आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गोमंतकीय चित्रकार वामन नावेलकर (९२) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. पोंबुर्फा या जन्मगावी त्यांच्या पार्थिवावर काल दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक भाऊ, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे.
५ मे १९२९ साली वामन नावेलकर यांचा जन्म झाला. १९६२ मध्ये इस्कोला सुपिरिअर दी बेलास आट्र्समधून ते पदवीधर बनले आणि नंतर त्यांनी पदव्युत्तर पदवी देखील प्राप्त केली. त्यांनी पोर्तुगाल, मोझांबिक आणि गोव्यात चित्रकलेच्या क्षेत्रात स्वत:च्या प्रतिभेचा ठसा उमटविला होता व त्यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात अनेक प्रयोग केले. पोर्तुगालमध्ये कलेचे शिक्षण घेतल्यानंतर मोझांबिक देशात त्यांनी कलेतील पुढील वाटचाल केली. त्यानंतर गेली २५ वर्षे ते गोव्यातच स्थायिक होते. विदेशांतील पुरस्कारांबरोबरच नावेलकर यांना १९९३ साली गोवा शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळाला होता.
भित्तिचित्र, धातूकला, काष्टशिल्पमध्येही त्यांचा हातखंडा होता. त्यांना दोन वेळा गुलबेनकीयन फाऊंडेशनची फेलोशिप प्राप्त झाली होती. मोंते कार्लो आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात शाईने साकारलेल्या चित्रकृतीसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभला होता. ‘प्रोलिफिक मास्टर ऑफ लाईन’ म्हणून ते ओळखले जायचे. त्यांच्या कलाकृती जगभरातील चित्रसंग्रहालयात आहेत. ‘फ्रेलिमो’तर्फे मोझांबिकच्या मुक्ती लढ्यात सुद्धा त्यांनी भाग घेतला होता.