आघाडीतील अडथळे

0
39

गोव्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवरून पायउतार करण्यासाठी विरोधकांची महाआघाडी खरोखर बनू शकते का हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. ही आघाडी व्हावी यासाठी काही घटकांचे प्रयत्न जरी सुरू असले तरी कॉंग्रेसला त्याला थंडा प्रतिसाद आहे. काल तृणमूलमधून लवू मामलेदार कॉंग्रेसवासी झाले तेव्हा दिनेश गुंडुराव यांनीही या वृत्ताचा इन्कार केला. अर्थात, गोवा फॉरवर्ड आणि मगोचे नेतृत्व अशा प्रकारच्या महाआघाडीस फार उत्सुक आहे. मात्र, सद्यस्थितीत तरी एकीकडे केवळ कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड एकत्र आहेत, तर दुसरीकडे तृणमूल कॉंग्रेस आणि मगोची युती आहे. कॉंग्रेसने अधिकृतपणे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेशी बोलणी चालवलेली आहेत, मात्र तृणमूल-मगो युतीशी हातमिळवणी करण्यास कॉंग्रेस अजूनही तयार नाही हीच सद्यस्थिती आहे.
या सार्‍या पार्श्वभूमीवर काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी गोव्यात भाजपचे सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कॉंग्रेसशी आघाडी करण्यासंदर्भात बोलणी सुरू आहेत असे सांगितल्याने जुन्या चर्चेला नवा ऊत येणे साहजिक आहे. पण पवार यांचा रोख बहुधा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची जी कॉंग्रेस पक्षाशी गोव्यातील आघाडीबाबत बोलणी सुरू आहेत, त्याकडे असावा. पण शेवटी पवारच ते! त्यांनी मोजके आणि मोघम बोलून खमंग राजकीय चर्चेला हवा दिली आहे. गेल्या महिन्यात ममता बॅनर्जींनी पवारांची भेट घेतली होती हे जरी खरे असले तरी गोव्यात तृणमूल कॉंग्रेसलाही या आघाडीत सोबत घेण्यात येईल असे पवार कुठेही म्हणालेले नाहीत. दुसरीकडे दिल्लीमध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची पक्षाचे गोवा प्रभारी पी. चिदंबरम आणि के. सी. वेणुगोपाल यांनी काल भेट घेतल्याने महाआघाडीच्या चर्चेचा संदर्भ त्याच्याशी जोडला जात होता, परंतु स्वतः दोन्ही नेत्यांनी त्या बैठकीत हा विषयच आला नसल्याचे सांगून स्पष्ट इन्कार केलेला आहे.
कॉंग्रेस आणि तृणमूलचे संबंध अजूनही ताणलेलेच आहेत. गेल्या ऑक्टोबरमध्ये ममता पहिल्यांदाच गोव्यात आल्या तेव्हापासून त्यांनी कॉंग्रेसच्या निर्नायकीपणानेच भाजपला देशात पाय पसरण्याची संधी मिळवून दिल्याचा आरोप करून खरडपट्टी काढली होती. तृणमूलने गोव्यात आल्या आल्या कॉंग्रेस पक्षच कमकुवत करायला सुरूवात केली. त्यामुळे कॉंग्रेसला भाजपपेक्षाही तृणमूल कॉंग्रेस हा आपला प्रमुख शत्रू वाटतो. तृणमूलला कॉंग्रेसची मते विभागण्यासाठी भाजपनेच गोव्यात उतरवले आहे हाही युक्तिवाद कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी करून झालेला आहे. देशातील खर्‍या कॉंग्रेसला एकत्र आणण्याची भाषा ममतांनी चालवली आहेच, शिवाय सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून त्या बंगाल सोडून आयपॅकच्या साथीने देशदिग्विजयाला निघालेल्या असल्यामुळे तृणमूल कॉंग्रेसची वाढ ही कॉंग्रेस पक्षाला हानीकारक ठरेल अशी त्या पक्षाला भीती आहे. शिवाय आपण देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहोत हा अहंकारही कॉंग्रेसला आहेच. गोव्यात कॉंग्रेस भले सतरावरून दोनवर पोहोचली असली तरी शनिवारी चिदंबरम यांनी ‘तृणमूल कॉंग्रेसला पाठिंबा देऊ इच्छित असेल तर मी नाही का म्हणू?’ असे कुत्सित उद्गार काढले होते ते या भलत्या अहंकाराचेच निदर्शक आहेत. तृणमूलची वाढ झाली तर देशातील आपले आधीच कमकुवत बनलेले स्थान आणखी डळमळीत होईल याची पराकोटीची भीती कॉंग्रेसला आहे. त्यामुळेच दोन्ही पक्षांमध्ये विस्तव जात नाही. मग त्यात भाजपचा फायदा झाला तरी कॉंग्रेसला सोयरसुतक दिसत नाही.
मुळात कॉंग्रेसने गोवा फॉरवर्डशीच हातमिळवणी करायला कित्येक महिने लावले. ज्या थंडपणे हो, नाही करीत करीत सरदेसाईंना झुलवत ठेवले त्यातूनच खरे तर चित्र स्पष्ट व्हायला हरकत नाही. दुसरीकडे, मगो तृणमूलच्या आसर्‍याला गेला आहे, परंतु विचारधारेचा विचार करता दोन विरुद्ध टोके आहेत. अर्थात, महाराष्ट्रात जर भाजपशी बिनसल्याने शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीला जात असेल तर गोव्यात मगो तृणमूलपाशी गेला यात आश्चर्य नाही. राष्ट्रवादीचे गोव्यातील स्थान नावापुरते आहे. पक्षाचे एकमेव आमदार चर्चिलही तृणमूलमध्ये गेलेले आहेत. परंतु राज्यातील आपले अस्तित्व राखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला कॉंग्रेसशी हातमिळवणी गरजेची आहे आणि शिवसेनेला भाजप जवळ करीत नसल्याने गाड्याबरोबर नळ्याची यात्रा त्याप्रमाणे शिवसेनाही कॉंग्रेसशी हात मिळवणार आहे. त्यामुळे आजच्या घडीस तरी तथाकथित महाआघाडी ही कॉंग्रेस गोवा फॉरवर्ड आणि झालीच तर राष्ट्रवादी व शिवसेनेपुरतीच सीमित आहे.