आचार्योपासनम् …

0
208

– प्रा. रमेश सप्रे
ज्ञानेश्‍वरांनी आपल्या गीतेवरील ‘भावार्थदीपिकेत’ (ज्ञानेश्‍वरीत) सर्वांत जास्त ओव्या ज्या एका शब्दावर केल्यायत तो शब्द- ‘आर्योपासनम्’॥
याला तसंच कारण आहे. निवृत्तिनाथ हे ज्ञानदेवांचे आध्यात्मिक गुरू या नात्यानं आचार्य अन् त्यांचं आचरण ज्ञानोबादी भावंडांना व इतर संतमंडळींनाही आदर्श वाटायचं म्हणूनही ते आचार्य! आपल्या मोठ्या भावाबद्दल या दोन्ही नात्यांमुळे ज्ञानेश्‍वरांच्या मनात अपार प्रेम व आदर. अनेक अध्यायांचा आरंभ करताना आपल्या गुरुंचं स्तवन करणं (स्तुती करणं) हा ज्ञानोबांचा आवडता छंद. इतका की अनेकदा आपली स्तुती असह्य झाल्यामुळे निवृत्तिनाथ ज्ञानोबाला ‘पुरे झाला पाल्हाळ (खूप बोलणं किंवा वर्णन करणं) आता मूळ विषयाकडे- गीतेकडे- वळ’ म्हणून सांगायचे. तेही ज्ञानेश्‍वरीमध्ये लिहिलं गेलंय.
यासाठी जेव्हा ज्ञानी माणसाच्या लक्षणात ‘आचार्योपासनम्’ हा उल्लेख आला तेव्हा ती संधी साधून ज्ञानदेवांनी सद्गुरुंचं चैतन्य, सद्गुण इतर लक्षणं याबरोबरच त्यांचं शिष्याच्या जीवनातलं स्थान व कार्य यांच्या जोडीला अशा आदर्श आचार्यांची उपासना (भक्ती, सेवासाधना, सहवास इ.) कशी करावयाची याचं विस्तारानं विवरण केलंय.भगवंतांनी ज्ञानी माणसाच्या अंगी असलेल्या गुणांचं (लक्षणांचं) वर्णन करताना ‘आचार्योपासनम्’ हा अत्यंत महत्त्वाचा विषय सांगितलाय. संपूर्ण श्‍लोक (१३/७) असा आहे-
‘‘अमानित्वं अदंभित्वं अहिंसा क्षांतिः आर्जवम्‌|
आचार्योपासनं शौचं स्थैर्यं आत्मविनिग्रहः॥
सर्वप्रथम ‘आचार्योपासनम्’.
आचार्य कुणाला म्हणायचे? ज्याचं बोलणं (शिकवण) व वागणं यात काहीही अंतर नसतं असं आचरण असलेल्या व्यक्तीला ‘आचार्य’ म्हणायचं.
‘‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले॥
या शब्दात तुकोबा अशा आचार्यांचंच वर्णन करून आपल्याला सुचवतात की अशा व्यक्तींना नुसता नमस्कार करू नका तर त्यांच्या पायांचा (पदचिन्हांचा) मार्ग हा आपला जीवनमार्ग ठरवा. (फुटप्रिंट्‌स ऑन द सँड्‌स ऑफ टाइम ऑर लाइफ).
भगवंतांनी यापूर्वी सांगितलंय की ज्येष्ठ (वयानं) नि श्रेष्ठ (गुणानं, कर्तृत्वानं) व्यक्तींवर आपलं आचरण योग्य राखण्याची मोठी जबाबदारी असते कारण त्यांचं अनुकरण इतर माणसं करत असतात. यावरून एक गोष्ट लक्षात येते ती ही की केवळ ज्ञान, व्यासंग महत्त्वाचा नाही तर आचरण जास्त महत्त्वाचं आहे.
विद्वानाची व्याख्याही ‘यः क्रियावान् स पंडितः’ अशी केली जाते म्हणजे ज्याचं वर्तन, ज्याचं कार्य महत्त्वाचं असतं तोच खरा पंडित. माणसाचं चारित्र्य त्याच्या कृतीतून बोलतं असं म्हणतात त्याचा अर्थही हाच आहे.
