अशोक मोये
अमेरिका, इस्रायल, इराण, रशिया, युक्रेन या राष्ट्रांमधील जरी ही युद्धे असली तरी संपूर्ण मानवजातीला त्यांचा जबरदस्त तडाखा बसत आहे. म्हणूनच मानवतेचा विनाश टाळण्यासाठी प्रत्येक राष्ट्राने पुढे येऊन ही युद्धे रोखली पाहिजेत.
आमच्या 1966 मधील बी.कॉम.च्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमातील ‘नागरिकशास्त्र’ (सिव्हिक्स) या विषयाच्या पुस्तकात सुरुवातीलाच ‘मॅन इज ए सोशल ॲनिमल’ (माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे) अशी अवघ्या सहा शब्दांत माणसाची व्याख्या दिली असल्याचे आठवते. अर्थातच त्या व्याख्येचे खोल असे विश्लेषण न करता ‘सोशल’ या शब्दाचा मराठीत ‘सामाजिक’ असा अर्थ आहे, हे इंग्रजी-मराठी कोशात पाहून ती व्याख्या लक्षात ठेवली आणि अजूनही ती माझ्या डोक्यात जणू ठाण मांडून बसली आहे.
साठ वर्षांपूर्वीच्या काळातील माणसाच्या वागणुकीची वर्तमान काळातील त्याच्या वागणुकीशी तुलना केल्यास, तसेच त्याचे विश्लेषण केल्यास, त्या काळातील वागणुकीला अनुसरून ती व्याख्या बरोबर होती असे वाटते. परंतु वर्तमान काळात ती व्याख्या अंशतः बरोबर असल्याचे वाटते. कारण वर्तमान काळातील बहुतेक माणसांच्या वागणुकीत स्वार्थाचाच जास्तीत जास्त प्रभाव असल्याचे आढळून येते, आणि त्यामुळेच ‘मॅन इज ए सोशल आणि सेल्फिश ॲनिमल’ (माणूस हा एक सामाजिक आणि स्वार्थी प्राणी आहे) अशी सुधारित व्याख्या दिल्यास ती बरोबर होईल असे मला वाटते.
त्या काळातही माणूस नक्कीच स्वार्थी होता; परंतु वर्तमान काळासारखा अतिस्वार्थी नक्कीच नव्हता, हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवांवरून ठामपणे सांगू शकतो. अर्थात ह्या माझ्या मताच्या समर्थनार्थ मी अनेक उदाहरणे देण्याऐवजी फक्त एकच संवेदनशील उदाहरण दिल्यास मी नक्कीच माझ्या मताचे पूर्णपणे समर्थन करू शकतो. उदाहरण असे-
वर्तमान काळातील बहुतेक मुले आपल्या अतिस्वार्थी वृत्तीमुळेच आपल्या वृद्ध आईवडिलांना जणू लांच्छनास्पद वागणूक देत असल्याचे आढळून येते. आपल्या अतिस्वार्थी वृत्तीमुळे आपल्या वृद्ध तसेच आजारी आईवडिलांना वृद्धाश्रमात जणू ते फेकून देतात असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण सद्य परिस्थितीत अनेकजण त्यांना वृद्धाश्रमात ठेवल्यावर तिथे जाऊन त्यांची साधी विचारपूसही करीत नाहीत. विचारपूस करायला गेल्यास आपल्या खिशातून वेळोवेळी पैसे काढावे लागतील, पुन्हा पुन्हा बोलावले गेल्यास त्रास होईल, आपला मूल्यवान वेळ वाया जाईल असे त्यांना वाटते. मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवल्यास आपण वरील गोष्टी नक्की टाळू शकतो याच स्वार्थी विचाराने ते आपल्या जीवनातील वागणुकीत अतिस्वार्थी असे बदल घडवून आणतात. अर्थातच अशा वागणुकीत पुरेपूर स्वार्थ दडल्याचे प्रतीत होते. अशी वागणूक माणसाच्या माणुसकीला मुळीच साजेशी नाही.ामुळेच कौटुंबिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही जणू वैर निर्माण होत आहे. अनेक कुटुंबांतील नातीगोती संपुष्टात येतात. माणसामाणसांतील मित्रत्वाचे संबंध दुरावले जातात. तसेच कौटुंबिक संपत्तीमुळे अनेकांना कोर्टकचेऱ्यांच्या पायऱ्या चढाव्या लागतात.
‘वैर हे मरणापर्यंतच कायम असते’ हे वाक्य रामायणात वाचल्याचे आठवते. कारण मरणानंतर माणसाचे अस्तित्वच नष्ट होत असते. परंतु वर्तमान काळातील कौटुंबिक वैर हे जणू पिढ्यान्पिढ्या ठाण मांडून बसलेले आढळून येते.
राष्ट्रीय स्तरावरही केवळ स्वार्थामुळेच राज्यांमध्ये मतभेद होत असतात, कटुता निर्माण होत असते. उदाहरणार्थ, म्हादई नदीच्या पाणी वाटपावरून गोवा-कर्नाटक-महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये गेली कित्येक वर्षे वादविवाद चालू आहेत. हा प्रश्न केवळ त्या राज्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळेच बराच काळ भिजत पडलेला आहे. वास्तविक तो वाद तीन राष्ट्रांमधील नसून आमच्याच तीन राज्यांमधील असल्यामुळे त्याच्यावर सामोपचाराने योग्य तोडगा काढणे शक्य आहे. परंतु असा तोडगा काढण्यास त्यांचा स्वार्थ आडकाठी आणत आहे.
