आठवणींचे मोहोळ

0
309

मनस्विनी प्रभुणे

कधी कोणाशी कसे ऋणानुबंध जुळतील हे सांगता येत नाही. माधवी देसाई यांच्याशी असलेले मैत्रीचे ऋणानुबंध असेच काहीसे खूप अनपेक्षितपणे जुळले. खरे तर त्या माझ्या आजीच्या वयाच्या होत्या, पण या मैत्रीच्या नात्यात त्यांचं वय कधी जाणवलंच नाही.

बी.ए. किंवा एम.ए.ला असताना आम्हाला स्त्रीलिखित आत्मचरित्रांचा समीक्षात्मक अभ्यास असा विषय होता. त्यावेळेला माधवीताईंच्या ‘नाच ग घुमा’वर सविस्तर चर्चा ऐकली होती. आपल्याला शिकवणारी व्यक्ती कोणत्या दृष्टिकोनातून ती साहित्यकृती शिकवते त्यावर आपलंही एक मत तयार होतं असा तो विद्यार्थिदशेतील काळ होता. त्यावेळेला पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनीती देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी’, विद्याधर पुंडलिक यांच्या पत्नी रागिणी पुंडलिक यांचे ‘साथसंगत’, प्रभाकर पाध्ये यांच्या पत्नी कमल पाध्ये यांचे ‘बंध-अनुबंध’ इत्यादी आत्मचरित्रे अभ्यासाला होती आणि वेगवेगळ्या अर्थाने ती गाजतही होती. या आत्मचरित्रांमध्ये आपल्या आवडत्या लेखकाचे त्याच्या पत्नीने केलेले विश्‍लेषण अनेकांना आवडले नव्हते. त्यांच्या मनात असलेल्या प्रतिमेला यानिमित्ताने धक्का बसला होता आणि यात माधवी देसाई यांचं ‘नाच ग घुमा’ हेदेखील होतं. आम्हाला शिकविणार्‍या प्राध्यापिका या रणजीत देसाई यांच्या साहित्याच्या निस्सीम वाचक, त्यामुळे माधवी देसाई यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राकडे त्या थोड्या पूर्वग्रहदूषित नजरेने बघायच्या आणि त्यांच्या शिकवण्यांतून ते आमच्यापर्यंत पोहोचायचं. त्याचा ङ्गारसा परिणाम आमच्यावर झाला नाही. ती लेखकाची पत्नी आहे म्हणून तिच्या साहित्यकृतीचे मूल्यमापन त्याच निकषांवर न करता ती एक स्त्री आहे, तिचंही काही वेगळं मत असू शकतं या दृष्टिकोनातून त्या-त्या आत्मचरित्रांकडे बघितलं असता त्या आत्मचरित्राचे वेगळेपण आणि महत्त्व लक्षात येऊ शकते, हे मनाशी पक्के असल्यामुळे यातील कोणत्याही लेखिकेबद्दल कोणताही पूर्वग्रह आमच्या मनात तयार होऊ शकला नाही. माधवी देसाई या त्यांतील एक!

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना वाटलं नव्हतं कीमाधवीताईंशी स्नेहाचे- जिव्हाळ्याचे संबंध जुळतील. ‘नाच ग घुमा’ वाचत असताना मनात अनेक प्रश्‍न उभे राहायचे आणि ङ्गक्त ‘नाच ग घुमा’च नाही तर वर उल्लेख केलेली सर्वच आत्मचरित्रे वाचताना त्या-त्या लेखिकेच्या संदर्भात काही न काही प्रश्‍न मनात येतात. मात्र माधवीताईंना ते प्रश्‍न विचारण्याची संधी मला मिळाली. कधी त्यांच्याशी बोलून, तर कधी दिवाळी अंकाला त्यांनी दिलेल्या लेखांमधून ही उत्तरं मिळत गेली. त्यांच्या आयुष्याचे अनेक वेगवेगळे आयाम होते. त्या-त्या कोनातून बघितलं तर आयुष्याचा तो तुकडा खूप निराळाच वाटून जायचा. काचकवड्यांच्या नक्षीप्रमाणे किंवा कॅलिडीओस्कोप जसा ङ्गिरवू तशी प्रत्येक वेळेस वेगळीच नक्षी साकारते, त्याप्रमणे त्यांचं आयुष्य वेगवेगळ्या तुकड्यांमधून दिसायचं. कधी जमून आलेले तर कधी न जमलेले.

मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांना चित्रतपस्वी म्हटले जाते ते भालजी पेंढारकर आणि प्रसिद्ध अभिनेत्री लीला पेंढारकर यांच्या त्या कन्या होत्या. चित्रपटसृष्टीतील अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यासंबंधीच्या खूप वेगळ्या आठवणी त्यांनी जपून ठेवल्या होत्या ज्या त्यांच्याशी बोलताना अनेकदा ऐकायला मिळायच्या. त्या आठवणी शब्दबद्ध करायला हव्या होत्या असं आता वाटायचं. त्यांना कधीही भेटलं तरी त्या कायम पांढरीशुभ्र साडी आणि डोक्यावर पदर अशाच वेशात असायच्या. अगदी अलीकडच्या काळात त्यांना घरात गाऊन घातलेलं बघितलं, पण तोदेखील पांढराशुभ्र! एकदा गप्पा मारत असताना न राहवून या पांढरी साडी आणि डोक्यावरून किंवा दोन्ही खांद्यावरून पदर घेण्याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या. ‘‘भालजी म्हणजे माझे बाबा यांना कायम असाच पेहराव आवडायचा. त्या काळात त्यांच्याबरोबर काम करणार्‍या सर्व स्त्री-कलाकार कटाक्षाने पांढरी साडीच नेसायच्या. बाबांना आवडायचं म्हणून मीदेखील नेसू लागले आणि मीच काय पण लता मंगेशकर, सुलोचनाताई, त्यावेळेला भालजींबरोबर कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये काम करणार्‍या अन्य महिलांवरही भालजींच्या या विचाराचा प्रभाव होता. त्यामुळे त्याही पांढरी साडी नेसू लागल्या. आणि आणखी एक रहस्य आहे, कदाचित तुला अतिशयोक्ती वाटेल, पण राज कपूरवरदेखील भालजींच्या नायिका, त्यांच्या आसपास असणार्‍या महिलांचा प्रभाव होता. पृथ्वीराज कपूर आणि भालजी यांची खूप चांगली मैत्री होती. सुट्‌ट्यांमध्ये पृथ्वीराज कपूर आपल्या सर्व कुटुंबीयांसमवेत कोल्हापूरला पन्हाळ्याला यायचे. राज कपूर तेव्हा खूप लहान होता. आमच्या घरातील सर्व स्त्रिया तेव्हा खास करून पांढरी साडी नेसायच्या. माझी आई लीला पेंढारकर हीदेखील पांढरी साडी नेसायची. छोट्या राजचे कायम ती लाड-कौतुक करायची. तोही तिच्या मागे-पुढे असायचा. या सगळ्याचा परिणाम म्हण किंवा प्रभाव, त्यांच्या नायिकांचा एक तरी शॉट पांढर्‍या साडीत असायचा.’’ माधवीताईंबरोबर अचानकपणे राज कपूरचं एक रहस्य समजून गेलं. त्यांच्याशी गप्पा त्या याच असायच्या.

मी पहिल्याच दिवाळी अंकाची तयारी करत होते. त्यावर्षीचा दिवाळी अंकाचा विषय होता ‘आई’. एका प्रसिद्ध अशा अभिनेत्रीची मुलगी म्हणून माधवीताईंचा लेख मला महत्त्वाचा वाटला. वयाची पाच-सहा वर्षे होईपर्यंत त्यांना माहीत नव्हतं की आपल्या घरात कधीतरी अधून-मधून येणारी, सुंदर दिसणारी ही स्त्री म्हणजे आपली आई आहे. कळत नव्हतं तेव्हापासून त्या त्यांच्या आजीकडे होत्या आणि त्यांची आई म्हणजे लीलाबाई सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना मुलांना भेटायला वेळ मिळायचा नाही. कधी घरी आलेली असताना दारामागून आपल्या आईला न्याहाळताना त्यांना माहीतच नव्हतं की ही आपली आई आहे. इतकाही आईचा सहवास त्यांना मिळत नव्हता. आई-मुलीचं नातं मला खूप वेगळं वाटलं. दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्यावर माधवीताईंकडे गेले होते. आपल्या आईबद्दलच्या भावना त्यांना व्यक्त करायला मिळालं याचं त्यांना एवढं समाधान वाटत होतं की बोलताना त्यांना खूप भरून आलं होतं. त्यावेळची स्तब्धता, शांतता न बोलताही आई आणि मुलीच्या नात्याबद्दल बरंच काही बोलून गेली.

