आंध्र प्रदेशात ५ उपमुख्यमंत्री!

0
126

>> मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा निर्णय

देशाच्या राजकीय इतिहासात आंध्र प्रदेश राज्य एक नवा पायंडा पाडणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या २५ सदस्यीय मंत्रिमंडळात एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय काल घेतला. नव्या मंत्रिमंडळाची स्थापना आज शनिवारी अमरावती येथील जाहीर सोहळ्यात होणार आहे. हे उपमुख्यमंत्री पाच विविध समाजांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी काल युवाजन श्रमिक रयतू कॉंग्रेसच्या विधीमंडळ गटाची बैठक आपल्या अमरावती येथील निवासस्थानी घेतली व त्या बैठकीत पाच उपमुख्यमंत्री नेमण्याचा निर्णय जाहीर केला. अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्य आणि कपू अशा पाच समाजांसाठी उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. आपले मंत्रिमंडळ प्रामुख्याने दुर्बल घटकातील आमदारांना प्रतिनिधीत्व देणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. अडीच वर्षांनंतर मंत्रिमंडळाची फेररचना केली जाईल असे ते म्हणाले.

याआधी चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री होते व ते अनुक्रमे कपू व मागास जातींचे प्रतिनिधीत्व करत होते. मात्र पाच उपमुख्यमंत्री नियुक्ती करण्याचा जगनमोहन रेड्डी यांचा निर्णय क्रांतीकारी प्रकारात मोडत असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात होत आहे. पाच समाजाच्या लोकांना खूश करण्याचा हा प्रयत्न असल्याचीही चर्चा आहे.