- गौतम चिंतामणी
२०१३ साली गोव्यात झालेल्या भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत नरेंद्र मोदी यांचे नाव पक्षाचे निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून तत्कालीन पक्षाध्यक्ष राजनाथसिंग यांनी घोषित केले. तेथूनच मोदींचा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रवास सुरू झाला. गौतम चिंतामणी लिखित ‘राजनीती’ या राजनाथसिंग यांच्या आगामी इंग्रजी चरित्रातील त्यासंबंधीच्या प्रकरणाचा मराठी अनुवाद –
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ताबा घेतल्यापासून काही आठवड्यांतच नरेंद्र मोदी यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे येणार्या निवडणुकीत नेतृत्व सोपविण्याचा विचार मूळ धरू लागला होता. परंतु वस्तुनिष्ठपणे विचार करता, मोदींना पुढे आणणे पक्षाच्या मित्रपक्षांना रुचणार नाही या वास्तवाचीही जाणीव राजनाथ यांना झाली होती. खुद्द भारतीय जनता पक्षामध्येही मोदींना विरोध करणारे पुरेसे होते. तरीही सिंग यांना वाटत होेते की जेव्हा ती घडी येईल तेव्हा पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते यांचे मोदींच्या नेतृत्वाबाबत एकमत होईल.
सिंग यांना मोदींना होणार्या विरोधाची पहिली चाहुल तेव्हा लागली, जेव्हा लालकृष्ण अडवाणींसह काही ज्येष्ठ नेत्यांनी जून २०१३ मध्ये गोव्यात पणजीत होणार्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला न येण्याचा निर्णय घेतला. २०१४ च्या निवडणुकांत मोदींचे नाव पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाले नाही, तरी नरेंद्र मोदींना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता अडवाणी, यशवंत सिन्हा, जसवंतसिंग, बी. सी. खंडुरी आणि उमा भारती, रविशंकर प्रसाद, वरुण गांधी आदी काही नेत्यांना ही बैठक चुकवण्यास पुरेशी होती. एका उमेदवाराच्या पाठीशी नेतृत्वाचे एकमत घडवणे किती कठीण आहे हे कळण्यास हे पुरेसे होते. रविशंकर प्रसाद हे राज्यसभेत विरोधी पक्षांचे उपनेते होते आणि त्यावेळी शिष्टमंडळासह श्रीलंकेत होते. नव्याने सरचिटणीस बनलेले वरुण गांधी काही वैयक्तिक कारणांनी पॅरिसला होते.अडवाणी दुसर्या दिवशी तरी गोव्याला येतील असे ज्येष्ठ नेत्यांना वाटत होते, परंतु कोणालाही तशी खात्री नव्हती.सुस्पष्ट कार्यक्रम ठरलेला नसूनही कार्यकर्त्यांना राष्ट्रीय अध्यक्षांनी पक्षाला स्पष्ट संदेश द्यावा असे वाटत होते. मोदींच्या गोव्यातील आगमनानंतर त्यांचे जे प्रचंड स्वागत झाले, ज्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची जाहीर पाठिंब्याची घोषणाही होती, त्याने बैठकीचा कल निश्चित केला. राजनाथसिंग पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सतत चर्चा करीत होते, परंतु मोदींच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यास विरोध होण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. एकीकडे गोव्यात आगमन होण्यापूर्वी सिंग यांच्या कानावर भाजप सदस्यांनी काही संभाव्य नावे माध्यमांकडे सूचित केल्याचे आले होते. दुसरीकडे मित्रपक्षांचे फोन यायला सुरू झाले होते की त्यांच्या मनात काय आहे. मोदी यांना भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्यास जेडी (यू) च्या नीतिशकुमार यांचा विरोध होता. त्या नावाची घोषणा गोव्यात होणार का असे त्यांनी सिंग यांना विचारले. त्यावर राजनाथसिंग यांनी नितीशकुमार यांना सांगितले की, केंद्रीय संसदीय मंडळ मोदींना काही जादा जबाबदारी देणार आहे, पण अजून अंतिम निर्णय झालेला नाही. नितीशकुमार यांचा त्यावर विश्वास नव्हता. त्यांनी सिंग यांना मोदींचे नाव पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
गोव्यातील दोन दिवशीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत माध्यमांच्या म्हणण्याप्रमाणे ‘टीम अडवाणीं’कडून मोदींना होणार्या विरोधाबद्दल खुसपुस सुरू झाली होती. पाच दशकांत पहिल्यांदाच अडवाणींनी ते सदस्य असलेल्या राजकीय विभागाच्या बैठकीला उपस्थिती लावलेली नव्हती. पण केंद्रीय संसदीय मंडळाने आणि राजनाथसिंग यांनीही अंतिम निर्णयाबाबत त्यांच्याशी चर्चा केली होती. मोदींचे नाव सार्वत्रिक निवडणुकीचे प्रचारप्रमुख म्हणून घोषित करण्यास अडवाणी उत्सुक नव्हते अशा बातम्या होत्या. काहींचे म्हणणे आहे की मोदींना मध्य प्रदेश व छत्तीसगढमध्ये येणार असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची जबाबदारी द्यावी अशी काहींची सूचना होती. केंद्रीय संसदीय मंडळाच्या काही सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार या ‘मोठ्या’ घोषणेला विलंब लागणार हे दिसत होते. पण गोव्याहून कोणत्याही निष्कर्षाप्रत न येता परत जाण्याने चुकीचा संदेश गेला असता.
