अल कायदाकडून भारताविरुद्ध जिहादची घोषणा; अलर्ट जारी

0
108

अल कायदा या खतरनाक दहशतवादी संघटनेने एक व्हिडिओ जारी केला असून यात भारतात शाखा उघडण्याची घोषणा करताना जिहादाचे सूतोवाच केले आहे. केंद्र सरकारने व्हिडिओची गंभीर दखल घेऊन देशभरात अलर्ट जारी केला असून सर्व राज्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ खरा असल्याची शहानिशा गुप्तचर खात्याने (आयबी) केल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी उच्चपदस्थ सुरक्षा अधिकार्‍यांसोबत तातडीची बैठक घेऊन चर्चा केली.
इराकमधील आयएसआयएस दहशतवादी संघटनेचा उदय झाल्यानंतर अल कायदाचा प्रभाव घटत असून त्यामुळे दक्षिण आशियात नव्या नेमणुकांसाठी संघटनेने मोर्चा वळवल्याचा अंदाज आहे. संघटनेच्या भारतात उपस्थिती व कारवायांविषयी गुप्तचर संघटना कसून तपासाला लागली असून एक दोन दिवसात सरकारला अहवाल सादर करणार आहे.
यू ट्यूब व अन्य सोशल मिडियाद्वारे जारी केलेल्या व्हिडिओत संघटनेचे नेते अल जवाहिरी म्हणतो, अल कायदाची ‘कायदत अल जिहाद’ शाखा भारतात स्थापन करण्यात आली असून ही शाखा भारत, बांगलादेश, ब्रह्मदेशात ‘जिहाद’चा लढा चालवेल. भारतात इस्लामी राज्य स्थापन करण्याचे व भारतीय उपखंडात शरीयत कायदा लागू करायचे स्वप्न आहे. जवाहिरीने सांगितले की, ब्रह्मदेश, बांगलादेश, आसाम, गुजरात, अहमदाबाद, आणि काश्मीरच्या आमच्या बंधूंनी लक्षात ठेवावे तुम्हाला आम्ही विसरलेलो नाही, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढा देणार आहोत.
गोव्याला विशिष्ट अलर्ट नाही
दरम्यान, व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर गोव्याला विशिष्ट अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र गोवा किनारी राज्य असल्याने खबरदारीची उपाययोजना केली आहे. गर्दीच्या ठिकाणी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक के. के. व्यास यांनी दिली. सर्व पोलीस स्थानकांना सतर्क राहण्यास सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.