फुटीच्या दिशेने?

0
188

कॉंग्रेस पक्षामधील असंतोष पुन्हा खदखदू लागला आहे. शनिवारी जम्मूमध्ये गुलाम नबी आझाद यांच्या राज्यसभेतील निवृत्तीच्या निमित्ताने आयोजित ‘शांती संमेलना’तील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आनंद शर्मा, कपिल सिब्बल आदींची वक्तव्ये पाहिली तर या संमेलनाचा उद्देश ‘शांती’ चा होता की कॉंग्रेस पक्षात ‘क्रांती’ घडविण्याचा होता हे स्पष्ट कळून चुकते. या नेत्यांनी आपली बंडखोरीची भाषा काही लपवून ठेवलेली नाही. यापूर्वी गतवर्षी कॉंग्रेस पक्षातील तब्बल २३ नेते पक्षनेतृत्वाविरुद्ध जवळजवळ बंडाची हाळी देत पुढे आले आणि त्यांनी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना उद्देशून एक खरमरीत पत्र लिहिले होते. त्या पत्राला तेव्हा प्रसिद्धी माध्यमांपर्यंतही पाय फुटले होते. आता तर हे पत्र अखिल भारतीय कॉंग्रेस कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना कोणीतरी निनावीरीत्या पाठवू लागले आहे.
सोनिया गांधींनी पक्षातील ह्या जुन्या जाणत्या नेत्यांची ‘संघटनात्मक बदलां’ची मागणी विचारात घेऊन त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न मध्यंतरी केला. प्रियांका गांधींनी त्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले गेले. कमलनाथ यांनी बंडवाल्यांशी मध्यस्थी केली. त्यानंतर गेल्या जानेवारीत झालेल्या बैठकीत कॉंग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आटोपताच येत्या जूनमध्ये घेण्याची घोषणाही करण्यात आली. त्यामुळे या तडजोडीनंतर पक्षातील बंडोबा थंड झाले असतील अशी जी समजूत होती ती फोल आहे व कॉंग्रेसमधील बंडोबांच्या मनात बंडाची धुगधुगी अजूनही आहे हेच जम्मूतील एकूण भाषणांतून दिसून आले आहे.
‘जी – २३’ संबोधल्या जाणार्‍या या गटातील कॉंग्रेस नेत्यांचे केवळ पक्षाध्यक्ष निवडणूक घोषणेवर समाधान झालेले दिसत नाही. कॉंग्रेस कार्यकारिणीची निवडणूक घ्या, कॉंग्रेस संसदीय मंडळाची पुनर्स्थापना करा वगैरे मागण्याही त्यांनी लावून धरलेल्या आहेत. जम्मूतील नेत्यांची भाषणे पाहिली तर ‘कॉंग्रेस पक्ष आज कमकुवत झालेला आहे’ हाच सर्वांचा सूर दिसला. आम्ही अजूनही कॉंग्रेसजन आहोत असे ही मंडळी सांगत असली तरी ज्या प्रकारे त्यांची एकंदर पावले पडत आहेत ती पाहिली तर लवकरच कॉंग्रेस पक्ष फुटीच्या वाटेने गेला तरी आश्चर्य वाटू नये.
गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेत निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साश्रू नयनांनी त्यांचे केलेले कौतुक आणि परवाच्या जम्मूच्या कार्यक्रमात गुलाम नबींनी मोदींच्या साधेपणाचे केलेले कौतुक ह्याला राजकीय अर्थही निश्‍चित आहे. कॉंग्रेसच्या तरूण नेत्या रणजीत रंजन यांनी पक्षातील बंडखोरांच्या उचापती ह्या केवळ राज्यसभेची उमेदवारी पुन्हा मिळवण्यासाठी असल्याचे टीकास्त्र हाणले आहे. पक्षाची अवनती झालेली असेल तर गेल्या तीस वर्षांत ह्याच नेत्यांनी त्यात वाटा उचललेला आहे असे त्यांचे म्हणणे आहे. कॉंग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी त्याच्याही पुढे जात, ह्या नेत्यांना खरोखरच पक्षाला मजबूत करायचे असेल तर ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक व्हायची आहे, तेथे त्यांनी प्रचारात उतरावे असा दणका दिला आहे. सिंघवी यांचे म्हणणे गैर नाही. कॉंग्रेसच्या पतनाला केवळ गांधी कुटुंबाला जबाबदार धरणे न्यायोचित ठरत नाही. राहुल गांधी यांची अपरिपक्वता हे त्याचे प्रमुख कारण जरूर आहे, परंतु एकेकाळी ह्याच गांधी घराण्याभोवती लाळघोटेपणा करीत फिरणार्‍या ह्याच नेत्यांनी पक्षाच्या ह्या पतनामध्येही निश्‍चितच वाटा उचललेला आहे. आता आम्ही त्या गावचेच नव्हेत असा त्यांचा एकूण पवित्रा जरी असला तरीही कॉंग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या नावाखाली खरे तर राहुल गांधी आणि त्यांच्या कंपूला शह देत स्वतःचे गमावत चाललेले पक्षातील स्थान पुनःप्रस्थापित करणे हेच ह्या जी २३ गटाचे मुख्य उद्दिष्ट दिसते. सोनिया गांधींच्या आजारपणामुळे हे नेते वार्‍यावर सोडल्यासारखे झाले आहेत. दुसरीकडे पक्षामध्ये राहुल गांधींच्या मागे पक्षातील नवे नेतृत्व उभे राहते आहे. यातून आपण बाहेर फेकले जात आहोत हे ह्या जुन्या मंडळींना उमगलेले आहे, त्यातूनच ही संघटित बंडाची ठिणगी उडालेली आहे. एकीकडे कॉंग्रेसमधील आपले राजकीय वजन ओहोटीला लागले आहे याची झालेली जाणीव आणि स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्याची धडपड ही या बंडामागील प्रमुख प्रेरणा आहे. पक्ष कमकुवत झाल्याचे सांगून ते त्याला खरे तर अधिकच कमकुवत करीत आहेत. पक्षाची खरोखर चिंता असती तर या मंडळींनी आपले म्हणणे केवळ पक्ष व्यासपीठापुरते मर्यादित ठेवले असते, परंतु पुन्हा पुन्हा जाहीर वाच्यता करून भाजपला नेत्रपल्लवी करणार्‍या ह्या मंडळींनी कॉंग्रेसला पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे!