अल्पसंख्यकांविरोधातील घटनांबद्दल आर्च बिशपांकडून चिंता व्यक्त

0
102

सामाजिक सलोख्यासंदर्भातील काळजी घेण्याचा संदेश
देशात अल्पसंख्यांकाना धोका निर्माण होईल अशा प्रकारच्या होत असलेल्या घटनांकडे सर्वांचे लक्ष असून या प्रकारांमुळे देशाचे नुकसान होईल, असे सांगून आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव यांनी चिंता व्यक्त केली आहे.येथील बिशप पॅलेसमध्ये नाताळ सणानिमित्त आयोजित केलेल्या नागरी स्नेह मेळाव्यात आर्चबिशप बोलत होते. भारत हा सर्वधर्मसमभावाचे तत्व मानणारा देश आहे. देशात विविध धर्मांचे, भाषांचे संस्कृतीचे लोक वास्तव्य करून आहेत. सामाजिक सलोख्याला धोका निर्माण होईल, अशा घटना घडू नयेत म्हणून प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. येशू ख्रिस्तांनी मानवतेचा मंत्र दिला होता. या मंत्राचा प्रसार करण्याचे काम चर्चेतर्फे केले जाते, असे फेर्रांव यांनी सांगितले.
गोवा सरकारने जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियरच्या अवशेष दर्शन कार्यक्रमासाठी चांगले सहकार्य दिले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या कार्यक्रमासाठी पायाभूत सुविधा तयार केल्याने भाविकांची चांगली सोय होऊ शकली. नवे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचेही याबाबतीत चांगले सहकार्य मिळाले, असे बिशपनी सांगितले. या कार्यक्रमास राज्यपाल मृदूला सिन्हा, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, अन्य मंत्री, विरोधी पक्षातील आमदार व समाजाच्या सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.