पत्रकार सुषमा स्वराज यांच्या येण्याला झालेल्या विलंबापासून प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून होते. सुषमांनी उशिरा येण्याचा अर्थ त्यांचा मोदींना विरोध आहे असा लावला गेला. काहींचा त्यांच्या नावाला असलेला विरोध आणि मागून चालणार्या चर्चा पाहून मोदींनी यातून बाहेर पडायचा विचार चालवला. बरीच वर्षे एकत्र काम केल्यामुळे मोदी आणि राजनाथ यांचा एकमेकांशी चांगला ताळमेळ होता. सप्टेंबर २०१२ मध्ये मोदींनी महिन्याभराची विवेकानंद युवा विकास यात्रा सुरू केली तेव्हा आपल्या सहकार्याच्या गुजरातमधील १८२ विधानसभा मतदारसंघातील या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी राजनाथसिंगही उपस्थित होते. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदींचे काम राजनाथ यांनी पाहिले होते आणि कार्यकर्त्यांतील त्यांची उदंड लोकप्रियताही त्यांना ठाऊक होती. याच दरम्यान, पुढे आपल्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपद येणार आहे याची कल्पना नसल्याने, राजनाथसिंग यांनी २०१४ च्या निवडणुकीसाठी कोणता चेहरा पंतप्रधानपदासाठी योग्य आहे या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले होते. ई टीव्हीच्या सेंट्रल हॉल या कार्यक्रमात राजनाथसिंग मोदींची लोकप्रियता तसेच तीनवेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून दाखवलेल्या सर्व आघाड्यांवरील कार्यक्षमतेचा उल्लेख केला होता. कार्यकारिणी बैठकीच्या शेवटच्या दिवशी सिंग शेवटी बोलणार होते. कोणत्याही मोठ्या घोषणेचा उल्लेख कार्यक्रमपत्रिकेवर नव्हता. आपल्या पंचवीस मिनिटांच्या भाषणात सिंग यांनी केंद्रीय बूथ व्यवस्थापन समितीची कल्पना मांडली. पक्ष कार्यकर्त्यांनी मतदारांशी इंटरनेट, सोशल मीडियावरून जोडले जाण्यास सांगितले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना सिंग यांनी केंद्रीय प्रचार समितीच्या निर्मितीची घोषणा करून त्याच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करून टाकली. न संपणार्या टाळ्यांच्या गजरात सिंग म्हणाले की आता लोक विचारतील, ‘क्या कर दिया आपने?’ ‘क्या है?’ राजनाथसिंग यांनी मोदींच्या नावाची केलेली घोषणा एवढी अनपेक्षित होती की, मोदींच्या गौरवासाठी तेथे पुष्पगुच्छही उपलब्ध नव्हता. शेवटी बाजूला कोणी तरी काढून ठेवलेला पुष्पगुच्छच मोदींना देण्यात आला. दुसर्या दिवशी एका बैठकीत सिंग, अरुण जेटली, मनोहर पर्रीकर व नरेंद्र मोदी यांचा गोव्यातील पक्षकार्यकर्त्यांशी संवाद सुरू असताना सिंग यांनी प्रोटोकॉल मोडला आणि इतरांच्या आधी स्वतः बोलायला उठले. जेटली यांनी मोदी यांना बोलण्यासाठी पाचारण केले असताना आपण बोलायला उठण्यामागचे कारण उपस्थित कार्यकर्त्यांना सांगताना राजनाथसिंग म्हणाले की, आपण त्यांच्यात आणि ते ज्या युवा नेत्याला ऐकायला आले आहेत त्यांच्या मध्ये येऊ इच्छित नाही. पुढे निर्णायक निवडणुकीला सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले आणि मोदींना बैठकीला संबोधित करण्यासाठी पाचारण केले.
राजनाथसिंग यांची अनपेक्षित व तणावपूर्ण घोषणा पुढे काय घडणार याचा संकेत होती. पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींचे नाव घोषित करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून राजनाथसिंग यांच्या या घोषणेकडे पाहिले गेले. या घोषणेचे परिणामही दिसून आले. जेडी (यू) ने एनडीएची सतरा वर्षांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. सिंग यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की मोदींकडे केवळ प्रचाराचे प्रमुख पद देण्यात आलेले आहे, परंतु सिंग यांनी मोदींना नेते घोषित केले त्यात सगळे स्पष्ट झाले होते.