आंदोलन

0
14
  • प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

शांत स्वरूपाने नटलेल्या आंदोलनाला भडक व जहाल रूप कसे प्राप्त होते हे कुणाच्याच लक्षात येत नाही. जे हात केवळ घोषणांसाठी पुढे यायचे तेच हात बंड करायला पुढे सरसावतात आणि नंतर केवढा प्रचंड गोंधळ व हाहाकार उडतो हे जमावाच्या ध्यानी-मनी असत नाही.

आंदोलन ही एक चळवळ असते. एका माणसाचे आतल्या आत विचारांचे आंदोलन असू शकते. एकांतात माणूस बसला असताना कित्येक वेगवेगळे विचार मनात येतात. एकाच निर्णयासाठी कित्येक पर्याय आपल्या मनात थैमान घालत असतात. शेवटी दोनच पर्याय शिल्लक राहतात आणि त्यांचा एकमेकांशी संघर्ष सुरू होतो. या आंदोलनात जो पर्याय आतल्या आत जिंकतो, तोच प्रकट स्वरूप धारण करतो.

आंदोलन हे चांगल्या विचारांचे असते व वाईट विचारांचेदेखील असते. कधीकधी एकाचबरोबर संगतीने चांगले व वाईट असे मिश्र विचार मनात आंदोलन करत असतात. आता कोणाला आपले म्हणावे हे विचार करणार्‍यावर अवलंबून असते. त्याची जर मुळातच सज्जन वृत्ती असेल तर जीव गेला तरी वाईट विचारांना तो आपल्या निर्णयात स्थान देणार नाही. विचार करण्याची मुळातच जर दुर्जन प्रवृत्ती असेल तर वाईट विचारांकडे त्याची बुद्धी आकर्षित होईल. येथे आंदोलन दोन प्रवृत्तींचे असते- सत्‌प्रवृत्ती व गैरप्रवृत्ती.
सदाचाराकडे सत्‌प्रवृत्ती आकर्षित होते आणि दुराचाराकडे गैरप्रवृत्ती ओढली जाते. समाजाच्या हितासाठी आंदोलन चांगली दिशा देणारे ठरायला हवे.

अग्नी हा सुरुवातीला एका ठिणगीच्या स्वरूपात असतो व वार्‍याच्या झुळकीबरोबर तो पुढे फोफावत जातो व भव्य रूप धारण करतो. आंदोलनाचेदेखील तसेच असते. सुरुवातीला ते वैयक्तिक व एका माणसापुरते मर्यादित असते. नंतर हळूहळू समविचारी माणसे एकत्र येतात व त्या आंदोलनाला अगोदर चार माणसांचा व पुढे माणसांच्या समूहाचा आधार मिळत जातो. हा-हा म्हणता आंदोलन वेगाने पुढे जाते.

शेकडो माणसांच्या गर्दीला सहस्रो माणसांचे हात साथ देतात आणि सहस्रो माणसे त्याच आंदोलनाकडे खेचली जातात. पुढे लाखांच्या संख्येतून त्यांचा प्रवास कोट्यवधी माणसांकडे संचारत जातो. वाटेत कित्येक माणसे संपतात; पण आंदोलन संपत नाही.
आंदोलन क्रांतीकडे सरकत जाते. शांत स्वरूपाने नटलेल्या आंदोलनाला भडक व जहाल रूप कसे प्राप्त होते हे कुणाच्याच लक्षात येत नाही. जे हात केवळ घोषणांसाठी पुढे यायचे तेच हात बंड करायला पुढे सरसावतात आणि नंतर केवढा प्रचंड गोंधळ व हाहाकार उडतो हे जमावाच्या ध्यानी-मनी असत नाही.
आजपर्यंत जगात खूप आंदोलने झाली. जगाचा इतिहास हा रक्तरंजक आंदोलनांनी भरलेला आहे. फ्रेंच राज्यक्रांती घ्या किंवा अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध घ्या किंवा भारताचे १९४७ चे स्वातंत्र्य घ्या. त्यांच्या अगोदर लहान-मोठी आंदोलने आतल्या आत होऊन आवाज न करता मिटून गेलेली आहेत. दक्षिण आफ्रिकेतील आंदोलन तसेच इस्रायलचे आंदोलन व जागतिक स्तरावरचे कृष्ण-धवल अर्थात काळे व गोरे यांच्या त्वचा-वर्णावरून उभारलेले आंदोलन ही सगळी आंदोलने कोणालाच थोपवता आली नाहीत. आजदेखील ती आंदोलने जनमानसामध्ये धुमसत राहिलेली आहेत.

मायनोरेटी आणि मेजोरिटी अर्थात अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांच्यामधील संघर्षातून जन्मणारे आंदोलन कधीच संपत नाही. आज आपल्या भारत देशामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये या आंदोलनाने व्यापक स्वरूप घेतलेले आहे. निवडणुकीचे तिकीट देताना तो प्रतिनिधी कोणत्या जातीचा, धर्माचा, प्रदेशाचा, स्तराचा हे सगळेच पाहिले जाते आणि मते देतानादेखील मतदार हा सगळा भेदाभेद लक्षात घेतच असतो. सरकारी नोकर्‍या वाटताना भ्रष्टाचाराला छेद देत पुढे गेल्यावर जाती-धर्माच्या आंदोलनाला कसेच टाळता येत नाही. येथे त्या-त्या खात्यांच्या मंत्र्यांची खरी कसोटी लागते. निःपक्षपात व निःस्पृहपणा या निकषावर उमेदवारांची निवड करणे हे एक मोठे आव्हानच असते.
माणसे सामूहिक आंदोलन करण्यासाठी पुढे का येतात? कारण एकट्या-दुकट्याला सहज चिरडता येते. पण जनशक्ती जर मोठ्या समूहाची असेल तर तिला सहजासहजी टाळता येत नाही. कारण त्यांची संघटन-शक्ती फार मोठी असते. म्हणूनच आजपर्यंत कित्येक आंदोलकांनी रस्त्यावर येऊन आपली आंदोलने भडक स्वरूप देऊन, प्रसंगी हिंसाचाराचा आधार घेऊन सफल करून घेतलेली आहेत.

रिझर्व्हेशनचे आंदोलन, पगारवाढीचे आंदोलन, कर्जमाफीचे आंदोलन, विशेष सवलतींचे आंदोलन ही आंदोलने अलीकडील काळात जनसामान्यांची सहानुभूती बळकावण्यात यशस्वी झाली आहेत.

आंदोलन हे शस्त्र आणि अस्र या दोन्ही शक्तींचा वापर करते. जमावाला हाताशी धरून जेव्हा ते आक्रमण करते तेव्हा ते शस्त्र असते; व आपल्या मागण्या एकाच जागी बसून राजदरबारात फेकतच राहते तेव्हा ते अस्त्र असते. म्हणूनच शस्त्रास्त्राची दुहेरी तळपती धार आंदोलनाला नेहमीच प्राप्त झालेली असते.
नैतिक व न्यायाच्या राज्यात आंदोलनाला स्थान नसते; पण अनैतिक व अन्यायाच्या तसेच अत्याचाराच्या कारकिर्दीत आंदोलनाला वाचा फुटते. आंदोलन अडवणे हे आपल्या कारभारावर व मनोभूमिकेवर अवलंबून असते.