आगामी निवडणुकीतही मगोशी युती कायम ः भाजप

0
89

मगो पक्षाबरोबर असलेली भाजपची युती येत्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहणार असल्याचे भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन जी महाआघाडी स्थापन करू पाहत आहेत त्या महाआघाडीचे भाजप स्वागत करीत असल्याचेही तेंडुलकर यांनी यावेळी सांगितले.

गोव्यातील जनतेवर आमचा पूर्ण विश्‍वास आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यापासून आम्ही जो विकास केलेला आहे तो जनतेसमोर असून त्यामुळे जनता आमच्या विरोधात जाणार नसल्याचे ते म्हणाले.  दरम्यान, माध्यमप्रश्‍नी सरकारने जी १७ सदस्यीय समिती नेमली आहे त्या समितीचे पक्ष स्वागतच करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वांशी सल्लामसलत करूनच ही समिती अहवाल सादर करील, असा विश्‍वासही तेंडुलकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ज्योतीर्गमय भारत योजनेसाठी भाजप कार्यकर्ते का काम करीत आहेत असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, की ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यकर्ते काम करीत आहेत. सर्व लोकांना योजनेचा लाभ मिळत असल्याचे तेंडुलकर यांनी नमूद केले. भाजपचे कार्यकर्ते ज्या प्रकारे झोकून देऊन काम करतात त्याप्रकारे सरकारी कर्मचारी काम करीत नसल्याचे तेंडुलकर यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर व सदानंद शेट तानावडे हेही हजर होते.