‘आप’चे उमेदवार लवकरच

0
80

>> दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांची माहिती

 

भविष्यात गोव्यात आपचे सरकार सत्तेवर आल्यास बिर्ला झुआरीनगर तसेच गोव्यातील इतर झोपडपट्‌टीवासियांना स्वत:ची घरे बांधून देण्यासाठी पक्षातर्फे प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी काल येथे केले. विधानसभा उमेदवारांची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे जैन यांनी यावेळी सांगितले. जैन यांनी बिर्ला झुआरीनगर येथील लमाणी वसाहतीत झोपडपट्‌टीतील कुटुंबांची तसेच मजूर लोकांची भेट घेतली व तेथील लोकांशी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. येथील लोकांच्या अनेक वर्षापासून कुठल्याच सरकारने विकास केलेला नसल्याचा आरोप जैन यांनी केला. बिर्ला तसेच गोव्यातील इतर झोपड्यातील युवकांना चांगले शिक्षण व येथील लोकांना त्यांची स्वत:ची घरे मिळवून देण्यासाठी आमचा पक्ष सत्तेवर आल्यास शंभर टक्के पुढाकार घेईल असे ते म्हणाले. पुढच्या दहा दिवसानंतर आम आदमी पक्षाच्या गोव्याच्या विधानसभा निवडणुकीतील आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात करणार असल्याची त्यांनी माहिती दिली. जैन यांच्या समवेत जि.पं.चे सदस्य नेली रॉड्रिगीस उपस्थित होते. दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीत कुठ्‌ठाळी मतदार संघातून आपण निवडणूक लढविणार असल्याचे रॉड्रिगीस यांनी पत्रकारांना सांगितले.