अल्पवयीन कारचालकाने काकी-पुतण्याला उडवले

0
6

>> चिखलीतील अपघातात ४३ वर्षीय महिला ठार; दुचाकी व कारच्या धडकेत युवक गंभीर जखमी

एका अल्पवयीन कारचालकाच्या निष्काळजीपणामुळे चिखली येथे झालेल्या अपघातात एक ४३ वर्षीय महिला जागीच ठार झाली, तर १७ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. या अपघातात रिना गोन्साल्विस हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पुतण्या वेलिन गोन्साल्विस (१७) हा या अपघातात गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना काल दुपारी पावणे दोन वाजता चिखलीतील सेंट अँथनी नीव चॅपेल क्रॉसजवळ घडली. रिना या आपला पुतण्या वेलिन याला एमईएस महाविद्यालयातून चिखली येथे घरी नेत असताना हा अपघात घडला.

वास्कोचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वास्कोहून कुठ्ठाळीच्या दिशेने जाणार्‍या कारने (क्र. जीए-०३-झेड-५१५९) ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणार्‍या एका दुचाकीला चिखलीतील सेंट अँथनी नीव चॅपेल क्रॉसजवळ जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीचालक रिना गोन्साल्विस ही महिला जागीच ठार झाली, तर दुचाकीवर मागे बसलेला तिचा पुतणा वेलिन गोन्साल्विस हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने चिखली येथे उपजिल्हा इस्पितळात हलविण्यात आले. या धडकेत दुचाकीच्या आणि कारच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. अपघातानंतर दोघांनाही इस्पितळात दाखल करण्यात आले; मात्र तेथे रिना गोन्साल्विस हिला मृत घोषित करण्यात आले. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, रिना हिचा पती गेल्याच महिन्यात विदेशातून गोव्यात येऊन पुन्हा विदेशात गेल्याची माहिती चिखली येथील रहिवाशांनी दिली.
या अपघात प्रकरणी पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील नाईक पुढील तपास करीत आहेत.