माणूस कितीही ज्ञानी असला तरी त्याला गुरू असतोच. अशा सद्गुरुची सेवा सर्वप्रकारे करणं हा त्याचा धर्म असतो. आपलं आद्यकर्तव्य हेच की आचार्यांची, आदर्श असलेल्या वडील मंडळींचीही सेवा करणं. त्यांच्याबद्दल कृतज्ञता केवळ शब्दातून नव्हे तर कृतीतून व्यक्त करणं!
‘विद्या विनयेन शोभते’ या न्यायानं अशा आचार्यसेवेसाठी अंगी नम्रता हवी. ज्ञानी माणसांकडून ज्ञान मिळवण्याची पद्धती भगवंतांनी सांगितलीय. ते म्हणतात- ज्ञान (विशेषतः) आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सर्वप्रथम खर्‍या ज्ञानी (आत्मज्ञानी) व्यक्तीचा शोध घेतला पाहिजे. ‘तत् विद्धि प्रणिपातेन परिप्रश्‍नेन सेवया|’ म्हणजे अशा ज्ञानी, अनुभवी, सद्वर्तनी व्यक्तींना आधी नमस्कार करा (प्रणिपातेन = शरणागती) नंतर आपल्या जिज्ञासेची पूर्ती करण्यासाठी विविध प्रश्‍न विचारा (परिप्रश्‍नेन) आणि नंतर (खरं तर सर्वकाळ) अशा आचार्यांची सेवा करा(सेवया.)
कठोपनिषदात मृत्युदेवता यम नचिकेताला हेच सांगतो (जे स्वामी विवेकानंदांनी जगातील सर्व मंडळींना उद्देशून सांगितलंय) – ‘उत्तिष्ठत! जाग्रत! प्राप्यवरान् निबोधत॥ उठ, जागा हो, जागा रहा अन् तुला जे ज्ञान हवंय, जे कौशल्य प्राप्त करायचंय ते ज्यांना अवगत आहे (प्राप्यवरान्) ते ज्यांनी आधीच प्राप्त केलेलं आहे त्यांच्याकडून शिकून घे. त्यांना शरण जा.
एखाद्या अर्जुनाला किंवा कर्णाला धनुर्विद्या शिकायची असेल तर त्यांनी केवळ द्रोणाचार्य किंवा परशुरामांकडे जाऊन भागणार नाही तर त्यांना (म्हणजे आपल्या गुरुंना) पूर्णपणे शरण जाऊन त्यांची सेवा (उपासना) केली पाहिजे.
एका प्रसंगात द्रोणाचार्य नदीत स्नान करत असताना एक मगर त्यांना गिळायला येते. तिच्याशी निःशस्त्र संघर्ष करताना द्रोणाचार्यांना मदतीची गरज पडते. त्यासाठी ते शिष्यांना बोलवतात. कोणीच अगदी त्यांचा पुत्र अश्‍वत्थामाही पाण्यात उतरत नाही. अर्जुनाच्या कानावर ज्यावेळी गुरुंची हाक पडते तेव्हा क्षणाचाही विचार न करता, जिवाची पर्वा न करता तो पाण्यात उडी मारून पोहत गुरुंच्या जवळ जातो. गुरू द्रोणाचार्य सर्वांना ओरडून सांगतात, ‘बघा, अर्जुनच केवळ माझा पट्टशिष्य|’ पुढे सर्वांच्या लक्षात येतं की गुरू द्रोणाचार्यांनी सर्वांची परीक्षा घेतली होती. कारण ती जिवंत मगर नसून जबड्याची हालचाल करणारं मगरीच्या आकाराचं स्वयंचलित (ऑटोमॅटिक) यंत्र होतं.
