आगामी लोकसभेसाठी भाजपकडून तयारी सुरू

0
8

लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची काल मोठी बैठक झाली. भाजपच्या दिल्ली मुख्यालयात झालेल्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी मागच्या वेळेपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगितले. २०१९ मध्ये मागच्या निवडणुकीत हरलेल्या जागांपैकी ३० टक्के जागा जिंकल्या होत्या. आता २०२४ मध्ये हरलेल्या जागांपैकी ५० टक्के जागा जिंकायच्या आहेत, असेही शहा म्हणाले.

या बैठकीत १४४ लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी रणनीती तयार करण्यात आली, ज्या भाजपने गेल्या निवडणुकीत थोड्या फरकाने गमावल्या होत्या. यामध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप दुसर्‍या किंवा तिसर्‍या क्रमांकावर राहिलेल्या किंवा कधीतरी जिंकलेल्या मतदारसंघांचाही समावेश आहे. या जागा गटांमध्ये विभागल्या गेल्या असून, प्रत्येक गटाचे नेतृत्व एका केंद्रीय मंत्र्याच्या हाती देण्यात आले आहे. मंत्र्यांनी या मतदारसंघातील भाजपच्या स्थितीचे विश्लेषण केले असून, २०२४ च्या निवडणुकीत पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी याबाबत रणनीती बनवली आहे. कालच्या बैठकीत मंत्र्यांनी या मतदारसंघांचा सविस्तर अहवाल सादर केला.

या बैठकीला भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. संघटन महासचिव बी. एल. संतोष, सुनील बन्सल, भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, सुभाष सरकार, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, एल. मुर्गन, पंकज चौधरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी, केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश, केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर, केंद्रीय मंत्री संजीव बल्यान, केंद्रीय मंत्री बी. एल. वर्मा, अर्जुन मुंडा आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह उपस्थित होते.