आठवणीतली वाळवणं

0
90
  • प्रतिभा कारंजकर

घर नेहमी भरलेलं असावं, कुणाला काही कमी पडू नये अशा संस्काराचा मनावर पगडा असेल तर अशी बेगमी करायची मानसिकता आपोआपच तयार होते; आणि असा बेगमीचा फापटपसारा संसारात कायम असणे म्हणजे समृद्धी आणि संस्काराचे जतन करणे.

त्या दिवशी अमेरिकेहून मुलीचा फोन आला. हवापाण्याच्या गोष्टी सांगताना मी म्हटलं, ‘‘आमच्याकडं उन्हाळा जाणवायला लागलाय.’’ ती म्हणाली, ‘‘मग तुझी उन्हाळ्यातली वाळवणाची कामं आता सुरू होणार तर!’’ मी म्हटलं, ‘‘हो, आतापर्यंत सांडगी, मिरच्या आणि साबुदाण्याच्या पापड्या करून झाल्या.’’ ती म्हणाली, ‘‘माझ्यासाठी पण कर पुरेशा आणि इकडे येताना घेऊन ये.’’ मी तिला ‘हो’ म्हटलं आणि माझं मन भूतकाळात जाऊन पोचलं. मीही माझ्या आईकडून अशा वाळवणीच्या गोष्टी हक्कानं मागून घ्यायची. मुले लहान, वाळवणं सुकवायला जागा नाही, त्यामुळे मी कधी त्या भानगडीत पडायची नाही. पण आईचं वय झाल्यावर तिच्याकडं मागणं प्रशस्त वाटेना, म्हणून मी या वाटेकडे वळले. आता दारी अंगणही मोठं असल्याने सुकवायची चिंता नाही, आणि अशी कामं करायला आता सवडही मिळतेय.

लहानपणी ‘काय गं परीक्षा कधी आहे?’ असा प्रश्‍न आई विचारायची तेव्हा अभ्यासाच्या काळजीने नाही तर तिच्या वाळवणाचा सिझन सुरू झालेला असल्याने बेगमीचे पदार्थ करायचे प्लॅनिंग तिला करायचे असायचे. वाळवणाचे पदार्थ करणे आणि त्यांची साठवण करणे हे जणू आपल्या संस्कृतीचे भाग बनले आहेत. पावसाच्या आगमनापूर्वी आणि अडचणीच्या वेळची खबरदारी घेऊन केलेली ती तयारी असे. आता बाराही महिने सगळ्या गोष्टी बाजारात मिळतात. पण पूर्वी वर्षभरासाठीची बेगमी करून ठेवण्यात बायका बिझी असत. कुरड्या, पापड्या, सांडगे, पापड, गरम मसाला, मिरची, हळद पावडर… कडधान्याला आणि डाळींना तर सात उन्हं दाखवून मगच ते बरण्यांत भरून ठेवायचं. मग वर्षभर येणारा-जाणारा, पै-पाहुणा, लग्नकार्य यांची सहज सोय होऊन जायची. उन्हाळी वाळवणाचे पदार्थ हा किचनमधला अविभाज्य भाग होता. बाजारू खाणं लोकांना आवडायचं नाही आणि खिशाला परवडायचं पण नाही. आपल्या हाताने केलेल्या पदार्थाचा अभिमान असतो. त्यात स्वच्छता असते, आपलेपणा असतो तसेच तो पुरवठ्याला येतो.

गोव्यातसुद्धा पेरूमेंताचे फेस्त असते तेव्हा अजूनही लोक असं साठवणीचं सामान खरेदी करून ठेवतात. त्यात जास्त करून सुकी मासळी, मिरच्या, चिंच, आमसोल, कोकम, अळसांदे हे सर्व उन्हात चांगलं वाळवून भरून ठेवलं नाही तर खराब व्हायची शक्यता असते. मिठागरातून खडे मीठ आणून तेही कोरडे झाले की मातीच्या भांड्यात साठवले जाते.

