आजच्या अंकाचे अतिथी संपादक ः डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा राज्य

0
18

अतिथी संपादकीय

देशासाठी जगूया!
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आज आपण आपल्या देशात व राज्यात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेद्वारे उत्साहात साजरा करीत आहोत. मनापासून मला याचा आनंद वाटतो. देशाच्या स्वातंत्र्याला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत आणि ही ७५ वर्षे पूर्ण होत असताना एका अखंड भारत देशाचे स्वप्नही साकार झालेले आपण पाहतो आहोत. मी लहानपणापासून ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारात वाढलो, ज्या भारतीय जनता पक्षामध्ये मी मोठा झालो, त्यांनी अखंड भारतदेशाचे स्वप्न सातत्याने पाहिले. जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हा विशाल भारत देश एक असावा, यासाठी आपल्या तमाम नेत्यांनी बलिदान दिले, श्यामाप्रसाद मुखर्जींनी काश्मीरसाठी प्राण त्यागले. ‘इस देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान, नही चलेगा, नही चलेगा, नही चलेगा’ ही घोषणा देत देत वावरणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या सामान्य कार्यकर्त्यापासून मी आज मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलो. असे असंख्य कार्यकर्ते, ज्यांनी जम्मू काश्मीर हा या देशाचा भाग बनावा हे स्वप्न पाहिले, त्यासाठी १९५३ मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जींचे बलिदान ज्या काश्मीरमध्ये झाले, ते काश्मीर आज भारतात संपूर्णतः सम्मीलीत झाले आहे हे पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आणि या देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमितभाई शहा यांनी हा भारत देश अखंड राखण्यासाठी काश्मीरचे ३७० वे कलम रद्द केले याबद्दल भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मला अभिमान वाटतो आणि आज पुन्हा एकदा या देशामध्ये ‘एक प्रधान, एक विधान, एक निशान’ याच तत्त्वावर हा देश चालेल हे सांगताना मला अतिशय आनंदही वाटतो.
या देशातील कितीतरी काळ प्रलंबित राहिलेले प्रश्न, मग तो काश्मीरचा प्रश्न असो, राममंदिराचा प्रश्न असो, तीन तलाकचा प्रश्न असो, सीएए सारखा प्रश्न असो, हे सर्व वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केले आहे. पंचाहत्तर वर्षांपूर्वी म्हणजे देशाच्या फाळणीवेळी पाकिस्तानातून भारतात आलेल्यांना आजवर या देशाचे नागरिकत्व मिळू शकले नव्हते, मग ते हिंदू असोत, शीख असोत, पारशी असोत, ज्यांना नागरिकत्व मिळाले नव्हते, त्यांना नव्याने नागरिकत्व देण्याचे काम विद्यमान सरकारने केले आहे त्याबद्दलही मोदी सरकार अभिनंदनास पात्र आहे.
या देशामध्ये मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरू झालेल्या विविध मोहिमा आपण पाहा. क्लीन इंडिया मिशनपासून न्यू इंडिया मिशनपर्यंत, त्यात येणार्‍या स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया, या वेगवेगळ्या संकल्पना या देशातील नागरिकांसाठी – मग त्या महिला असोत, युवक असोत, शेतकरी असोत, कामगार असोत, अशा वेगवेगळ्या वर्गांसाठी माननीय पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवामध्ये प्रत्यक्षात उतरवून दाखवलेल्या आहेत.
भारताचा स्वातंत्र्यलढा, स्वातंत्र्यानंतरच्या काळातील कामगिरी यांचा आढावा घेतानाच या अमृतमहोत्सवानिमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचे ७५ संकल्प करण्याचे आवाहन माननीय पंतप्रधानांनी केले आहे. पुढील पंचवीस वर्षांची देशाची वाटचाल कशी असावी हे स्वप्न त्यांनी या देशातील तरुणांना दाखविले आहे. त्यामुळेच राष्ट्रवाद आणि राष्ट्रप्रेम हे या देशातील नागरिकांमध्ये मनामनांमध्ये रुजविण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ सारखी मोहीम आज देशभरामध्ये यशस्वी होते आहे. प्रत्येक घरावर तिरंगा लावून पुढील पंचवीस वर्षांच्या उज्ज्वल प्रगतीचे स्वप्न आपण पाहावे. देशाचा १०० वा स्वातंत्र्यदिन जेव्हा आपण साजरा करू तेव्हा आजची मुले तारुण्यात गेलेली असतील, आजचे तरुण ज्येष्ठ बनलेले असतील. त्यामुळे त्या उज्ज्वल भविष्यकाळाचे स्वप्न आज पाहिले पाहिजे.
