अल्टिमेट टेबल टेनिस लीग १४ पासून

0
93

अल्टिमेट टेबल टेनिस लीग स्पर्धा १४ जूनपासून खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत भारताच्या राष्ट्रकुल यशातील भागीदार व जगातील इतर आघाडीच्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची नामी संधी टेबलटेनिस प्रेमींनी मिळणार आहे.

भारतीय खेळाडूंमध्ये मणिका बत्रा, मौमा दास, मधुरिका पाटकर, शरथ कमल, अँथनी अमलराज, साथियान गणशेखरन, हरमीत देसाई, सानिल शेट्टी, पूजा सहस्रबुद्धे व सुतिर्था मुखर्जी हे आघाडीचे खेळाडू अडीच आठवडे चालणार्‍या या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवणार आहे. विदेशी खेळाडूंमध्ये सायमन गॉझी (वर्ल्ड नं. १२) व हॉंगकॉंगचा दो होई केम (वर्ल्ड नं. १३) हे प्रमुख आकर्षण असतील. आपापल्या देशात अव्वल असलेले एकूण १७ खेळाडू, २४ ऑलिम्पिकपटूंना पाहणे म्हणजे पर्वणी ठरणार आहे.

स्पर्धेच्या शुभारंभी मोसमाप्रमाणेच या मोसमात सहा फ्रेंचायझींचा सहभाग असेल यात एम्पॉवरजी चॅलेंजर्स, दबंग स्मॅशर्स टीटीसी, फाल्कन्स टीटीसी, महाराष्ट्र युनायटेड, आरपी-एसजी मेव्हरिक्स व वॉरियर्स टीटीसी यांचा समावेश असेल. १५ दिवस चालणार्‍या लीग टप्प्यात प्रत्येक फ्रेंचायझी एकमेकांविरुद्ध एकदा खेळेल. पुणे, दिल्ली व कोलकाता येथे हे सामने होणार आहेत. उपांत्य व अंतिम फेरी कोलकाता (१ जुलै) येथे होईल.

पुण्यातील बालेवाडी संकुलात महाराष्ट्र युनायटेड व विद्यमान विजेता फाल्कन्स टीटीसी यांच्यात शुभारंभी सामना रंगणार आहे. युनायटेड संघात अँथनी अमलराज क्रिस्टियन कार्लसन (वर्ल्ड नं. १८) व रोमानियाची एलिझाबेथा सामारा (वर्ल्ड नं. १८) यांच्यासारखे खेळाडू आहेत तर फाल्कन्समध्ये सानिल शेट्टी, स्वीडनची माटिल्डा एकहोम (वर्ल्ड नं. ३०) यांचा समावेश आहे. लीग फेरीनंतर पहिल्या व चौथ्या स्थानावर राहणारा संघ २९ जून रोजी पहिला उपांत्य सामना खेळेल.
दुसर्‍या व तिसर्‍या स्थानावरील संघात ३० रोजी दुसरा उपांत्य सामना होणार आहे. स्पर्धेसाठी एकूण ३ कोटींचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. विजेत्या संघाला १ कोटी रुपये, उपविजेत्याला ७५ लाख रुपये तर उपांत्य फेरीत पराभूत उभय संघांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.