आत्म्याची परमात्म्याशी तादात्म्यता

0
16

योगसाधना- 599, अंतरंगयोग- 184

  • डॉ. सीताकांत घाणेकर

नकारात्मक प्रवृत्तीच्या आत्म्यांची आठवण केली तर त्रासच होईल. त्याऐवजी जर भगवंताची याद केली तर त्याची शक्ती आपल्या मनबुद्धीत, आत्म्यात येईल. आत्मशक्ती वाढेल. जीवनविकास होईल. त्यामुळे ध्यान करताना परमात्म्यात मन एकाग्र करायला सुचवले जाते.

विश्वात प्रत्येक व्यक्तीची विविध कामे असतात- कौटुंबिक, सांसारिक, सामाजिक वगैरे. अनेक तऱ्हेचे धंदे, पेशे असतात. हे सर्व व्यवस्थित, निर्विघ्नपणे चालावे अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीची असते. आपण सर्व गोष्टी होतील तेवढ्या बरोबर करण्याचा प्रयत्न करतोच, पण त्याचबरोबर भगवंताची कृपादृष्टी आपल्यावर व स्वतःच्या कामावर असावी अशी इच्छा सर्वांचीच असते. त्यासाठी आपण तज्ज्ञांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे अनेक कर्मकांडे उदा. पूजाअर्चा, होमहवन… वगैरे करतो. तसेच संत, महापुरुष, घरचे वडीलधारे यांचे आशीर्वाद, इतर नातेवाईक व मित्र यांच्या शुभेच्छा घेतो… अशा या सर्व गोष्टी बाहेरच्या झाल्या.
सर्व कर्मकांडे व्यवस्थित व्हावीत याकडे आपण कटाक्षाने लक्ष देतो. उदा. पूजेसाठी आणायचे सर्व साहित्य- फुले, पाने, तेल, तूप, कापूर, अगरबत्ती- भटजीने दिलेल्या यादीप्रमाणे आणतो. तसेच घराची साफसफाईही करतो. वास्तुशास्त्राप्रमाणे कुठल्या दिशेला तोंड करून बसायचे याचे मार्गदर्शनदेखील घेतो. म्हणजे कर्मकांडात व पुढच्या कामात कसलेही विघ्न नको. आणि यात चूक असे काहीही नाही. शास्त्रमान्य आहे हे सगळे, तसेच समाजमान्यदेखील आहे.
पिढ्यान्‌‍पिढ्या या सर्व गोष्टी चालू आहेत. त्यासाठी जसे वैद्यकीय अथवा इतर शास्त्रांत तज्ज्ञ, स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट असतात तसेच येथेदेखील काही ठरलेले विशिष्ट तज्ज्ञ असतात. ते सर्व कर्मकांड विधीपूर्वक सांगतात व करतात. त्यामुळे आपण निर्धास्त राहतो.
बहुतेकजण हे सर्व करतात कारण मनात एक सुप्त भीती असते- काही गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत तर अनपेक्षितरीत्या नको असलेली कदाचित विघ्ने येतील, संकटे येतील.
काही वेळा कर्मकांडात काही मंत्र, स्तोत्र म्हणायचे असतात. साधारण मान्यता असते की यांचे उच्चारण शुद्ध व्हायला हवे. पण बहुतेकांची अडचण अशी असते की, हे मंत्र, स्तोत्रे संस्कृत भाषेत असतात आणि आम्हाला ती म्हणायची सवय नसते. त्यामुळे पुजारी म्हणायला सांगताना चित्त एकाग्र ठेवावे लागते. काही वेळा पुस्तक समोर ठेवून आपण शुद्ध म्हणायचा प्रयत्न करतो. तसे केले तरीदेखील शुद्ध उच्चार येतीलच याची खात्री नसते. कारण संस्कृत भाषेकडील आपला संपर्क तुटलेला असतो. तसेच या भाषेत मोठमोठे लांबलचक शब्द व जोडाक्षरे असतात. त्यामुळे मनात एक धास्ती असू शकते. आता तर नव्या कथाकथित प्रागतिक शिक्षण पद्धतीमुळे अनेक तरुण-तरुणींना देवनागरी वाचताच येत नाही. आले तर तुटक, अशुद्ध.