देश स्वतंत्र करताना ज्यांना वीरगती प्राप्त झाली, त्यांचे स्मरण आज करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. आज देशासाठी मरण्याची गरज नाही, तर देशासाठी जगण्याची गरज आहे. त्यांनी देशासाठी मरण पत्करले, परंतु आज आपण देशासाठी काही तरी करून दाखवले पाहिजे असे मला तरुणाईला सांगावेसे वाटते आणि पुढील पंचवीस वर्षांचा आपण काहीतरी करून दाखवू हा संकल्प त्यांनी या शुभप्रसंगी करावा.
गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून मला याचेही स्मरण करून द्यावेसे वाटते की देशाचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना आपल्या गोव्याच्या मुक्तीलाही ६१ वर्षे होत आहेत. गोव्याला भारतानंतर चौदा वर्षांनी स्वातंत्र्य मिळाले हे मी कदापि विसरू शकत नाही. या चौदा वर्षांच्या काळात गोमंतकीय स्वातंत्र्यसैनिकांनी सोसलेल्या हालअपेष्टा, पोर्तुगिजांकडून सोसलेले कष्ट आणि गोवा मुक्तीसाठी ज्यांनी हा लढा सुरू केला त्यांचे योगदानही मी विसरू शकत नाही. १९४७ पासून १९६१ पर्यंत समस्त गोमंतकीयांनी मुक्तीची वाट पाहिली. सर्व स्वातंत्र्यसेनानींनी एकत्र येऊन या गोव्याच्या मुक्तीसाठी मोठा प्रमाणात लढा दिला. गोमंतकाचे पहिले हुतात्मा बाळा राया मापारींपासून टी. बी. कुन्हा, मिनेझिस ब्रागांझांपर्यंत कितीतरी स्वातंत्र्यसेनानींना वीरगती प्राप्त झाली. स्व. बेनिपाल किंवा हिरवे गुरूजींसारखे देशाच्या विविध प्रांतांतून आलेले स्वातंत्र्यसेनानी गोव्याच्या मुक्तीसाठी लढले. १९५४-५५ मध्ये गोव्याच्या सीमांवर – मग ते पोळे असो, पत्रादेवी असो, कॅसलरॉक असो, देशाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या – उत्तर प्रदेश, कोणी पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, अशा विविध प्रांतांतून आलेल्या – स्वातंत्र्यसैनिकांनी पाहिले की १९४७ मध्ये ही भारतभूमी तर स्वतंत्र झाली आहे, परंतु गोवा अजूनही पारतंत्र्यात आहे. गोव्याच्या भूमीला त्या जुलमी पारतंत्र्यातून सोडविण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा गोव्यात सत्याग्रह करूया असे त्यांनी ठरवले आणि सत्याग्रह केला. पोर्तुगिजांनी त्यावेळी केलेल्या त्या बेछूट गोळीबारात तीसपेक्षा जास्त स्वातंत्र्यसेनानी गोव्याच्या सीमांवर धारातीर्थी पडले हे आम्ही कदापि विसरू शकत नाही. म्हणूनच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना गोव्यातील व देशभरातील विविध राज्यांतील स्वातंत्र्यसेनानींच्या सन्मानार्थ त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही सन्मानपत्र देऊन त्यांचा आज गौरव करीत आहोत. आजच्या दिवशी आम्ही त्यांचे कृतज्ञतेने स्मरण करतो आहोत. समस्त गोमंतकीय त्यांचे सदोदित ऋणी असतील. आमच्यासाठी तुम्ही आपले रक्त सांडलेत, प्राणांची आहुती दिलीत हे आम्ही कदापि विसरू शकत नाही. यापुढेही गोवा तुमच्यापुढे नतमस्तक राहील, गोवा सदोतित तुमची आठवण ठेवील!
ह्या प्रसंगी मी गोव्याच्या समस्त तरूणाईला हाक देतो की गेल्या साठ वर्षांत देशाच्या तुलनेत आपण कुठेही मागे राहिलेलो नाही, दोन वित्त आयोग जरी आपल्याला हुकले असले तरी सकल घरेलु उत्पन्न असो अथवा दरडोई उत्पन्न असो, गोवा नेहमीच सर्वांच्या पुढे राहिला आहे. यापुढेही देशात अग्रणी राहण्याचे सामर्थ्य आपल्या तरूणाईमध्ये आहे. उद्योगक्षेत्र असो, पर्यटन क्षेत्र असो, कृषी क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पुढे मार्गक्रमण करू शकतो. तेवढी बुद्धी, शक्ती आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे. म्हणूनच पर्यटनक्षेत्रात गोवा हा या देशाची राजधानी होईल व ते करण्यासाठी, गोवा सुजलाम, सुफलाम आणि स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी गोव्याची तरुणाई पुढे येईल व स्वयंपूर्ण गोवा, आत्मनिर्भर भारत हे मी पाहिलेले स्वप्न साकारण्यासाठी मला सहकार्य देईल, स्वयंपूर्ण गोवा २.० प्रत्यक्षात उतरवील असा मला ठाम विश्‍वास वाटतो!