>> राज्यात ३७ केंद्रांची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांना लस देणार
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्याप्ती १ मार्च २०२१ पासून वाढविण्यात येणार आहे. राज्यातील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वर्षातील इतर आजार असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. राज्यभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ३७ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
लाभार्थ्यांनी लसीकरणासाठी येताना त्यांचे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही सरकारमान्य ओळखपत्र घेऊन जवळच्या सरकारी इस्पितळात जावे. सुरुवातीला लसीकरणासाठी येणार्यांची नोंदणी केली जाणार आहे, असे सरकारतर्फे कळविण्यात आले आहे.
४५ ते ५९ या वयोगटातील नागरिकांनी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार त्यांना असलेल्या इतर आजारासंबंधी डॉक्टरांकडून प्रमाणपत्र आणावे. या प्रमाणपत्रावर संबंधित व्यक्तीचे छायाचित्र असणे आवश्यक आहे. या दोन्ही गटांसाठी सरकारी पोर्टल खुले झाल्यानंतर कोविड पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केली जाऊ शकते.
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, म्हापसा येथील जिल्हा इस्पितळ, फोंडा उपजिल्हा इस्पितळ, प्राथमिक आरोग्य केंद्र, सामाजिक आरोग्य केंद्र आदी सर्व ३७ केंद्रांवर ही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक केंद्राला दररोज १०० डोसांचे लक्ष्य देण्यात आले आहे.
खासगी लस २५० रुपये
राज्यात खासगी इस्पितळात लस देण्याची परवानगी देण्याबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. खासगी इस्पितळांची बैठक लवकरच घेतली जाणार आहे. केंद्र सरकारने खासगी इस्पितळामध्ये दिल्या जाणार्या लसीचे शुल्क २५० रुपये निश्चित केलेले आहे. सरकारी केंद्रात दिली जाणारी लस विनामूल्य आहे.
राज्यात नवे ५४ कोरोना रुग्ण
राज्यात चोवीस तासांत आणखी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून नवीन ५४ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६०६ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५४,९८६ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ७९५ एवढी झाली आहे.
बांबोळी येथे गोमेकॉमध्ये सांताक्रुझ येथील ७४ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याला २४ फेब्रुवारीला इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह आणखी ४५ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ५३ हजार ५८५ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४५ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत नवीन १२२४ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ४.४१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ३३ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन १६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील सध्याच्या कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. कोरोना रुग्णाची संख्या ८५ झाली आहे. पणजीत सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. पर्वरी आरोग्य केंद्रातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३२ झाली आहे. फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ३२ रुग्ण, चिंबल ४५ रुग्ण, म्हापसा ४१ रुग्ण, कांदोळी ४१ रुग्ण, वास्कोत २८ रुग्ण आहेत.
निष्काळजीपणामुळे देशात
कोरोना वाढण्याचा धोका
आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा
देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. नागरिकांनी हलगर्जीपणा व निष्काळजीपणा दाखवल्यास ही रुग्णसंख्या अधिक वेगाने वाढू शकते असा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे. सध्या महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगण आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दिल्लीत सुमारे ३५ दिवसांनंतर एका दिवसात सर्वाधिक नवीन रुग्ण आढळले असून सध्याच्या स्थितीत भारतीयांचे सामाजिक मेळावे किंवा जाहीर सभा आयोजित करू नका, असे आवाहनही तज्ज्ञांनी केले आहे. रुग्णसंख्या वाढीबरोबरच देशात करोनाचे नवीन रुपही समोर येत आहे. त्यामुळे जर निष्काळजीपणा दाखवला तर येत्या काही दिवसांत करोना रुग्णसंख्ये खूप मोठी वाढ होऊ शकते. यामुळे अशा परिस्थितीत आपण सार्वजनिक कार्यांपासून दूर रहावे असे आवाहन केले आहे.
होळी सणात सामाजिक अंतराचे भान राखले जात नाही. त्यामुळे होळीच्या काळात रुग्ण वाढण्याचा धोकाही तज्ज्ञांनी दिला आहे.