बांदिवडेतील (बांदोडा) महालक्ष्मी मंदिराच्या आवारात असलेलं ‘नर्मदा’ हे त्यांचं घर ही माझी खूप आवडती जागा. या घराच्या ओसरीत बसलं की समोर महालक्ष्मी मंदिरातील दीपस्तंभ दिसतो. मंदिरात येणारी-जाणारी वेगवेगळ्या प्रकारची माणसं दिसतात. मी त्यांना खूपदा मजेने म्हणायचे, ‘‘माधवीताई मला दत्तक घ्या ना, म्हणजे मला हे घर मिळेल, इथे राहायला मिळेल.’’ त्या जागेचा खूप मोठा इतिहास आहे. त्यांचं पहिलं लग्न गोव्यातील आणि बांदिवडेतील जमीनदार काटकर कुटुंबात झालं होतं. आपल्या पहिल्या पतीच्या निधनानंतर त्यांना वाटणीमधून हे घर मिळालं, ज्याला त्यांच्या सासूचं नाव आहे. त्यांचं दुसरं लग्न रणजीत देसाई यांच्याबरोबर झालं जे ङ्गार काळ टिकलं नाही. ‘‘माझ्या सासूबाई खूप दूरदृष्टी असलेल्या बाई होत्या. माझ्या आयुष्यात येणारी वादळं कदाचित त्यांना आधीच जाणवली होती. त्यामुळं मला किमान डोक्यावर छप्पर तरी असावं म्हणून त्यांनी हे घर माझ्या नावावर केलं असावं. म्हणूनच मी याच घरात शेवटचा श्‍वास घ्यावा हीच माझी आता इच्छा आहे,’’ असं एकदा ओसरीत गप्पा मारत असताना आणि घराचा इतिहास सांगत असताना त्या बोलून गेल्या. मी त्यांच्या या वास्तूच्या प्रेमातच होते. एकदा पणजीमधील पत्रकार मैत्रीण कालिका बापट आणि लीना वेरेकर यांना घेऊन माधवीताईंच्या घरी गेले होते. त्या दोघीही त्यांना पहिल्यांदाच भेटणार होत्या. त्यांचं अगत्य मी खूपदा अनुभवलं होतं. नुसती उभ्या-उभ्या भेटून जाणार आहे असं जरी आधी सांगून ठेवलं असलं तरी त्या कधीही भरपेट खायला घातल्याशिवाय सोडायच्या नाहीत. त्याही दिवशी असंच झालं. साग्रसंगीत असा त्यांनी स्वतः केलेला स्वयंपाक बघून या दोघी चकित झाल्या. सुंगटाचे हुमण, तळलेले बांगडे, वेल्ल्या आणि सोलकढी असा बेत त्यांनी केला होता. या वयातही त्यांच्यात असलेला उत्साह आम्हा तिघींना लाजवेल असाच होता. घरातील साङ्गसङ्गाई त्या स्वतः करायच्या. त्याचं स्वयंपाकघर, मोजक्याच पण नीटनेटक्या ठेवलेल्या वस्तू, त्यांचं लिखाणाचं टेबल, हॉलमध्ये असणारे देवघर, मुलींसाठी असलेली आणि जिच्यात माझा जास्त जीव आहे ती वरच्या मजल्यावरची खोली असं सगळं म्हणजे त्याचं विश्‍व होतं.

त्यांच्या आयुष्यातला शेवटचा टप्पा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवला. याच काळात त्यांच्याशी जास्त संवाद घडू लागला. आजूबाजूला अस्वस्थ करणार्‍या सामाजिक- राजकीय घडामोडी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या, मग तो गोव्यातील शाळांमधील भाषा माध्यम प्रश्न असेल किंवा महिलांवरील अत्याचाराच्या घटना. त्या उघडपणे तत्कालीन कामत सरकारच्या विरोधात- त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या विरोधात बोलत होत्या. वृत्तपत्रांत लिहीत होत्या. ‘तुम्हाला एवढं रोखठोक लिहिताना भीती वाटत नाही का?’ असं विचारलं असता, ‘छे ग, बिलकुल नाही! मला बिचार्‍या म्हातारीला कोण काय करणार? आता राहिलं काय आहे?’ असं म्हणायच्या. महिलांवरील अत्याचाराच्या घटना सर्वत्र वाढत असताना त्यांना आमच्या गावातील, ग्रामीण भागातील महिलांशी, किशोर वयातील मुलींशी प्रत्यक्ष चर्चा करायची होती. या मुली-महिला सध्याच्या काळात कसा विचार करतात हे जाणून घ्यायचं होतं. तसा एक कार्यक्रमही आम्ही ठरवत होतो. परंतु दिवसेंदिवस खालवत चाललेली त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. तरीदेखील ङ्गोन करून त्या वेळोवेळी माहिती घ्यायच्या. वृद्धापकाळात अनेकांना एकटेपण जाणवते, पण माधवीताई एकट्या असूनही त्या अर्थाने कधीच एकट्या नव्हत्या. ङ्गोंड्यात झालेल्या महिला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी महिलांना चांगलं वाचायला शिकवलं, नामवंत लेखिकांना त्यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी गोव्यात बोलावलं, त्यांच्याशी संवाद घडवून आणला. हे सगळं करणं आणि तेदेखील वयाची सत्तरी उलटून गेलेली असताना, एवढं सोपं नक्कीच नव्हतं. संमेलन म्हणलं की त्यांच्या अंगात असा उत्साह संचारायचा कीपुढचे काही दिवस त्या त्याच धुंदीत असायच्या.

