आध्यात्मिक पैलूंकडे दुर्लक्ष नको

0
278

योगसाधना – ४८९
अंतरंग योग – ७४

  • डॉ. सीताकांत घाणेकर

सर्वत्र घडत असलेल्या घटना ऐकल्या- वाचल्या- बघितल्या की विचार येतो- आपण भारतीय लोक कां आपल्या पवित्र संस्कृतीचे पालन करीत नाही व पाश्‍चात्त्यांच्या संस्कृतीचे अंधानुकरण का करतो? आम्हाला शहाणपण केव्हा येईल?

श्रीमद्भगवद्गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘क्षेत्र क्षेत्रयोर्ज्ञानं..’ या तेराव्या अध्यायात शरीर हे कसे क्षेत्र आहे हे समजावले आहे. आपणातील बहुतेक जण या उच्च तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत नाही. अभ्यास सोडाच, गीतादेखील नियमित वाचत नाही. त्यामुळे ‘जीव- जगत- जगदीश’ यांच्या परस्पर संबंधाविषयीसुद्धा पुष्कळ अज्ञान आहे. एकवेळ अज्ञान चालेल पण विपरीत ज्ञान महाभयंकर व विनाशकारी आहे.
विश्‍वाकडे नजर टाकली की हा विनाश सहज दिसून येतो. आपण फक्त त्याबद्दल दुःख व्यक्त करतो. चिंता व्यक्त करतो पण त्याची कारणे समजून घेण्याचा प्रामाणिक व नियमितपणे प्रयत्न करीत नाही. त्यामुळे विनाश वाढतो आहे. संपूर्ण विश्‍वाची विनाशाकडे घोडदौड चालूच आहे. आपण वरवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. फक्त ठिगळ लावणे चालू आहे. मुळाशी जाऊन जीवनाचे तत्त्वज्ञान जाणण्याचा प्रयत्नच आपण करीत नाही.
कोरोनाच्या रूपाने खरे म्हणजे सृष्टिकर्त्याने इशारा दिलेला आहे. संकटाला सामोरे जाण्याची धडपड काही क्षेत्रांत- वैज्ञानिक, आर्थिक, भौतिक, सामाजिक क्षेत्रांमध्ये धडपड चालू आहे. पण आध्यात्मिक पैलूंकडे दुर्लक्ष होत आहे. अपवाद जरूर आहेत. बहुतेकजण अशा लोकांकडे बघताना… ‘ते मूर्ख आहेत…’ अशा नजरेने पाहतात. पण कालांतराने सत्य झाकून राहणार नाही. जसा सूर्य काळ्या ढगांमध्ये गेल्यामुळे किंवा काळे ढग त्याच्यापुढे आल्यामुळे थोडा वेळ अदृश्य होतो पण नंतर परत आकाशात स्वतःचे तेज दाखवतो. तसाच आध्यात्मिक ज्ञानाचा हा सर्वशक्तिशाली सूर्य एक दिवस आपले तेज दाखवणार कारण सत्याला त्याची स्वतःची ताकद असते.

भगवंत पाचव्या श्‍लोकात या क्षेत्राचे स्वरूप व सहाव्या श्‍लोकात त्याचे विकार सांगतात-

  • पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त (प्रकृती), दहा इंद्रिये, एक मन, इंद्रियांचे पाच विषय (श्‍लोक पाचवा)
  • इच्छा, द्वेष, सुखदुःख, संघात (शरीर व इंद्रिये यांचा संयोग), चेतना आणि धृति (धैर्य)- (श्‍लोक सहावा)
  • या इतक्या तत्त्वांच्या समुदायास संक्षेपाने सविकार क्षेत्र असे म्हटले आहे (गीता- अ. १३ श्‍लोक ५, ६) इथे चवथा श्‍लोक वाचला तर भगवंताची नम्रता लक्षात येते. ते म्हणतात- * हे क्षेत्रक्षेत्रज्ञ ज्ञान अनेक ऋषींनी, ऋग्वेदादि वेदांनी आणि हेतूपूर्वक निश्‍चित केलेल्या ब्रह्मसूत्रातील पदांनी बहुत प्रकारे गायले आहे.
    सूक्ष्म लक्ष देऊन अभ्यास केला तर लक्षात येते की सुरुवातीला चवथ्या श्‍लोकांत श्रीकृष्ण हे सांगतात व नंतर पाचव्या- सहाव्या श्‍लोकात मानव जीवनाचे फार मोठे तत्त्वज्ञान सांगतात. किती नम्रता ही! आणि आपण? सर्व ज्ञान आपलेच आहे असा अहंकार ठेवून बोलतो.
    तद्नंतर सातव्या ते दहाव्या श्‍लोकांत मानवाकडून काय अपेक्षा आहेत हे सविस्तरपणे समजावतात…
  • मान नसणे, दंभ नसणे, अहिंसा, शांती (क्षमाशीलता), आर्जव (सरळपणा), गुरूसेवा, अंतर्बाह्य शचिर्भूतता, स्थैर्य, आत्मसंयम (मनोनिग्रह)- श्‍लोक ७वा.
  • विषयाविषयी वैराग्य, अहंकाराचा अभाव, जन्म-मृत्यू-जरा (वार्धक्य)- व्याधि- दुःख यांच्या ठिकाणी वारंवार दोषदृष्टीने पाहणे. (श्‍लोक ८ वा)
  • अनासक्ती, स्त्रीपुत्रगृह, इत्यादीकात आसक्ती नसणे, इष्ट किंवा अनिष्ट प्राप्त झाले तरी नेहमी चित्ताची समता (श्‍लोक ९ वा)
  • माझ्या ठायी अनन्य भावाची अढळ भक्ती, एकांतवास, लोकसमुदायात जाण्याचा कंटाळा (श्‍लोक १०वा)
    त्यानंतर भगवंत ज्ञान व अज्ञान याबद्दल स्पष्ट करतात-
  • अध्यात्मज्ञानाचे नित्य अनुशीलन, तत्त्वज्ञानाच्या अर्थाचे (मोक्षाचे) आलोचन यांना ज्ञान असे म्हणतात. याहून जे विपरीत ते अज्ञान (गीता- १३.१२)
    खरे म्हणजे आपल्यातील प्रत्येक व्यक्तीने गीतेतील अशा अत्यंत उपयुक्त व आवश्यक अशा तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणे स्वविकास व स्वकल्याणासाठी जरुरी आहे. आजच्या कराल कलियुगात तरी फार गरजेचे आहे.
    निदान योगसाधक तरी समजून त्याप्रमाणे अभ्यास, चिंतन, आचरण करतील ही अपेक्षा. कारण योगसाधनेचे फायदे व शक्ती यांचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. महाभारतातील गीतारूपी दीपस्तंभाबरोबर आपले दुसरे महाकाव्य- रामायण यांचादेखील अभ्यास इथे सुरू आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय, यांच्या म्हणण्यानुसार रामायणातील विविध पात्रे व त्यांचा गर्भितार्थ व आध्यात्मिक अर्थ आपण समजून घेत आहोत.
    त्यांच्या मतानुसार प्रभू रामाची अर्धांगिनी – ही आत्मारूपी सीता आहे. आत्मा पवित्र आहे त्यामुळे तिच्याकडून काही अपेक्षा आहेत. त्यातील एक म्हणजे लक्ष्मणरेषेचे उल्लंघन न करणे.

रामायणातील कथेचा संदर्भ इथे उपयोगी होतो. वनवासात असताना सीतेला सोन्याचे हरीण दिसते. खरे तर तो म्हणजे रावणाने पाठवलेला मायावी राक्षस, मारीच असतो. तो मायावी राक्षस हरणाचे रूप घेतो. सीतेला त्या सोन्याच्या हरणाचा मोह होतो. रामाकडे ती त्या हरणाच्या प्राप्तीची इच्छा प्रकट करते. राम हरणाच्या मागे जातो.
थोड्या वेळाने ‘लक्ष्मणा वाचव’ असा रामाचा आवाज ऐकू येतो. सीता लक्ष्मणाला रामाच्या मदतीला जायला सांगते. लक्ष्मण नकार देतो कारण सीतेला सांभाळण्याचे कार्य राम त्याच्यावर सोपवून गेले होते.
मोहामुळे सीता लक्ष्मणाला काही अपशब्द बोलते. म्हणून नाइलाजाने त्याला जंगलात जावे लागते. खरे म्हणजे लक्ष्मणाला खात्रीच असते की रामाला कुणाच्याही मदतीची गरज नाही. पण आपल्या वहिनीची आज्ञादेखील त्याला पाळावी लागते.

