आता गोव्याला पश्‍चिम ग्रीडवरून वीज पुरवठा

0
120

>> दक्षिण ग्रीडवरून वारंवारच्या व्यत्ययामुळे गोवा सरकारचा निर्णय : मंत्री काब्राल

दक्षिण ग्रीडकडून गोव्याला होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होऊ लागल्याने जनतेची होणारी गैरसोय तसेच व्यावसायिकांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन या ग्रीडवरून गोव्याला होणारा वीजपुरवठा बंद करण्याचा व तो पश्‍चिम ग्रीडवरून घेण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे, अशी माहिती राज्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

कर्नाटकातील आंबेवाडी हा घनदाट जंगलाचा परिसर असून पावसाळ्यात पावसाबरोबरच जोरदार वादळी वारा वाहू लागल्यानंतर या परिसरात सतत वृक्षांच्या फांद्या या वीज वाहिन्यांवर पडून वीजपुरवठा खंडित होत असतो. अशी घटना घडली की कर्नाटकातील वीज अधिकार्‍यांशी संपर्क साधून कोसळलेल्या वीज वाहिन्यांची दुरूस्ती करण्यासाठी कित्येक तास व काहीवेळा एक-दोन दिवसही लागतात. त्यामुळे मोठी गैरसोय निर्माण होते. ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही यापुढे दक्षिण ग्रीडवरून गोव्याला होणारा वीजपुरवठा बंद करून पश्‍चिम ग्रीडवरून वीजपुरवठा घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे काब्राल यांनी स्पष्ट केले. पश्‍चिम ग्रीडवरून होणारा वीजपुरवठा सहसा खंडित होत नसल्याचे आढळून आले आहे, अशी माहितीही काब्राल यांनी यावेळी दिली.
जनतेनेही सहकार्य करावे

राज्यातील लोकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी सर्व ती उपाययोजना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. मात्र, अखंडित वीजपुरवठ्यासाठी राज्यातील जनतेकडूनही सहकार्य हवे असल्याचे काब्राल यांनी यावेळी नमूद केले. अखंडित वीज पुरवठ्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी भुयारी वाहिन्या घालण्याचे काम करावे लागणार आहे. अशा वेळी लोकांनी आपल्या जमिनीत वाहिन्या घालण्यास विरोध करू नये. तसेच आपल्या जमिनीत ट्रान्सस्फॉर्मरही घालू द्यावेत, अशी विनंतीही काब्राल यांनी यावेळी केली.

वीजेचा तुटवडा नाही
गोव्याला लागते त्यापेक्षा कितीतरी जास्त म्हणजेच १ हजार मेगावॅट एवढी वीज मिळत आहे. राज्याला जास्तीत जात ६५० मेगावॅट एवढी वीज लागते. वीजपुरवठा खंडित होत असतो तो विजेचा तुटवडा आहे म्हणून नव्हे तर विजेचे वितरण व्यवस्थितपणे होत नसते म्हणून, असे काब्राल यांनी नमूद केले.
धारबांदोडा येथे नवे ४०० केव्ही वीज उपकेंद्र उभारण्यात येणार असून त्यानंतर दक्षिण ग्रीडवरून वीजपुरवठा पुर्ववत सुरू करण्यात येणार आहे.
थिवीत नवे उपकेंद्र
थिवी येथील वीज उपकेंद्रावरून संपूर्ण उत्तर गोवा व ११० केव्ही कदंब वीज उपकेंद्राला वीज पुरवठा केला जातो. या वीज उपकेंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त भार पडलेला आहे. तेथे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवणेही शक्य नाही. त्यामुळे थिवीत वेगळे वीज उपकेंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. २०२३ सालापर्यंत या वीज उपकेंद्राचे काम पूर्ण होणार आहे. मात्र, तात्पुरता उपाय म्हणून तेथील ४० एमव्हीए ११०/३३ केव्ही वीज ट्रान्सफॉमरची क्षमता ५० एमव्हीए ११०/३३ केव्ही वीज ट्रान्सफॉरमने वाढवण्यात येणार आहे.

याशिवाय आमोणा उपकेंद्र, कदंब पठार उपकेंद्र, वेर्णे उपकेंद्र, फोंडा उपकेंद्र, शेल्डे उपकेंद्र आदी उपकेंद्रांवर आवश्यक ती सुधारणा व बदल घडवून आणण्यात येतील, अशी माहितीही काब्राल यांनी दिली.

पथदीप धोरण तयार करणार
राज्यातील पथदीपांची स्थिती गंभीर असून हा प्रश्‍न प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी सरकार पथदीप धोरण तयार करणार असल्याची माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. खराब झालेले व न पेटणारे पथदीप लवकरच बदलण्यात येणार असल्याची माहितीही काब्राल यांनी यावेळी दिली.

गोवा सरकारने राज्यात पथदीप बसवण्यासाठी ‘ईएसएल’ कंपनीला कंत्राट दिले होते. सदर कंपनीने त्यांना कंत्राट मिळाल्यानंतर राज्यात पथदीप बसवण्याचे उपकंत्राट ‘बीव्हीजी’ या कंपनीला दिले. मात्र, बीव्हीजी कंपनीने हे पथदीप बसवताना सगळा घोळ निर्माण केला. निकृष्ट दर्जाचे पथदीप बसवणे, काही ठिकाणी काम अर्धवट सोडणे असे प्रकार घडलेले असून ही गोष्ट लक्षात घेऊन ईएसएलला दिलेले सदर कंत्राट रद्द करून हे पथदीप बसवण्याची जबाबदारी वीज खात्यावर सोपवण्यात येणार असल्याची माहिती काब्राल यांनी यावेळी दिली.

२ लाख १० हजार पथदीपांची गरज
राज्यातील सर्व रस्त्यांवर पथदीप बसवण्यासाठी गोव्याला २ लाख १० हजार एवढ्या पथदीपांची गजर असल्याची माहितीही काब्राल यांनी यावेळी दिली.

वीजप्रश्‍नी कोणाशीही चर्चेस तयार
राज्यातील विजेच्या प्रश्‍नावर आपण कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांशी जाहीरपण चर्चा करण्यास तयार असल्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी बोलताना सांगितले. काही राजकीय नेते व सरपंच खंडित वीजपुरवठ्याच्या प्रश्‍नावरून सरकार व वीज खात्यावर नाहक आरोप करू लागले आहेत. या लोकांना केवळ प्रसिद्धी हवी आहे, असे सांगून विजेसंबंधीच्या तांत्रिक बाबी काहीही माहीत नसलेले कुणीही वीज खात्यावर व मंत्र्यांवर टीका करू लागले आहेत ते पाहून हंसू येत असल्याचे काब्राल म्हणाले.