असे यशस्वी झाले लोक माहिती अभियान

0
122

– बाबाप्रसाद
केंद्र सरकारच्या पणजी येथील पत्र सूचना कार्यालयाचे लोक माहिती अभियान बार्देश गटात पर्वरी येथील क्षत्रिय मराठा समाजाच्या सभागृहात तीन दिवस आयोजित करण्यात आले होते. या अभियानात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. विविध उपक्रम व लोकनृत्य – लोककलांच्या माध्यमातून जनकल्याण योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचाव्यात हा लोक माहिती अभियानामागचा उद्देश असतो. या अभियानातून लोकाभिमुख योजना अंमलबजावणीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यादृष्टीने हे अभियान यशस्वी झाले, असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. याआधी पेडणे, मडगाव या भागात अशा अभियानांद्वारे कल्याणकारी योजनांबाबत जनजागरण करण्यात आले होते. सबंध गोवाभर विकास योजनांची वातावरणनिर्मिती होणे, जनतेला आपल्यासाठी असणार्‍या योजनांची माहिती समजावून घेणे या दृष्टीने अशा अभियानाची गरज असतेच.केंद्र सरकारने जनकल्याणकारी ज्या ज्या योजना अंमलात आणलेल्या असतात, त्या काही वेळा कागदावरच राहतात. जनतेपर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत त्या पोचतातच असे नाही. खरे तर तळागाळापर्यंत या योजना पोचल्या तरच त्याचे फायदे सर्वसामान्यांना मिळू शकतील, अन्यथा योजनांचा पाऊस पडूनही सामान्यजन कोरडेच राहतात. सरकारी योजनांबाबत सर्वसामान्य जनांत जागृती व्हावी, अधिकाधिक लोकांनी या योजनांचा लाभ घ्यावा यासाठी सर्वसामान्य, आम आदमीला या योजनांतून सहभागी करून घेतले तर योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकते. हा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून अशा स्वरुपाची अभियाने देशात सर्वत्र घेतली जातात. जनकल्याणकारी योजनांचे प्रतिबिंब सरकारच्या अर्थसंकल्पात पडत असते.
सरकार व जनता यांच्यात समन्वय घडवून आणण्याचे काम पक्षीय संघटना, स्वेच्छा संस्था, सामाजिक संस्थांनी केले तर जनकल्याणकारी योजनांना उठाव मिळेल. राजकारणाची दिशा समाजाभिमुख अशी असायला हवी. लोकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब कल्याणकारी योजनांत पडलेले असते. त्यापुढे सरकण्यासाठी विधायक, सकारात्मक वातावरणाची गरज असते. हाच अभियानामागचा उद्देश असतो. अलिकडच्या अभियानांनंतर जनतेचे केवळ जागरण, प्रबोधन झाले तरी अभियानामागचा उद्देश सफल झाला, असे म्हणावे लागेल.
केंद्र सरकारने अलीकडच्या काळात लोकाभिमुख असे निर्णय घेऊन ‘अच्छे दिन’ ची सुरुवात चांगली केली आहे. मुलींसाठी ‘बेटी बढाव बेटी पढाव’ असो किंवा अन्नधान्य व्यवस्थापनही जनतेला दिलासा देणारे असेच आहे. आवश्यक वस्तूंंच्या किंमती नियंत्रणात आणून महागाईची झळ कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेला दिलासा व विकासाभिमुख वातावरण देशभरात तयार करण्याची सुरूवात केली आहे. बटाटे व कांदे या वस्तूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणात आणून महागाईची झळ कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. कांदा व बटाट्यांचा साठा करण्यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यासाठी देखरेखीची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक वस्तूंच्या किंमतीवर देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्याच्या सूचनाही राज्य सरकारला करण्यात आल्या आहेत. एकात्मिक राष्ट्रीय ग्राहक मदत वाहिनीसुद्धा सार्वजनिक प्रशासन संस्थांमार्फत सुरू करण्यात आली आहे. अन्नधान्य व्यवस्थापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. गेल्याच महिन्याच तज्ज्ञांची उच्च समिती स्थापन करून देशातील अन्नधान्य व्यवस्थापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाची पुनर्रचना करण्याच्यादृष्टीने अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. प्रशासन गतिमानता आणून लोकाभिमुख करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून जलशुद्धी कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे. देशातील सर्व दुर्बल घटकांना बँकांत सामावून घेण्यासाठी ‘जनधन’ योजनाही देशात सर्वत्र लागू करण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या योजनांची माहिती अभियानाच्या माध्यमातून अधोरेखित झाली आहे. दुर्बल घटक सरकारी योजनांची मदत घेऊन छोटे छोटे उद्योग उभारून स्वावलंबी झालेत, होत आहेत.
