Home बातम्या आज निकाल लागणार!

आज निकाल लागणार!

0

साखळी, पर्ये, कुडचडे आणि मडकई या चार मतदारसंघांमध्ये सरळ लढत झाल्याने तेथील निकालांबाबत विशेष औत्सुक्य असून अनेक मतदारसंघांत झालेल्या प्रचंड मतदानामुळे प्रस्थापित राजकारण्यांनाही शह बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ४० जागांसाठी रिंगणात असलेल्या २१५ उमेदवारांपैकी कोणाचे भाग्य फळाला येते आणि कोणाला अपयशाचे धनी व्हावे लागते त्याकडे जनतेच्या नजरा लागल्या आहेत.

यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने आलेमाव, रवी नाईक, पांडुरंग मडकईकर, राणे, मोन्सेर्रात कुटुंबांत एकापेक्षा अधिक उमेदवार्‍या दिल्याने घराणेशाहीचा आरोप झाला, तर भाजपाने यावेळी अनेक नवे चेहरे रिंगणात उतरवून आव्हान निर्माण केले आहे. विष्णू सूर्या वाघ, प्रमोद सावंत आदींबरोबर नीलेश काब्राल, गणेश गावकर, किरण कांदोळकर, सुभाष फळदेसाई, सुभाष नाईक, रूपेश महात्मे, सत्यविजय नाईक, दत्तप्रसाद नाईक असे नवे चेहरे लढाईत उतरवले, तसेच ग्लेन तिकलो, कार्लोस आल्मेदा, मायकल लोबो आदी ख्रिस्ती उमेदवारांनाही उमेदवारी दिली. मगोनेही दिनार तारकर, प्रकाश अर्जुन वेळीप, प्रेमानंद नानोस्कर आदींना संधी दिली आहे. कॉंग्रेसने गोविंद सावंत, संकल्प आमोणकर, उदय पालयेकर, कायतान झेवियर, यतीन पारेख, धाकू मडकईकर यांना पक्षाची उमेदवारी बहाल केली आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आशिश शिरोडकर, रूद्रेश चोडणकर आदींना उमेदवारी बहाल केली आहे. कॉंग्रेसने यावेळी आलेमाव कुटुंबातील तिघांना, तर मोन्सेर्रात, राणे, ढवळीकर, नाईक कुटुंबातील दोघांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांचा काय निकाल लागतो त्याकडे जनतेचे लक्ष आहे.

अनेक मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांनीही बराच जोर धरला असून डिचोलीत नरेश सावळ, कुंभारजुव्यात निर्मला सावंत, नावेलीत आवेर्तिन फुर्तादो, पर्वरीत रोहन खंवटे आपले भाग्य आजमावत आहेत.

अनेक मतदारसंघांमध्ये विजयश्री गळ्यात घालून घेण्यासाठी कमालीची स्पर्धा निर्माण झालेली असून सांताक्रुझमध्ये दिनार तारकर, बाबूश मोन्सेर्रात व रुडॉल्फ फर्नांडिस यांच्यात चुरस आहे. फातोर्ड्यात दामू नाईक, एम. के. शेख व विजय सरदेसाई यांच्यात, केप्यात बाबू कवळेकर, प्रकाश अर्जुन वेळीप व प्रकाश शंकर वेळीप यांच्यात, वाळपईत विश्वजित प्र. राणे, सत्यविजय नाईक व बंडू देसाई यांच्यात अशी तिरंगी लढत अपेक्षित आहे.

प्रस्थापित राजकारण्यांच्या दुसर्‍या पिढीतील वालंका आलेमाव (बाणावली), युरी आलेमाव (सांगे), रितेश नाईक (मडकई) यांना विधानसभेवर येण्याची संधी मिळते का, जेनिफर मोन्सेर्रात (ताळगाव), धाकू मडकईकर वगैरे नातलग मंडळी निवडली जातात का, याविषयी उत्सुकता आहे. मगोचे ढवळीकर बंधू आपल्या जागा कायम राखण्याच्या प्रयत्नात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसवासी झालेले दयानंद सोपटे आणि राजेश पाटणेकर यांच्या राजकीय भवितव्याचाही कस आज लागणार आहे. तीन मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये २००७ च्या तुलनेत बरेच अधिक मतदान झाले असून त्याचा परिणाम निकालावेळी दिसून येणार आहे. किमान अकरा मतदारसंघांमध्ये ८५ टक्क्यांहून अधिक मतदान यावेळी झालेले आहे हे उल्लेखनीय आहे.

सकाळी ११ पर्यंत निकाल अपेक्षित

आज सकाळी ८ वाजल्यापासून पणजी येथील साळगावकर महाविद्यालय, मडगाव येथील कारे कायदा महाविद्यालय व दामोदर वाणिज्य महाविद्यालय या तीन केंद्रात मतमोजणी सुरू होणार असून सकाळी १०.३० ते ११ पर्यंत एकूण २१५ उमेदवारांचे भवितव्य उघड होईल. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतदानानंतर विश्रांती घेण्यासाठी काही उमेदवार गोव्याबाहेर गेले होते. काल संध्याकाळी ते गोव्यात पोचले. मतांची गणिते मांडण्याचे काम सुरूच असून आज निकाल जाहीर झाल्यानंतरच तर्कवितर्कांना पूर्ण विराम मिळेल. मगो-भाजप युतीलाच बहुमत मिळेल असे अंदाज वर्तविण्यात आल्याने भाजप नेते व कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा करण्याची तयारी केली आहे. मतमोजणी केंद्रापासून २०० मिटरच्या अंतरावरच सर्व वाहने अडविण्यात येतील. त्यासाठी मतमोजणी केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रावर भ्रमणध्वनी नेण्यास बंदी असल्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी सांगितले.

‘नवहिंद टाइम्स’च्या संकेतस्थळावर मतमोजणीचे वृत्त

पणजी ः आज सकाळी ८ वा. पासून सुरू होणार असलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे अद्ययावत वृत्त दै. नवहिंद टाइम्सच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. इच्छुकांना मतमोजणी व निकालाविषयीची ताजी बातमी  डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू. नवहिंद टाईम्स. कॉम या संकेत स्थळावर पाहता येईल.