नामवंत दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेत्री यांची मुलगी असताना अनुभवलेले वैभव, वलयांकित जीवन, तर दुसर्‍या क्षणाला गोव्यातील ग्रामीण भागातील मुलाशी लग्न करून एक सामान्य जीवन जगणारी मुलगी, संसारात रमलेली असताना अचानक पतीच्या मृत्यूने बदलून गेलेलं तिचं जग, परत दुसरं लग्न करून नवी स्वप्नं बघणारी स्वतःच्या सुखापेक्षा मुलींना पित्याचा आधार हवा या विचाराने झटणारी आई, लेखक पतीची मनातील प्रतिमा एक आणि प्रत्यक्ष प्रतिमा वेगळी हे कळून चुकल्यावर स्वतःशी आणि स्वतःच्या आत्मसन्मानासाठी झगडणारी पत्नी, आयुष्यात आलेले अनुभव कागदावर मांडणारी लेखिका, गोवा मुक्तिसंग्रामात भूमिगत होऊन काम करणार्‍या, सामाजिक मन आणि जाण जपणार्‍या अशा अनेक भूमिका जणू एखाद्या चित्रपटातील नायिकेसाठी लिहिलेल्या असाव्यात अशा माधवीताई प्रत्यक्षात जगल्या. त्या-त्या टप्प्याला त्या भूमिकेला न्याय दिला. एकाच व्यक्तीच्या आयुष्यात किती चढ-उतार असू शकतात हे माधवीताईंकडे बघितलं की समजू शकतं.

गेल्या वर्षी ‘गोव्यावर’ दिवाळी अंक करत असताना त्यांच्याकडे गेले होते. त्या वेळेस त्या खूप आजारी होत्या. गोव्यावर दिवाळी अंक करतेय आणि नेमकी आजारी असल्यामुळे काही लिहू शकत नाही याचं त्यांना वाईट वाटतं होतं. पुढच्या वर्षीच्या अंकात लिहिण्यासाठी आधी ठणठणीत बर्‍या व्हा. अजून खूप विषय आहेत ज्यांवर तुम्हाला लिहायचंय असं म्हणून मी आले होते. गेल्या तीन-चार आठवड्यांपासून त्यांच्या घरातला ङ्गोन उचलला जात नव्हता. त्यांना यावर्षीच्या दिवाळी अंकाविषयी सांगायचं होतं, आता ते राहूनच गेलं. बर्‍याच गोष्टी आम्ही ठरवल्या होत्या त्याही अर्धवट राहिल्या. मागे एकदा अख्खा दिवस त्यांच्या घरी घालवला असताना त्यांच्या घराचे भरपूर ङ्गोटो काढले होते. त्यांच्या घरात वरच्या खोलीत जाणार्‍या पायर्‍या आहेत त्यावर बसून मला त्यांचा ङ्गोटो घ्यायचा होता. त्यांना आग्रह केला तर म्हणाल्या, ‘‘आज नको, परत कधीतरी. आज मी छान नाही दिसत. खूपच म्हातारी वाटतेय. पुढच्या वेळेस आलीस ना की सांग म्हणजे जरा तरुण बनून तुला ङ्गोटोसाठी पोझ देईन.’’ आणि वर आम्ही खळखळून हसलो होतो. त्यांचे तसे तरुण बनून येणे राहूनच गेले. खूप उशिरा त्यांच्याशी मैत्री झाली. आणखी काही वर्षं मिळायला हवी होती.