माझ्या माहेरी वाडा सिस्टिम असल्याने तिथल्या गृहिणींत, एकमेकीत चुरस, स्पर्धा आणि इर्षेने केले जायचे हे पदार्थ. परीक्षा झाली की सुट्टीत आईला केलेली या कामातली मदत आठवते. एकेक दिवस ठरवून शेजारीपाजारी पण मदतीला जावं लागे. आज तुझ्याकडे उद्या माझ्याकडे असे कुरड्या, पापड्या, सांडगे, पापड केले जायचे. मोठ्या भांड्याची, सोर्‍याची, पोळपाट-लाटण्याची देवाण-घेवाण व्हायची. सुकत घालताना, पापड लाटताना आम्हा बच्चे कंपनीची मदत व्हायची. त्याचा पुढच्या आयुष्यात फायदा म्हणजे आमच्या पोळीने कधी आपला गोल आकार सोडला नाही. शिवाय पापडाच्या लाट्याही खायला मिळायच्या, ज्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. सांडगे घालणे जरा किचकट काम, पण रांगोळीच्या ठिपक्यासारखे ओळीने घालताना प्रत्येकीचं कसब दिसायचं. लोणचं घालताना एखाद्या मुरलेल्या बाईच्या मार्गदर्शनाखाली घातलं जायचं. तेच जिन्नस, तीच पद्धत वापरून जरी लोणचं केलं तरी प्रत्येकीच्या हातची लोणच्याची चव वेगळी असायची. बरणीच्या तोंडाला दादरा बांधून ते सोवळ्या जागी ठेवलं जायचं. हल्लीच एका चटणीच्या पाकिटावर लिहिलेलं वाचलं- ‘आईच्या हातची चव.’ आईच्या चटणीसारखी त्याची चव असू शकते, पण आईच्या मायेचा ओलावा त्यात नसेल. पाटावरच्या शेवया करताना बघायला मला फार आवडायचं. कित्ती छान बारीक दोर्‍यासारख्या शेवयाचा स्त्रोत पाटाच्या दोन्ही बाजूंनी चालू असायचा, अगदी ताट भरेपर्यंत. विकतच्या शेवयांना अशी चव कुठून येणार! त्या मशीन मेड असतील. मदर्स रेसिपीच्या पदार्थांना आईच्या हातची चव असेल का?
पूर्वीच्या वेळी एकत्र कुटुंबपद्धतीत खाणारी तोंडे आणि राबणारे हातही अनेक असायचे. त्यावेळी असा घाट घालणं परवडायचं पण आता त्रिकोणी-चौकोनी कुटुंबात अशी गरज पडत नाही. शिवाय घरची स्त्री कामधंद्यानिमित्त बाहेर पडू लागली आहे. तिच्याकडे इतका वेळ नसतो त्यामुळे बाजारात मिळणार्‍या पदार्थांवर त्यांची भिस्त असते. पण कुठे असे घरगुती बनवलेले पदार्थ असतील तर त्या जास्त पैसे खर्च करूनसुद्धा घेताना दिसतात. कधी सासू किंवा आईकडून घेऊन येतात. ज्यांना आवड असते त्यांच्यासाठी आजकाल यू-ट्यूबवर असे पदार्थ कसे करायचे याची सविस्तर माहिती बघायला मिळते. ते पाहून करता येतात. मला पण असे नवनवे पदार्थ करून बघायला आवडते. ती माझी हॉबीच बनली आहे. सुकत घालायला दारी अंगण आहे, जवळ पुरेसा वेळही आहे, त्यामुळे मुलांसाठी पण बनवून देते. ज्या गोष्टी बनवण्यात आपली भावनिक गुंतणूक असते ती गोष्ट केल्याने छान वाटते. ‘ही गोष्ट मी केलीय’ हे सांगताना मन भरून येतं. घर नेहमी भरलेलं असावं, कुणाला काही कमी पडू नये अशा संस्काराचा मनावर पगडा असेल तर अशी बेगमी करायची मानसिकता आपोआपच तयार होते; आणि असा बेगमीचा फापटपसारा संसारात कायम असणे म्हणजे समृद्धी आणि संस्काराचे जतन करणे.