आणखी एक स्फोट

0
99

सरत्या वर्षाला निरोप देण्याची घडी जवळ येऊन ठेपलेली असताना दहशतवादाच्या राक्षसाने पुन्हा एकवार आपल्या भयावह चेहर्‍याची चुणूक दाखवली आहे. बेंगलुरूमध्ये झालेला स्फोट कमी तीव्रतेचा जरी असला, तरी त्याचे ठिकाण आणि वेळ भविष्यातील धोक्यांचा इशारा देण्यास पुरेशी आहे. रात्री साडेआठच्या सुमारास बेंगलुरूच्या चर्च स्ट्रीटवर हा स्फोट झाला. ही चर्च स्ट्रीट बेंगलुरूच्या प्रसिद्ध अशा ब्रिगेड रोड आणि एमजी रोडच्या जवळच आहे. त्यामुळे स्फोटाचे ठिकाण आणि वेळ पाहिली, तर प्राणहानीबरोबरच घबराट पसरवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. हे कृत्य नेमके कोणी केले हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी बेंगलुरू हे दहशतवादी कारवायांचे एक केंद्र बनत चाललेले आहे हे पुन्हा एकवार यातून सिद्ध झालेले आहे. काही दिवसांपूर्वीच आयएसआयएससाठी ट्वीटर खाते चालविणारा बेंगलुरूचाच रहिवाशी होता असे उघडकीस आलेले आहे. त्या मेहदी बिस्वासच्या अटकेचा सूड उगवण्याच्या इराद्याने दहशतवादी शक्तींनी हा बॉम्बस्फोट घडवून आणला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्फोटासाठी अमोनियम नायट्रेट आणि आयईडीचा वापर झालेला असल्याने हा स्फोट दहशतवादी कृत्यच आहे हे निःसंशय आहे. नातेवाईकांसह सुटी घालवायला आलेल्या भवानीबाला या निरपराध महिलेचा या स्फोटात अकारण बळी गेला. यापूर्वीही किमान तीनवेळा बेंगलुरू शहर दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरलेले आहे. २००८ साली बेंगलुरूमध्ये एका मागोमाग एक असे तब्बल नऊ बॉम्बस्फोट होऊन ते शहर हादरले होते. त्यानंतर एका आयपीएल सामन्यावेळी तेथील स्टेडियमबाहेर दोन स्फोट झाले होते. गेल्या वर्षीच भारतीय जनता पक्षाच्या शहर मुख्यालयाबाहेर स्फोट घडवून आणला गेला होता. चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकावर रेलगाडीत मध्यंतरी जो स्फोट झाला, ती रेलगाडीही बेंगलुरूहून गुवाहाटीकडे निघालेली होती हेही उल्लेखनीय आहे. आता पुन्हा एकदा स्फोटाने बेंगलुरू हादरले. म्हणजे सातत्याने बेंगलुरूला दहशतवादी लक्ष्य करीत आहेत आणि या स्फोटांना रोखण्यात स्थानिक सुरक्षा यंत्रणांना यश येत नाही असेच दिसते. सध्या संपूर्ण देशात दहशतवादासंदर्भात दक्षतेचा आदेश जारी झालेला आहे. असे असतानाही हा स्फोट होऊ शकला ही चिंताजनक बाब म्हणावी लागेल. अलीकडेच मुंबई पुन्हा दहशतवाद्यांचे लक्ष्य बनू शकते असा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला होता. पुण्यातील स्फोटात हात असलेले ‘सिमी’ चे पाच दहशतवादी मुंबईत घातपात घडवण्याचा बेत आखत असल्याची पक्की खबर गुप्तचर यंत्रणेला मिळालेली आहे. विशेष म्हणजे हे पाचजण तुरूंगातून पळून गेले होते. बेंगलुरू स्फोटांमागे हाच गट आहे का की कर्नाटकातील एखाद्या स्लीपर सेलचे हे दुष्कृत्य आहे हे आता तपास यंत्रणेला शोधावे लागेल. कर्नाटकात जिहादींनी जाळे विणलेले आहे हे यापूर्वी अनेकदा दिसून आलेले आहे. गोव्यात पाच ठिकाणांची रेकी करणारे कर्नाटकातूनच आलेले होते. भटकळपासून हुबळीपर्यंत अनेकांना यापूर्वी अटकही झालेली आहे. त्यामुळे भटकळ बंधूंच्या इंडियन मुजाहिद्दीनचे अवशेष अजून कर्नाटकात शिल्लक आहेत का हे एनआयएला तपासावे लागणार आहे. बेंगलुरूतील स्फोट ही आपल्या गोव्यासाठीही धोक्याची पूर्वसूचना आहे हे विसरून चालणार नाही. सध्या पर्यटकांची प्रचंड रीघ गोव्याकडे लागलेली आहे. सेंट फ्रान्सिस झेवियरचे अवशेष दर्शनही जुन्या गोव्यात सुरू असल्याने परराज्यांतून येणार्‍या भाविकांची वर्दळही आहे. या सर्व परिस्थितीत नागरी व्यवस्था आधीच पूर्ण कोलमडून गेलेल्या दिसत आहेत. वाहतुकीची कोंडी नित्याची होऊन बसलेली आहे. अशा वेळी एखादी दहशतवादी कारवाई गोव्यात घडवण्याचा प्रयत्न झाला, तर काय होईल याची कल्पनाही करवत नाही. विद्यमान केंद्र सरकारनेही शाब्दिक इशार्‍यांपलीकडे दहशतवादासंदर्भात ठोस काही केल्याचे अद्याप दिसून येत नाही. या परिस्थितीत आपले दैनंदिन जीवनक्रम भगवान भरोसे करणेच जनतेच्या हाती आहे असे नाईलाजाने म्हणावे लागते. गोव्यात ‘सागर कवच’ च्या कवायती वारंवार होतात खर्‍या, परंतु प्रत्यक्षात जेव्हा कसोटीची वेळ येईल तेव्हा आपल्या सुरक्षा यंत्रणा अशा प्रकारचे घातपाती कृत्य रोखण्यास सक्षम ठरतील असा विश्वास जनतेला आजच्या घडीस तरी बिल्कूल वाटत नाही. हा विश्वास सरकारने द्यायला हवा.