अवयव प्रत्यारोपण यंत्रणेसाठी स्पेनशी कराराचा विचार ः राणे

0
140

अवयव प्रत्यारोपणाच्या यंत्रणेसाठी स्पेनशी सामंजस्य करार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील एक डॉक्टर अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी स्पेनला भेट देणार आहे. स्पेनने अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन राज्य सरकारच्या प्रस्तावाची माहिती दिली जाणार आहे. स्पेनशी अवयव प्रत्यारोपणासंबंधी करार करण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळेल, असा विश्‍वास आरोग्यमंत्री राणे यांनी व्यक्त केला.
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये खास माता-बालक विभाग सुरू केला जाणार आहे. या विभागासाठी ५० ते ६० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली. सरकारी इस्पितळामध्ये रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. नव्याने उभारण्यात येणार्‍या सुपर स्पेशालिटी इस्पितळामध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.