Home बातम्या ‘अर्पण’ व्याख्यानमालेचे कौतुकास्पद आयोजन

‘अर्पण’ व्याख्यानमालेचे कौतुकास्पद आयोजन

0

सुरेंद्र शेट्ये, म्हापसा

अर्पणव्याख्यानमालेचे पुष्प पहिले. स्वच्छ, कार्यक्षम प्रशासन, खच्चून भरलेले सभागृह. दाटीवाटीने बसलेले दर्जेदार श्रोते, माजी सनदी अधिकारी, समाजसेवेचा दांडगा अनुभव असलेले. समर्पित व्याख्यात्यांना पाचारण करून अर्पणहे नाव सार्थ करणारी रोटरी क्लब ऑफ म्हापसाने पणजीत आयोजित केलेली सदर व्याख्यानमाला व तीही मराठीतून हे सगळेच सुखावणारे. अगदी निमंत्रण पत्रिकेपासून सगळाच शाही थाट व वैचारिक प्रबोधन पुण्या मुंबईला धोबीपछाड देणारे. श्री. गुरुप्रसाद पावसकरांसारख्या नव्या पिढीकडून व तेही रोटरी क्लबसारख्या संस्थेकडून व्हावे, हे सगळेच विस्मयचकीत करणारे. ऍड. मनोहर उसगावकरांचे मराठीतील भाषण, ‘फोमेन्तोसारखे प्रायोजक व मांडवीसारखे हॉटेल, हे सगळेच देवदुर्लभ. जागतिक भाषेत निमंत्रणे व ती सुद्धा अशी काही झकास म्हणून सांगू! त्यामुळेच तर सगळा एलाईट वर्ग उपस्थित राहिला, हे काय कमी झाले? योजकस्तत्र दुर्लभः म्हणतात, परंतु शारदा व्याख्यानमाला आयोजित करणारे गुरुप्रसाद पावसकर अध्यक्ष म्हटल्यावर त्यांनी घडवून आणलेल्या आणखी एका ज्ञानयज्ञाचे तोंड भरून कौतुक करावेसे वाटले म्हणून हा पत्रप्रपंच. मूर्ती छोटी, पण उच्च अभिरूची व कामाचा उरक म्हणा, झपाटा म्हणा, उत्साह आणि जोम वाखाणण्यासारखा. कुठे आनंद निकेतनसारखी संस्था उभी करा, तर त्यांच्यासाठी पैसे उभे करण्यासाठी ट्रेड फेअरचे आयोजन करीत असतानाच या व्याख्यानमालेचे आयोजन करून त्यांनी आपल्यातील धडाडीचे दर्शन घडवले खरे.

आमंत्रित वक्ते सगळेच तोडीस तोड. सलामीला साक्षात् अविनाश धर्माधिकारी. नावातच केवढा भारदस्तपणा. विचारांत सडेतोडपणा. काय ते घणाघाती वक्तृत्व. जोडीला साधेपणा. सामाजिक बांधिलकी. प्रवाहाविरुद्ध जाऊन काही तरी करून दाखवण्याची जिद्द, तळमळ व प्रत्यक्ष कार्यरत असल्याने अनुभवांच्या बोलांना मिळालेली कार्य कर्तृत्वाची जोड. शब्दांना प्राप्त झालेली धार. कायद्याचा व्यासंग. शासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव. वडिलांचा वारसा व मौलिक विचार.

