अशोभनीय

0
227

अमेरिकेच्या राजधानीमध्ये काल तेथील संसदेच्या संयुक्त अधिवेशनामध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठीची औपचारिक मतमोजणी सुरू असताना मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी जे झुंडशाहीचे हिंसक प्रदर्शन केले ते सदैव स्वतःच्या महान लोकशाही परंपरेचा अभिमान मिरवीत आलेल्या अमेरिकेसाठी अत्यंत लाजीरवाणे आहे. निवडणुका येतात नि जातात. सत्तापालट होतच राहतात. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये असे सत्तांतर सुरळीतपणे आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये होणे अपेक्षित असते. निवडणुकीतील पराभव मान्य करून जेव्हा एखादा नेता निमूटपणे पायउतार होतो तेव्हाच त्याच्या पदाची शान राखली जात असते. गेल्या तीन नोव्हेंबरच्या निवडणुकीत ज्यांचा पराभव स्पष्ट झाला ते डोनाल्ड ट्रम्प मात्र अजूनही आपला पराभव मान्य करायला तयार दिसत नाहीत. काल त्यांच्या समर्थकांनी दंगल घडवली तेव्हा देखील त्यांना घरी परतण्यास सांगतानाच ‘तुमी आमच्यासाठी खूप खास आहात’ असे सांगून या दंग्यांना अप्रत्यक्षपणे चिथावणी देण्याचेच काम ट्रम्प यांनी केले.
वास्तविक अमेरिकी इलेक्टोरल कॉलेजसाठी निवडणूक होताच त्यातून आपला पराभव स्पष्ट झालेल्या ट्रम्प यांनी जनतेचा तो कौल निमूट स्वीकारून येत्या वीस जानेवारीस त्या पदावरून सन्मानाने दूर व्हायला हवे होते. परंतु झालेली निवडणूक प्रक्रियाच कशी बोगस आहे आणि त्यात कसे गैरप्रकार झाले आहेत हे आपल्या समर्थकांवर ठसवण्याचा आटापिटा तर त्यांनी आजवर चालवलाच, शिवाय सर्व प्रांतांंमधील न्यायालयांमध्ये आणि अगदी त्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील याचिका दाखल करून नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या निवडीमध्ये अडथळे निर्माण करण्याचा पदोपदी प्रयत्न केला. ज्या प्रकारे ट्रम्प गेल्या दोन महिन्यांत वक्तव्ये करीत आले आहेत, ते पाहिल्यास अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षपदावरील व्यक्तीला असला पोरकटपणा शोभतो का हा प्रश्न कोणाच्याही मनात आल्याशिवाय राहणार नाही.
काल अमेरिकेच्या राजधानीत जे घडले ते अभूतपूर्व होते. अमेरिकी कॉंग्रेस आणि सिनेट असलेल्या इमारतीमध्ये दंगेखोर घुसले. अगदी त्या दोन्ही इमारतींना जोडणार्‍या जिन्यापर्यंत पोहोचले. संसदेच्या सदस्यांना तळघरात धाव घ्यावी लागली. विषारी वायूच्या हल्ल्याच्या भीतीने गॅस मास्क लावावे लागले. ही तर अत्यंत गंभीर अशी सुरक्षाविषयक त्रुटी आहे. दहशतवादाचा सर्वोच्च धोका असलेल्या अमेरिकेसारख्या देशामध्ये अशा प्रकारची सुरक्षाविषयक गंभीर त्रुटी राहणे हे केवढे घातक ठरू शकते याची कल्पनाही करवत नाही. पोलीस यंत्रणा या दंगेखोरांना का रोखू शकली नाही, तेथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था का नव्हती आदी प्रश्नांची पुढे चौकशी नवे प्रशासन करीलच, परंतु या सर्व प्रकारातून डोनाल्ड ट्रम्प यांची आधीच मलीन झालेली छबी आता पुरती डागाळली आहे. आपली सत्ता राखण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धडपडणार्‍या एखाद्या हुकूमशहासारखे ट्रम्प वागत आहेत. त्यांच्या या वागण्याने खजिल झालेल्या त्यांच्याच अनेक अधिकार्‍यांनी काल आपापल्या पदांचे राजीनामे सादर केले. ट्रम्प यांच्या येत्या २० जानेवारीच्या औपचारिक सत्तांतरापूर्वीच त्यांना त्या पदावरून हटवता येईल का याचीही चाचपणी सध्या चालली आहे. दोन वर्षांपूर्वी ट्रम्प यांच्यावर महाभियोग आणला गेला होता आणि डेमोक्रॅटस्‌च्या बहुमताखालील खालच्या संसदेने तो संमतही केला होता, मात्र वरच्या रिपब्लिकनांच्या बहुमतातील सिनेटने तो तेव्हा फेटाळला होता. पुन्हा ट्रम्प यांच्यावर अशा प्रकारचा महाभियोग आणला जाऊ शकतो किंवा अमेरिकेच्या संविधानाच्या २५ व्या घटनादुरुस्तीच्या आधारे उपराष्ट्रपतींकरवीही त्यांना हटविता येऊ शकते का याचीही चाचपणी सध्या चालली आहे. अशा मानहानीकारक रीतीने सत्तेवरून पायउतार झाल्याची इतिहासात नोंद करून घेण्यापेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पदाची शान राखून स्वतःहून दूर होणेच अधिक योग्य ठरेल. ज्यो बायडन यांच्या नेतृत्वावर आता कालच्या मतमोजणीनेही शिक्कामोर्तब केलेले आहे. त्यामुळे नव्या नेतृत्वाखालील सरकारची सत्तारूढ होण्याची वाट मोकळी करून देऊन जबाबदार विरोधकाची सक्रिय भूमिका ट्रम्प बजावू शकतात. त्यांनी तसे करणेच अंतिमतः त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या हिताचे ठरू शकेल. ज्यो बायडन यांना जनतेचा कौल मिळाला आहे. सत्ता हाती घेऊन आपल्या ध्येयधोरणांनुसार देश चालवण्याचा त्यांना अधिकार प्राप्त झालेला आहे. ट्रम्प यांनी दंगली घडवून त्यात आडकाठी आणणे सर्वस्वी गैर आहे. अवघे जग अमेरिकेकडे एक आदर्श लोकशाही राष्ट्र म्हणून पाहात आले आहे. तेथील खुलेपणाचे आणि आविष्कारस्वातंत्र्याचे सदैव कौतुक करीत आले आहे. मात्र, सध्या तेथे जे काही चालले आहे ते या सार्‍या लोकशाही परंपरेला बट्टा लावणारे आणि अशोभनीय आहे!