तिसवाडीला पाणीपुरवठा मंगळवारपर्यंत शक्य

0
110

>> कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची माहिती

राजधानी पणजीसह तिसवाडी तालुक्यातील विविध भागात सलग चार दिवस नळाद्वारे पाण्याचा पुरवठा होऊ न शकल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. टँकरद्वारे होणारा पाण्याचा पुरवठा अपुरा आहे. पॅकबंद पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून चढ्या दराने पॅकबंद पाण्याची विक्री केली जात आहे. दरम्यान, केरये – खांडेपार येथे फुटलेल्या दोन मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जलवाहिन्यांच्या दुरुस्ती कामाची पाहणी काल केली.

जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम सोमवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून पणजीसह तिसवाडी व इतर भागात मंगळवारी संध्याकाळपर्यंत पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

केरये – खांडेपार येथील राजधानी पणजीसह तिसवाडी आणि फ़ोंडा तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा पुरवठा करणार्‍या ९०० मिमी आणि ७५० मिमी जलवाहिन्या राष्ट्रीय महामार्गाची संरक्षक भिंत कोसळल्याने फुटल्या आहेत. त्यामुळे तिसवाडी आणि फोंडा तालुक्यातील अनेक भागातील नळाद्वारे होणारा पाण्याचा पुरवठा बंद पडला आहे.

नळाद्वारे होणारा पाण्याचा पुरवठा बंद झाल्याने नागरिकांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. परंतु, सरकारच्या बांधकाम खात्याकडे पाण्याचे टँकर अपुरे असल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पणजीतील पाणी टंचाई लक्षात घेऊन खासगी टँकरवाल्यांनी टँकरच्या पाण्याचे दरसुध्दा वाढविले आहे. बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध पॅकबंद पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पॅकबंद पाण्याचे सुध्दा दर वाढविण्यात आले आहे, अशा तक्रारी आहेत.
पणजी आणि तिसवाडीतील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. काही नागरिकांना विहिरी, झरीच्या पाण्याचा वापर करावा लागत आहे. गेले चार दिवस पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्याच्या टँकरसाठी स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधावा लागत आहे.

तिसवाडी आणि फोंडा तालुक्यातील खंडित झालेला पाणी पुरवठा मंगळवारी संध्याकाळपर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केली.

जलवाहिन्यांची जोडणी सुरू
जलवाहिन्या दुरुस्तीसाठी प्रथम ९०० मिमी जलवाहिनीचे दुरुस्ती काम केले जाणार आहे. जलवाहिनीसाठी आवश्यक नवीन पाईप तयार करण्याचे काम मडकई औद्योगिक वसाहतीमध्ये करण्यात आले आहे. या कामासाठी स्थानिक वेल्डरांबरोबर परराज्यातून खास वेल्डर आणण्यात आले आहेत. नव्याने तयार करण्यात आलेल्या जलवाहिन्या केरये, खांडेपार येथे आणून रविवारी रात्रीपासून वेल्डिंगच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामाच्या वेळी पडणार्‍या पावसामुळे कामात थोडा अडथळा निर्माण होत आहे. वेल्डिंगच्या कामाच्या वेळी पाऊस पडल्यास कामात अडचण निर्माण होण्याची शक्यता बांधकाम खात्याच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाची काल पाहणी केली. सोमवारपर्यंत जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून मंगळवारी संध्याकाळपर्यंत पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

मंत्री पाऊसकरांनी केले मान्य

जलवाहिन्या फुटण्यामागे
अधिकार्‍यांचा निष्काळजीपणा
सोमवार मध्यरात्री किंवा मंगळवारी दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याच्या पुरवठ्याला सुरुवात केली जाणार आहे. दोन्ही मुख्य जलवाहिन्या फुटण्याची घटना बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे मंत्री पाऊसकर यांनी पत्रकारांशी बोलताना मान्य केले. जलवाहिन्यांच्या बाजूला रस्ता रुंदीकरणाच्या वेळी मातीचा भराव घातल्याने जलवाहिन्यांना धोका निर्माण झाला होता. बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी याकडे वेळीच लक्ष दिले असते तर ही घटना घडली नसती. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणामुळे मुख्य जलवाहिन्या रस्त्याच्या डोंगराळ भागातून घालण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रस्त्याचे काम करण्यासाठी जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घ्यायला हवे होते, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.