अखंड भारताचे स्वप्न

0
53

सरसंघचालक मोहन भागवत यांनी हरिद्वारमधील एका कार्यक्रमात येत्या वीस – पंचवीस वर्षांत अखंड भारताची निर्मिती होईल आणि आपण सर्वांनी प्रयत्न केले तर येत्या पंधरा वर्षांतच अखंड भारत निर्माण होऊ शकेल, अशी भविष्यवाणी केल्याने देशात तो चर्चेचा विषय ठरला आहे. अखंड भारताचे स्वप्न संघ सुरुवातीपासूनच पाहात आला आहे. संघशाखेवर जी भारतमातेची प्रतिमा पूजली जाते, ती प्राचीन अखंड भारताचीच असते, जिच्यामध्ये आजच्या अफगाणिस्तानपर्यंतचा प्राचीन भारतीय भूभाग समाविष्ट असतो. त्यामुळे सरसंघचालकांनी हे स्वप्न पाहिले असेल तर त्यात काही विसंगती नाही. मात्र, अखंड भारताचे हे स्वप्न खरोखर साकारणे शक्य आहे का, तशी स्थिती आहे का असा प्रश्न विचारून त्याआधी काश्मिरी पंडितांची घरवापसी करा, सावरकरांना भारतरत्न द्या वगैरे मागण्या संजय राऊतादी वाचीवीरांनी पुढे केलेल्या आहेत. भागवत यांच्या विधानाचा शब्दशः अर्थ लावण्याचा हा विपरीत प्रयत्न दिसतो. खरे तर भागवत जे म्हणाले त्याला एक पार्श्वभूमी आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष व महानिर्वाणी आखाड्याचे प्रमुख स्वामी रवींद्र पुरी यांनी आपल्या ज्योतिषीय आकलनानुसार येत्या वीस ते पंचवीस वर्षांत अखंड भारत घडेल असे भाकीत केलेले होते, त्या अनुषंगाने मोहन भागवत यांनी हे विधान केले आहे. आपण जे बोलत आहोत ते ज्योतिषाच्या आधारे नव्हे, तर आपल्या आकलनानुसार बोलत आहोत असेही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले. परंतु सरसंघचालकांच्या तोंडी हे विधान आल्याने आणि सध्या केंद्रामध्ये संघाच्या प्रभावाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार आणि नरेंद्र मोदींचे नेतृत्व असल्याने या विधानाला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. अखंड भारत निर्मिती म्हणजे एक भौगोलिक प्रदेश, एक संविधान, एक राष्ट्रचालक अशा प्रकारचा विशाल भारतीय उपखंड बनेल असा भागवतांच्या म्हणण्याचा शब्दशः अर्थ काढायचा का? एकेकाळी भारताच्या भौगोलिक सीमा अशा व्यापक होत्या. आजचा अफगाणिस्तान तेव्हाचा गांधार देश होता. अठराव्या शतकापर्यंत तो भारताचाच भूभाग मानला जायचा. ड्युरंड रेषेने तो प्रदेश भारतापासून अधिकृतपणे वेगळा केला तो ब्रिटिशांनी आणि तोही अगदी अलीकडे १८९३ साली. पाकिस्तानची निर्मिती १९४७ साली झाली, तर बांगलादेशची १९७१ च्या युद्धाअंती. आजच्या नेपाळवरही कधीकाळी किराताचे शासन होते. रामायणाच्या कथेचे धागेदोरे आजही थेट तेथवर जाऊन पोहोचतात. श्रीलंका एकेकाळी सिंहलद्वीप होती आणि रामायणाचा तो भाग तर सर्वज्ञात आहेच. आजचा म्यानमार पूर्वी ब्रह्मदेश म्हणून ओळखला जायचा आणि १९३७ साली ब्रिटिशांनी तो भारतापासून वेगळा पाडला. भूतान मौर्यकाळामध्ये भारताचा भाग होता. आसामच्या कामरूप राज्याचाही तो कधीकाळी भाग होता. भारताचे सांस्कृतिक धागेदोरे असे शोधायला गेले तर थेट इंडोनेशियापर्यंत जाऊन भिडतील. पण भागवतांच्या म्हणण्याचा मथितार्थ भारत पुन्हा ही सगळी राष्ट्रे आज रशिया ज्याप्रमाणे युक्रेनला जोडायला निघाला आहे, त्याप्रमाणे आपल्याला जोडून घेईल असा आहे का? तो तसा नसावा. त्याचा अर्थ घ्यायचा झाला तर एवढाच घेता येईल की येत्या वीस ते पंचवीस वर्षांमध्ये भारताची स्थिती एवढी बळकट होईल की आजूबाजूचे हे जे सगळे देश आहेत जे कधीकाळी याच भारतभूमीचा भाग होते, ते भारताच्या प्रभावाखाली येणे पसंत करतील. हे दुर्दम्य स्वप्न आहे आणि आजची आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर भारताकडे हे शेजारी देश आशेने पाहात असल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. श्रीलंका दिवाळखोरीत निघालेली आहे. चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबली गेली आहे. पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरतेचे पर्व आले आहे आणि पदच्युत होता होता इम्रान खानलाही भारताचे गुणगान करावेसे वाटले. पाकिस्तानमधील बलुचिस्तानसारख्या भागातील नागरिक भारताच्या प्रगतीकडे डोळे विस्फारून पाहात असतात. भारताने येत्या वीस ते पंचवीस वर्षांमध्ये स्वतःचा उत्कर्ष साधला तर निश्‍चितच आजूबाजूच्या या देशांना भारताचे सख्य हवेहवेसे वाटेल, जसे आजवर त्यांना चीनचे वाटत आले होते. चीनने भारताभोवतीच्या देशांभोवती आपले जाळे विणायला अनेक वर्षांपूर्वीपासून सुरूवात केलेली आहे. नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान अशा सगळ्या देशांना तो आपल्या पंखांखाली घेत आला. परंतु चीनच्या ह्या वर्चस्ववादी भूमिकेचा फुगा श्रीलंकेतील सद्यपरिस्थितीने फोडलेला आहे. काळाच्या उदरात काय दडले आहे आपल्याला ठाऊक नाही. परंतु भारताची चौफेर प्रगती जर येत्या काळात होऊ शकली, तर चीनच्या पंखांखालून हे देश निश्‍चित बाहेर पडू पाहतील एवढे तरी निश्‍चित होईल.