छोटे प्रायोजक, बचत गट, अशा अभियानात सहभागी होऊन आपले मोलाचे योगदान देत असतात. पाककला स्पर्धा, लोकनृत्य, फुगड्या इत्यादी विविध स्पर्धांच्या आयोजनातून स्थानिक कलाकारांच्या अंगीभूत कलागुणास उत्तेजनही अशा अभियानातून मिळते. त्यांचा सहभागही अभियान यशस्वी करण्यास उपयोगी होता. तिन्ही दिवस गीत व नाटक प्रभाग, भारत सरकार याच्या श्री गणेश कला पथक व मास्टर रामा जादूगर यांनी बहारदार सादरीकरण करून केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
या अभियानात महिलांचा सहभाग लक्षणीय असाच होता. अंगणवाडीच्या एक कार्यकर्त्या सुचिता प्रसाद पर्वतकर यांनी अशा अभियानाची आवश्यकता प्रतिपादन केली. त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना, महिलांची प्रगती झाली असली तरी ग्रामीण भागातील महिलांना अजून पुरेसा वाव मिळाला नाही. अशा अभियानातून तो मिळू शकतो. स्वतःच्या कलागुणांचा अविष्कार करण्यास किंवा व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने अशी अभियाने आवश्यक आहेत. अभियानातून आनंद मिळाला, सभाधीटपणा शिकायला मिळाला. एक नवी उमेद या निमित्ताने मिळाली, अशी प्रतिक्रिया दिली. अन्य महिलांच्या प्रतिक्रिया त्यांच्यात शब्दांतः-
कांता कवळेकरः- या अभियानातून आम्ही खूप काही शिकलो. विविध प्रकारची माहिती मिळाली. विविध योजनांचे फायदे समजावून घेतले. नव्या उमेदीने जीवनात पुढे जाण्यास प्रेरणा मिळाली.
पुर्णिमा साखळकर, नविता हरमलकरः- बालकल्याणविषयक तसेच अन्य योजनांची माहिती मिळाली, ही आमच्या दृष्टीने जमेची बाजू होती.
हेमा बुगडेः- केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांची माहिती अभियानामार्फत आम्हाला मिळाली. कल्याणकारी योजनांबाबत सर्वसामान्य अनभिज्ञच असतात. त्यांच्या योजनांचे फायदे कळण्याच्यादृष्टीने अभियान उपयुक्त आहे. हे अभियान माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे.
मनीषा हळर्णकरः- तीन दिवसांच्या या अभियानात मला पुष्कळशा गोष्टी शिकायला मिळाल्या. आमच्या वस्तुंची विक्री झाली. आमच्या सारख्यांना उत्तेजन मिळण्याच्यादृष्टीने असे अभियान व्हावे.
मानसी देसाईः- या अभियानाच्या माध्यमातून आम्ही ज्या गोष्टी शिकलो त्या आम्ही सर्वसामान्यांपर्यंत पोचवू असे उपक्रम व्हायला हवेत.
सुचिता पर्वतकर यांनी उपस्थित महिलांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे मनोगत जाणून घेतले.
अशा अभियानात महिलांची सामाजिक जाणीव विकसित होते. महिलांच्या अंगचे कला नेतृत्वगुण वाढीस मिळतात. हे अभियान यशस्वी होण्यासाठी पत्र सूचना कार्यालयाचे संचालक गुरुनाथ पै, त्यांचे सहकारी समरजीत ठाकूर, अनुराधा चोडणकर, विजया गावकर, रेषा घाडी, राजन शेट्ये, अनिल कोंडविलकर, गोपाळ नाईक, गोपाळ छेत्री, संतोष घाडी यांचेबरोबरच नेहरू युवा केंद्राचे कालिदास घाटवळ, शिरिष लवंदे, क्षेत्रिय प्रसिद्धी अधिकारी मालखेडकर पवार तसेच स्थानिक कार्यकर्ते विश्‍वनाथ हळर्णकर, विनंती कासार, अंगणवाडीच्या सेविका, बचतगटाच्या पदाधिकारी, सरपंच राधिका सावंत, भाऊसाहेब राणे, मुख्य सेविका रोशन नाईक, कार्यक्रम अधिकारी सरिता पाटील, नागेश सरदेसाई, विठ्ठल सामंत, स्नेहा वस्त, अनुबा कुवेस्कर, श्रीहरी आठले, सुधीर सबनीस, शंखवाळकर इ. च्या सहकार्यामुळे या अभियानाची यशस्वी सांगता झाली. सकारात्मक वातावरण निर्मिती व प्रबोधन जनजागरण ग्रामीण भागांपर्यंत होणे हाच तर अभियानामागचा हेतू असतो. हा हेतू सफल झाला असे म्हणावयास हरकत नाही.