व्याख्यानाचा विषय पण कसा अगदी आजच्या बजबजपुरी माजलेल्या सरकारी कारभाराच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारा. मा. अण्णा हजारेंचे आताच झालेले आंदोलन. त्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचारावर बोलणे म्हणजे ऐकणार्‍यांच्या ह्रदयाला भिडणारा विषय. कानांत प्राण आणून सगळ्यांनी त्यांचे विचार ऐकले. सुराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क हे सांगणारे त्यांचे वक्तृत्व. समाजात चाललेल्या विघातक गोष्टींवर प्रकाश टाकीत मनामनांवर समर्पकपणे ठसविण्याचे त्यांचे कौशल्य, विविध भाषांवरचे प्रभुत्व, दिले जाणारे दाखले, उदाहरणे. सगळेच विचार अगदी विचारपूर्वक घासून पुसून स्वच्छ करून मनाला तंतोतंत पटावेत असे. भारतीय राज्यघटना, तिची इत्यंभूत माहिती, कलमवार केलेले विवेचन, देशाला भेडसावणार्‍या विविध प्रश्नांचा उहापोह. अगदी समान नागरी कायद्यापासून धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली चाललेला अल्पसंख्यकवाद, लांगूलचालन ह्या सर्व गोष्टी ओघाने येत राहिल्या. आपण भारताचे नागरिक प्रथम व मग त्या त्या प्रांताचे निवासी ही भूमिका. घटनाकारांचे श्रेष्ठत्व अधोरेखित करतानाच त्यांचे एकूण आपल्या घटनेवरचे भाष्य कायद्याचे ज्ञान ते तरी जाणून असणे. आज माहिती हक्क कायद्याखाली प्रशासनाला जेरीस आणण्यास फार उपयोगी पडू शकते हे त्यांचे आग्रहाचे सांगणे. अण्णांच्या आंदोलनाचा ओझरता उल्लेख, परंतु लोकपालांना शिक्षा देण्याची तरतूद नसेल तर डोंगर पोखरून उंदीर काढण्यागत फसगत होणार हे लक्षात आणून देणे. मग लांच देणे एखाददुसर्‍याने थांबवून काही होणार नाही हे निक्षून सांगणे. वरून तो वेडा ठरण्याची शक्यता वगैरे तसेच लोकपाल आल्याने जादूची कांडी फिरल्यागत सगळे कुटुंब आलबेल होईल ह्या भ्रमात राहू नकाचा दिलेला इशारा. अण्णांच्या आंदोलनाचा अनुभव तेवढा चांगला नसल्याचे ओझरतेच सांगणे. आंदोलने फसल्याने मग आंदोलनांवरचा विश्वास उडणे. नंतर राजकीय पक्षांच्या निधिसंकलनावर केलेले भाष्य. तेही वर्मावर बोट ठेवणारेच होते. कोटी कोटींच्या घरात निवडणुकीत उमेदवारांवर होणारा खर्च, टी. एन. शेषन यांनी घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेची लागणारी वाताहत, खासदार राजू शेट्टींचे एकमेव उदाहरण, मतदारांच्या नाममात्र पैशातून निवडणूक जिंकणे, तसेच सत्ताधारी कॉंग्रेस पक्ष फक्त एकदाच स्व. राजीव गांधींच्या काळात ५०.५ टक्के मते मिळवता झाला या सगळ्या गोष्टी, त्यांचा अपवाद हा आम्हा सामान्यजनांना अचंबित करणारा होता. भारतीय भाषांचे महत्त्व सांगताना कोकणी मराठीचे द्वैत नाहक उभे झाल्याचेही ते म्हणाले. गोव्याच्या हरित सौंदर्याचे वर्णन करताना गोव्याच्या प्रेमात पडल्याचे त्यांनी कबूल केले. त्यांचे भाषासौंदर्यही ह्रदयस्पर्शी होते. इंग्रजीवरचे प्रभुत्वही अस्खलित. एकूण व्यक्तिमत्त्वच लोभसवाणे, विचार उत्तुंग, मांडणी चपखल, श्रोत्यांना भारावून टाकणारे. जाणिवा समृद्ध करणारे. ओघवत्या शैलीत घटनाकारांचे मोठेपण विशद करताना आदरपूर्वक आलेला रा. स्व. संघाचा ओझरता उल्लेख मला सुखावून गेला. एकूण अर्पणव्याख्यानमालेची सुरूवात तरी लक्षवेधक, मनाची पकड घेणारी ठरली व पुढच्या दोन समर्पित ध्येयवेड्या वक्त्यांबद्दलची असोशी वाढवणारी ठरली.