आधुनिक रस्त्यांमुळे देशाच्या प्रगतीला गती

0
9

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

>> दिल्ली-मुंबई महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

आधुनिक रस्त्यांमुळे देशाच्या प्रगतीला गती मिळत आहे. आधुनिक रेल्वेस्थानके, रेल्वे ट्रॅक, मेट्रो आणि विमानतळ यांचे देशभरात बांधकाम सुरू आहे. त्यामुळ देश प्रगतिपथावर पोहोचला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात लांब असेलल्या दिल्ली-मुंबई महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. या एक्सप्रेस-वेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदीबोलत होते.

पंतप्रधान मोदी यांनी, पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक आणखी गुंतवणूक मिळण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळेच केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर सातत्याने मोठी गुंतवणूक करत आहे. गेल्या 9 वर्षांपासून आम्ही पायाभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक करत असून आज दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचा पहिला टप्पा देशाला समर्पित करताना मला खूप अभिमान वाटत आहे. हा देशातील सर्वात मोठा आणि आधुनिक द्रुतगती मार्गांपैकी एक आहे. हे विकसित भारताचे आणखी एक भव्य चित्र असल्याचे सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी अधिक माहिती देताना, या प्रकल्पांमुळे आगामी काळात राजस्थानसह संपूर्ण प्रदेशाचे चित्र बदलणार आहे. या आधुनिक कनेक्टिव्हिटीचा फायदा सरिस्का व्याघ्र प्रकल्प, केवलदेव आणि रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, जयपूर, अजमेर यासारख्या अनेक पर्यटन स्थळांना होईल. राजस्थान पूर्वीपासूनच देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षक आहे, आता त्याचे आकर्षण आणखी वाढणार असल्याचे सांगितले.

मुंबई-दिल्ली 12 तासांत

मुंबई-दिल्ली हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई प्रवासाचा वेळ वाचणार आहे. पूर्वी या प्रवासाला 24 तास लागायचे, आता हा प्रवास निम्म्या वेळेत म्हणजेच केवळ 12 तासांत पूर्ण होणार आहे. हा एक्सप्रेसवे (दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे) दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून जाणार आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा दिल्ली-दौसा-लालसोट टप्पा 246 किमी लांबीचा आहे. 12,150 कोटी रुपये खर्च करून तो विकसित करण्यात आला आहे. हा टप्पा सुरू झाल्याने दिल्ली ते जयपूर प्रवासाचा वेळ पाच तासांवरून साडेतीन तासांवर येणार आहे. तर दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे असेल, ज्याची एकूण लांबी 1,386 किमी आहे.