कर्णाचं उदाहरण तर आचार्योपासनेचं अंतिम वाटावं असंच आहे. गुरू परशुरामांनी त्याला सर्व शस्त्रं, अस्त्रं दिली. चालवण्याचं शिक्षणही दिलं. आपल्या या शिष्याच्या कामगिरीवर ते अत्यंत प्रसन्न होते. अखेर शिष्याला निरोप देण्याची वेळ आली. अखेरची सेवा म्हणून आचार्यांना (परशुरामांना) झोप आली असताना आपली मांडी कर्णानं त्यांच्या डोक्याखाली दिली. गुरू शांत झोपलेले पाहून कर्णाला त्यांची अशीही सेवा करता आली म्हणून अत्यंत आनंद होत होता. अशा वेळी एक किडा सरपटत आला नि कर्णाच्या मांडीला दंश करून छिद्र पाडू लागला. कर्णाला प्रचंड वेदना होत होत्या पण गुरूंची झोपमोड होईल म्हणून त्यानं मांडी यत्किंचितही हलवली नाही. प्रचंड वेदना व रक्तस्राव होत राहिला. शेवटी साचलेल्या रक्ताच्या स्पर्शानं परशुराम जागे झाले. पाहतात तो रक्ताचं थारोळं झालेलं. कर्णाला विचारल्यावर त्यानं सर्व प्रकार सांगितला. यावर प्रसन्न होण्याऐवजी परशुराम प्रचंड रागावले. त्यांनी विचारलं, ‘तू ब्राह्मण आहेस म्हणून खोटं सांगितलंस ना मला? कारण आपल्या सत्तेनं नि सामर्थ्यानं उन्मत्त झालेल्या, प्रजेवर अत्याचार करणार्‍या क्षत्रियांचं निर्दालन (नाश) केल्यापासून क्षत्रियांना शिक्षण द्यायचं नाही अशी प्रतिज्ञा मी केली होती. तू ब्राह्मण निश्चितच नाहीस कारण एवढ्या भयंकर वेदना तू सहन करू शकलास. खरं सांग.’ कर्णानं असत्य बोलल्याचं मान्य केलं. केवळ ज्ञानप्राप्तीसाठी खोटं बोललो असंही सांगितलं. आचार्यांकडून शिक्षण घेताना अशा प्रकारे पायाच असत्याचा असल्यामुळे एवढी आचार्यसेवा करूनही, आचार्यांचं खूप प्रेम प्राप्त करूनही, आचार्यांचा विश्‍वास – मिळवूनही कर्ण शेवटी आशीर्वाद मात्र प्राप्त करू शकला नाही. उलट महत्त्वाच्या प्रसंगी अस्रविद्येचा वापर करताना तुला मंत्रांचं विस्मरण होईल नि ज्याच्या वधासाठी तू जी शक्ती (अस्त्रं) राखून ठेवलेली असशील ती दुसर्‍यासाठी तुला आधीच वापरावी लागेल. असा शाप मिळाला कर्णाला. अखेर व्हायचं तेच झालं. अर्जुनासाठी राखून ठेवलेली शक्ती अर्जुनाशी अंतिम युद्ध होण्यापूर्वीच कर्णाला घटोत्कच वधासाठी वापरावी लागली.
याचा अर्थ स्पष्ट आहे- काया-वाचा-मनोभावे आचार्यांची सेवा केली पाहिजे नि अशी सेवा करताना छलकपट-असत्य यांचा आश्रय घेता कामा नये.
स्वामी रामसुखदास यांनी या संदर्भात अप्रतिम मार्गदर्शन केलंय.
आपल्या आचार्यांवर, सद्गुरुंवर संपूर्ण निष्ठा असल्याशिवाय त्यांनी शिकवलेली विद्या किंवा दिलेलं ज्ञान एक तर कळत नाही; कळलं तर वळत नाही अन् वळलं (जीवनात वापरलं गेलं नाही) नाही म्हणून फळत नाही. त्यांनी साधकानं किंवा शिष्यानं आचार्यांशी कोणत्या भावानं संबंध ठेवावेत व ज्ञानप्राप्ती करावी यासाठी दहा सूत्रांचं विवरण केलंय. ती सूत्र अशी-
१. शिष्याच्या मनात आपले आचार्य हे पूर्ण ज्ञान झालेले जीवनमुक्त सिद्धपुरुष आहेत हा बोध निरंतर जागृत असला पाहिजे.
२. ज्ञान-कर्म-भक्ती-ध्यान अशा सर्व मार्गांवर (योगांवर) आपल्या सद्गुरुंचं प्रभुत्व आहे याची जाणीव मनात सतत असली पाहिजे.