सारांश काय तर आपले लक्ष बाहेरच्या गोष्टींवर जास्त असते आणि तेदेखील भीतीपोटी. शास्त्रकार म्हणतात की सर्व गोष्टी व्यवस्थित करणे आवश्यक आहेच; पण त्याचबरोबर भीतीऐवजी भगवंतावर प्रीती ठेवावी. जीवन, आप्तेष्ट यांच्यावर प्रेम करावे म्हणजे सर्व कर्मकांड व्यवस्थित अन्‌‍ शांतीपूर्ण पार पडेल.
मंत्र, स्तोत्र उच्चारणाला महत्त्व आहेच. त्यामुळे शास्त्राप्रमाणे व्यक्तीची आत्मशक्ती वाढते, चिंता कमी होते आणि भगवंताकडे योग घडतो (योग म्हणजे भगवंताकडे लक्ष, ध्यान- त्याच्याशी भावमीलन). येथे मुख्य मुद्दा चित्त एकाग्रतेचा आहे. त्यातच तर पूजेची, कर्मकांडाची सफलता आहे म्हणजेच आत्मशक्तीची वृद्धी होण्यात आहे. भगवंतावर प्रेम वाढते. मन शांत राहते.
बहुतेकवेळा आपण शारीरिकदृष्ट्या पूजा करीत असलो तरी मन अनेकवेळा बाहेर जाते- संसारात, ऑफिसात… विश्वात. मनात विविध विचार चालूच असतात. त्यामुळे किती वेळा पूजा केली हे महत्त्वाचे नसून किती वेळ मन भगवंताकडे होते हे महत्त्वाचे आहे.
प्रत्येकाच्या जीवनात असे कितीतरी अनुभव असतात. अनेकवेळा आपल्या समोरून ओळखीची व्यक्ती जाते. डोळे तिला बघतात पण मनाला ती दिसत नाही. मग आपण सहज म्हणतो- ‘माझे लक्षच नव्हते!’
आपण देवीच्या मंदिरात जातो व प्रार्थना म्हणतो- ‘त्वमेव माता, पिता त्वमेव…’ देवीला आनंद होतो. माझा लाडका भक्त मला माता-पिता मानतो. पण तेवढ्यात बाहेर उंबरठ्याकडे ठेवलेल्या नव्या चप्पलांची आठवण येते. सहज विचार येतो- ‘कुणी चप्पले चोरून तर नेणार नाही ना?’ प्रार्थना चालूच असते. ‘त्वमेव बंधु, सखा त्वमेव…’ म्हणजे बंदू, सखा कोण झाला?
एक घडलेली घटना आठवली. कुणीतरी सांगितलेली. एक पोलीस कमिशनर म्हणे श्रीकृष्णाची पूजा करीत होता. एवढ्यात एक शिपाई त्याच्याकडे आला आणि त्याला सांगितले की रात्री पकडलेला खुनी पळून गेला. त्याला एवढा राग आला की आधी त्याने त्याला शिवी दिलीच, पण पूजेतली श्रीकृष्णाची मूर्ती म्हणे त्याच्यावर फेकून मारली. देव ‘साध्य’ होता, त्याला त्याने ‘साधन’ केले. घटनेची सत्यसत्यता न बघता त्यातून बोध घ्यावा- आपली चित्त एकाग्रता असते का? अशा कर्मकांडाचा अपेक्षित फायदा होईल का?
शेवटी देवाला फुले, फळे पाहिजेत का? ती तर त्यानेच बनवलेली. आपण फक्त त्याच्यासमोर ठेवली. पूजेतील प्रसाद तो खातो का? तो शेवटी नैवेद्य म्हणून आपणच खातो. या कर्मकांडातील भाव समजायला हवा- मी माझे जीवन फुलासारखे सुगंधित करीन आणि तुझ्या चरणांकडे येईन. माझे जीवन तुला समर्पित करीन. एखाद्या फळासारखे इतरांचे जीवन पौष्टिक बनवीन. मी नैवेद्यासारखा गोड होईन. मधुर शब्द बोलेन. शेवटी देव ‘भावाचा’ भुकेला असतो.