गेली जवळपास चार वर्षे सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धातही रशियाचा स्वार्थ दडलेला आहे. वास्तविक या युद्धाची सुरुवात रशियाने युक्रेनचा ‘नाटो’प्रवेश रोखण्यासाठी केली होती. पण हा एक जगासमोर केलेला बहाणा आहे. रशियाचे सर्वेसर्वा पुतीन यांनी हे युद्ध युक्रेनला गिळंकृत करण्यासाठीच सुरू केल्याचे उघड होत आहे. कारण या युद्धामुळे युक्रेनचा बराच मोठा भूभाग रशियाच्या ताब्यात आला असून, कोणत्याही परिस्थितीत आपण तो युक्रेनला परत करणार नसल्याचे पुतीन सांगत आहेत, यावरून हे स्पष्ट होते. आणि त्यामुळेच पुतीनच्या स्वार्थी वृत्तीमुळेच हे युद्ध लवकर संपुष्टात येईल असे दिसत नाही. अर्थातच रशियाच्या स्वार्थी वृत्तीमुळेच युक्रेन आणि रशियात वैर निर्माण झाले आहे.
गेल्या 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायल या देशांनी संयुक्तपणे इराणवर हल्ले केले. यातही अमेरिकेचा स्वार्थ दडलेला आहे. वास्तविक अमेरिका-इस्रायलने हे युद्ध इराणला आण्विक अस्त्रांच्या उत्पादनापासून रोखण्यासाठी सुरू केले, असे भासवले जात आहे. तसे अमेरिकेचे सर्वेसर्वा ट्रम्प वारंवार सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात अमेरिकेने हे युद्ध इराणमध्ये सत्तापालट करण्यासाठीच सुरू केल्याचे दिसून येते. अमेरिकेला येनकेनप्रकारे इराणची सत्ता आपल्या मर्जीतल्या माणसाच्या ताब्यात द्यायची असून, त्यात यश आल्यास आपण इराणच्या प्रचंड अशा तेलसाठ्यावर कब्जा करू शकतो, त्या साठ्याचा आपल्या मर्जीनुसार वापर करू शकतो, याच अतिस्वार्थी हेतूने हे युद्ध सुरू झाले आहे. मात्र या युद्धामुळे तेलाची कमतरता भासत असून विश्वात अस्थिरता निर्माण झाली आहे. आतापर्यंत अमेरिका, इस्रायल, इराण तसेच इतर अनेक अरब राष्ट्रांचे प्रत्येकी अब्जावधी रुपयांचे विविध प्रकारे नुकसान झाले आहे. तरीदेखील अमेरिकेला आपला स्वार्थी उद्देश साध्य करायचा असल्यामुळे हे अति संहारक युद्ध गेले दोन आठवडे चालू आहे. त्याचे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर विपरित परिणाम झाले आहेत. अमेरिकेच्या केवळ स्वार्थी वृत्तीमुळेच हे चालू असून, आता त्याचे जागतिक युद्धात रूपांतर होण्याचे संकेत मिळत आहेत. तरीदेखील अमेरिकेला आपल्या स्वार्थासमोर कुणाचीच पर्वा वाटत नाही. त्यामुळे सध्यातरी युद्धविराम होणे अशक्य वाटते.
अर्थातच वरील उल्लेखीत अनेक उदाहरणांतून ‘आला मानव या संसारी, आपण आपला वैरी झाला’ या सुंदर अभंगाच्या ओळी आठवू लागतात. खरे तर ही युद्धे जरी रशिया, युक्रेन, अमेरिका, इस्रायल, इराण तसेच इतर अनेक अरब राष्ट्रांमधील असली तरीदेखील अखेरीस ती मानवजातीतील माणसामाणसांमधील युद्धे असल्यामुळे संपूर्ण मानवजातीला त्यांचा जबरदस्त तडाखा बसत आहे. म्हणूनच मानवतेचा विनाश टाळण्यासाठी ही युद्धे स्वार्थ बाजूला सारून, प्रत्येक राष्ट्राने पुढाकार घेऊन ती संपुष्टात आणण्याची गरज आहे.
यानिमित्ताने एक गाणे आठवले-
जीवन सुख दुःखाची जाळी
त्यात लटकले मानव कोळी
एकाने दुसऱ्यास गिळावे…
हाच जगाचा न्याय खरा
हीच जगाची परंपरा
जपून टाक पाऊल जरा
जपून टाक पाऊल… ।
स्वार्थामुळेच माणसामाणसांत वैर निर्माण होत आहे आणि त्यामुळेच माणसाने हा स्वार्थ बाजूला सारून जपून पावले टाकणे गरजेचे आहे. या क्षणी स्वार्थापोटी विश्वात चाललेली सर्व युद्धे थांबवून शांतता प्रस्थापित करण्याची खरी गरज आहे.