३. त्यांच्या केवळ सान्निध्यानं, संगतीनं (सत्संग), सहवासानं, आपल्याजवळ असलेल्या त्यांच्या केवळ अस्तित्वानं आपल्या सर्व शंका दूर होतात नि आपल्याला नवं नवं ज्ञान मिळतं हा विश्‍वास जिवंत असला पाहिजे. आद्य शंकराचार्यांच्या बाबतीत शिष्यांना असाच अनुभव यायचा. ‘गुरोऽस्तुमौनं व्याख्यानं शिष्यास्ते छिन्नसंशयाः’
४. आचार्यांच्या सान्निध्यात शिष्याला सतत प्रसन्नता (गुरुःप्रसाद) अन् मनःशांतीचा अनुभव आला पाहिजे. यासाठी त्याची मनोभूमिका तयार झाली पाहिजे.
५. अत्यंत महत्त्वाची आणखी एक भावना शिष्य-साधकांच्या मनात असली पाहिजे की आचार्य जे जे सांगतील व करतील ते पूर्णपणे आपल्या हिताचंच असणार आहे.
६. आदर्श आचार्य अत्यंत निरपेक्ष भावनेनं, विरक्त वृत्तीनं, आपल्याला ज्ञानदान करत असतात. त्यांना आपल्याकडून कोणत्याही वस्तूची (गुरुदक्षिणेची) अपेक्षा नाही, एवढंच काय पण शिष्यांनी आपली सेवा करावी (आचार्योपासनम्) हीही अपेक्षा त्यांची कधीही नसते.
७. त्यांच्या सर्व क्रिया-कृती-कर्मं-कार्य ही आपल्या कल्याणासाठीच असतात. कधीकधी त्यांनी केलेली कृती (केलेली शिक्षा किंवा बोललेले अपमानास्पद शब्द) वरकरणी अप्रिय वाटली तरी अंतिमतः ती आपल्या हिताचीच असते ही दृढभावना साधकांच्या मनात सदैव असावी.
८. त्यांच्या सहवासात आपल्या ध्येयपूर्तीसाठी आवश्यक ती चेतना, प्रेरणा किंवा शक्ती आपोआपच मिळते. त्यांची चैतन्यस्पंदनं आपल्याला भारून टाकतात. हा अनुभव शिष्याला सतत आला पाहिजे.
९. आचार्यांच्या विचार-उच्चार-आचार-संचार यातून आपल्यात दैवी संपत्तीचा (सद्गुणांचा, चांगल्या मूल्यांचा) विकास होऊन असुरी संपत्तीचा (दुर्गुणांचा) सतत विनाश होतोय हा विश्‍वास शिष्याच्या मनात असला पाहिजे.
१०. त्यांच्याशिवाय दुसर्‍या कोणत्याही व्यक्तीत अगदी देवदैवतातही त्यांच्यासारखी श्रेष्ठता, अलौकिकता, दिव्यता नाही अशी साधकाची ज्वलंत निष्ठा असली पाहिजे. याबरोबरच आपल्या दृष्टीतून, तर्कातून त्यांच्या बोलण्याचा वा वागण्याचा कोणताही अर्थ लावण्याचा (इंटरप्रिटेशन) प्रयत्न साधकानं चुकूनसुद्धा करता कामा नये कारण यात आचार्यांचं नव्हे तर शिष्याचंच प्रचंड नुकसान असतं.
आपण साधं सद्गुरुचं जे नित्यस्मरण करतो त्यात हा सर्व आचार्योपासनेचा भाव व्यक्त झालाय-
‘‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः|
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥
यापेक्षा संत अधिक सोप्या व प्रत्ययकारी शब्दात हेच आचार्योपासनेचं मर्म सांगतात. कबिराचे शब्द आहेत, ‘‘गुरु-गोविंद दोऊँ खडे ककि लागूँ पाय|
बलिहारी गुरुकी जॉंके गोविंद दियो बताय॥
भगवंत जे पुन्हा पुन्हा सांगतात – ‘माम् एकं शरणं व्रज|’, ‘सर्वेषु कालेषु माम् अनुस्मर युध्य च|’
यात ‘माम्’ म्हणजे मीच, मलाच असं म्हणणारा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा ‘आचार्य’च नाही का? मग त्याची उपासना करायला, त्याला शरण जायला, त्याचंच होऊन राहायला काय हरकत आहे?