जाताना तो तीन रेषा (मंत्ररूपी) काढतो व सीतेला सांगतो की यांच्या पलीकडे जाऊ नको. हीच ती ‘लक्ष्मणरेषा’.
पुढील कथा सर्वांना माहीत आहे. रावण सन्याशाच्या रुपात येऊन आपल्या धूर्त बोलण्याने तिला लक्ष्मणरेषेचे उल्लंघन करण्यास भाग पाडतो व तिला उचलून लंकेकडे प्रयाण करतो.
आपण नेहमी म्हणतो की कथा ही बोध घेण्यासाठी असते. तिथे बारीकसारीक घटनांचा किस काढायचा नसतो. आपल्या संदर्भाप्रमाणे …

  • स्त्रियांना सोन्याचा मोह असतो.
  • माया एवढी शक्तीशाली आहे की ती ज्ञानाला आवरण घालते.
  • रावण हे मायेचे प्रतीक आहे- पाच विकाररूपी.
    त्यामुळे एखाद्या सूज्ञ, सात्विक, शालीन व्यक्तीचीदेखील दिशाभूल होते. त्याच्याकडून मायेच्या प्रभावामुळे महाभयंकर चूक होऊ शकते. मग त्याचे परिणामही भयानक असतात.
    म्हणून आपण या मायारूपी मारीच व रावणाचा वध करणे आवश्यक आहे. म्हणूनच दसर्‍याला रावण वध केला जातो.

‘लक्ष्मण’ या शब्दाचा अर्थसुद्धा बोधप्रदच आहे. ‘लक्ष्मण’ म्हणजे मनाचे ‘लक्ष्य’. त्याने काढलेल्या लक्ष्मणरेषा मायेच्या प्रभावामुळे आपण विसरतो व त्रासात पडतो. मन आपल्या लक्ष्यावर राहात नाही.
आजही संस्कृतीने ज्ञानपूर्वक घातलेल्या लक्ष्मणरेषा आपण पाळत नाही त्यामुळे समाजात अनैतिकता झपाट्याने पसरते आहे.
यामध्ये एक प्रमुख म्हणजे माणसाचे शील- स्त्री-पुरुष दोघांनीही काटेकोरपणे पालन करायला हवे. जास्त करून स्त्रियांकडून तशी अपेक्षा जास्त असते कारण समाजव्यवस्था तशी आहे. आज स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार पसरत आहे. शील-पालन अपेक्षेप्रमाणे होत नाही. त्यामुळे आजच्या पवित्र सीतेचेसुद्धा समाजातील रावण अपहरण करीत आहेत.
सर्वत्र घडत असलेल्या घटना ऐकल्या- वाचल्या- बघितल्या की विचार येतो- आपण भारतीय लोक कां आपल्या पवित्र संस्कृतीचे पालन करीत नाही व पाश्‍चात्त्यांच्या संस्कृतीचे अंधानुकरण का करतो?
आम्हाला शहाणपण केव्हा येईल? आता कितीतरी उशीरच झालेला आहे. सूज्ञ व्यक्ती यावर विचार करतील का? की हे असेच चालू राहायचे?
भगवंत अत्यंत दयाळू, कृपाळू, क्षमाशील आहे. खर्‍या साधकाला तो नक्की मार्गदर्शन करेल. संरक्षण देईल. (संदर्भ ः श्रीमद्भगवद्गीता; भारत के त्यौहार – प्रजापिता ब्रह्माकुमारी)