असोचेमच्या अहवालामुळे भाजप सरकारचे पितळ उघड : कॉंग्रेस

0
70

असोचेम या संस्थेने दिलेल्या अहवालात गोव्याच्या आर्थिक व औद्योगिक स्थितीवर प्रकाशझोत टाकला आहे. राज्याचा सर्व क्षेत्रातील विकास खुंटल्याने ताबडतोब उपाययोजना घेण्याचा इशारा त्यांनी दिला असल्यामुळे भाजप सरकारचे पितळ उघडे पडले आहे, असा दावा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी काल पत्रकार परिषदेत केला.

गेल्या साडेचार वर्षांत भाजप सरकार आपण वेगवेगळे पराक्रम केल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करीत होते. असोचेम संस्थेच्या अहवालाकडे कुणालाही दुर्लक्ष करणे शक्य नसते, सरकार कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेत असून गेल्या साडेचार वर्षांच्या काळात राज्यातील प्रत्यक्ष गुंतवणुकीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे रोजगाराची समस्या निर्माण झाल्याचे अहवालात म्हटले आहे, असे फालेरो यांनी सांगितले.
युवकांचे भविष्य अंधारात
औद्योगिक क्षेत्रात गोमंतकीय युवकांना सामावून घेतले जात नाही. या विषयावर सरकारची भूमिकाच नाही. त्यामुळे येथील शिक्षित युवावर्ग शेजारच्या राज्यात किंवा विदेशात जात आहे. सरकार यावर कधी विचार करणार, असा प्रश्‍न फालेरो यांनी केला. येथील युवकांचे भवितव्य अंधारात असल्याचे ते म्हणाले. दाबोळी विमानतळावर गेली चाळीस वर्षे काम करणारे गोमंतकीय सेवेत कायम झालेच नाहीत. विमानतळ प्राधिकरण गोमंतकीयांना तेथे थारा देत नसल्याचे सांगून मोप विमानतळ झाल्यानंतरही अशीच स्थिती निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. अन्य कोणत्याही राज्यांच्या तुलनेत गोव्यात करांचा भार मोठा आहे असे फालेरो यांनी सांगितले.