एखाद्या दूर अशा पवित्र ठिकाणी आपण कर्मकांड करण्यासाठी जातो. पायऱ्या उतरून पवित्र नदीत स्नान करतो (गंगास्नान). तद्नंतर मंदिरात पूजा करतो. मन प्रसन्न होते. इतका वेळ यासाठी दिला, पण मुख्य मुद्दा म्हणजे आत्मशक्ती वाढली? मन कुठे होते? कर्मकांडांत, भगवंतात की आपल्या संसाराच्या व्यापात? येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची ती ही की स्वतः केलेल्या कर्मकांडाचा दर्जा वाढवायचा. उगाच करावे म्हणून कर्मकांड करू नये.
आई मुलापासून दूर असते. ती आपल्या कामात व्यस्त असते. पण तिचे मन तिच्या मुलाचे विचार करते. तो जिथे असेल तिथे ठीक असेल ना? कारण तिचे मुलावर प्रेम असते. त्यामुळे चित्तएकाग्रता सहज साधते. भगवंताकडे चित्तएकाग्रता साधण्याचा हाच एक साधा, सोपा उपाय. त्याच्याबद्दल उत्कट प्रेम, भाव व कृतज्ञता ठेवली तर मन त्याच्यात सहज गुंतेल. आपल्या महान अशा संतांनी तर हेच केले- मग ती व्यक्ती कुणीही असू दे- ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम, सावता माळी, नरहरी सोनार, मुक्ताबाई, जनाबाई, एकनाथ… ही सगळी आठवली तरी आपला भाव उचंबळून येतो. म्हणून पंढरपूरला विठ्ठलाबरोबर त्यांच्या नामाचा गजर केला जातो.
आजच्या जमान्यात विविध चॅनल्स आहेत- रेडिओचे, टीव्हीचे… इंटरनेटचे तर काय विचारूच नका. विविध वेबसाईटस्‌‍ आहेत. प्रत्येकाला हवे तिथे तो संपर्क केव्हाही साधू शकतो. कितीही वेळ संलग्न राहू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ज्या तऱ्हेची माहिती आपण मिळवतो तिचा परिणाम आपल्या मनबुद्धीवर होतो. सकारात्मक अथवा नकारात्मक. म्हणून प्रत्येकाने दक्षता घ्यायला हवी.
त्याचप्रमाणे आपण गप्पागोष्टी करताना अनेक व्यक्तिमत्त्वांच्या गोष्टी करतो- काही चांगल्या तर काही वाईट. प्रसंगदेखील वेगवेगळे- सुखदायक, दुःखदायक. या सगळ्याचा परिणाम मनावर अवश्य होतो. त्यामुळे कुणाकडे, कसल्या घटनेबाबत संपर्क साधावा हे स्वतःच ठरवावे. नकारात्मक विचारांचा परिणाम वाईट व सकारात्मक विचारांचा परिणाम चांगला होतो. दुर्भाग्याने आजकाल नकारात्मकतेकडे जास्त कल आहे. त्यामुळे मानसिक रोग वाढले आहेत. चिंता वाढली आहे. आत्मशक्ती कमी होत आहे.
म्हणूनच योगसाधनेमध्ये कुणाची आठवण करावी, कुणाकडे योग करावा हे स्पष्ट आहे. नकारात्मक प्रवृत्तीच्या आत्म्यांची आठवण केली तर त्रासच होईल. त्याऐवजी जर भगवंताची याद केली तर त्याची शक्ती आपल्या मनबुद्धीत, आत्म्यात येईल. आत्मशक्ती वाढेल. जीवनविकास होईल. कारण तो तर विविध शक्तींचा महासागर आहे- ज्ञान, सत्य, प्रेम, शांती… तसाच सत्यम्‌‍-शिवम्‌‍-सुंदरम्‌‍ आहे. त्यामुळे ध्यान करताना परमात्म्यात मन एकाग्र करायला सुचवले जाते.
त्यापुढे जाऊन प्रत्येकात भगवंताचे दर्शन करावे. देहभान न ठेवता, देहिभाव ठेवावा. जीवन सुसह्य होईल. पूजेच्या कर्मकांडांतदेखील हेच अपेक्षित आहे.