अर्धवेळ नेता

0
35

कॉंग्रेस पक्ष ज्यांच्याकडे आशेने बघतो आहे, ते युवा नेते राहुल गांधी आपल्या एकेका चुकीच्या कृतीमुळे सदैव टीकेचे आणि टिंगलटवाळीचे धनी होताना दिसत असतात. नेपाळमधील एका नाईटक्लबमधील त्यांचा एक व्हिडिओ नुकताच काहींच्या हाती लागला आणि काल त्यावरून कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली. राहुल आपल्या एका मैत्रिणीच्या लग्नासाठी नेपाळला गेलेले आहेत, तेथील हा व्हिडिओ असल्याची सारवासारव कॉंग्रेसने चालवली आहे, मात्र, एकूण व्हिडिओतील दृश्ये ही लग्नसोहळ्याची दिसत नाहीत, तर एखाद्या नाईटक्लबची दिसतात आणि एका चिनी चेहरापट्टीच्या महिलेसोबत ते गोंधळलेल्या स्थितीत आजूबाजूला बघताना दिसत आहेत. त्यामुळे आधीच विरोधकांच्या रडारवर असलेल्या राहुल गांधींचा फजितवडा करण्यासाठी या व्हिडिओचा उपयोग त्यांच्या विरोधकांकडून झाला यात नवल नाही. त्यांच्यासोबतची ती महिला कोण याची शोधमोहीम आता सुरू होईल. शिवाय जिच्या लग्नासाठी ते नेपाळला गेले तिचा पती चिनी उद्योगपती आहे. त्यामुळे एकूणच राहुल यांना अडचणीत आणणारा हा व्हिडिओ आहे.
राहुल गांधी सीएनएन या दूरचित्रवाणी वाहिनीच्या एकेकाळच्या पत्रकार सुमनिमा उदास यांच्या विवाहसोहळ्यानिमित्ताने नेपाळला गेलेले आहेत असा खुलासा कॉंग्रेसने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या तीन राष्ट्रांच्या दौर्‍यावर आहेत. त्यावर ‘देश संकटात असताना साहेब विदेशांत फिरत आहेत’ अशी कुत्सित टीका कॉंग्रेसने नुकतीच केलेली होती. पण पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची भूमिका मांडण्यासाठी विदेश दौर्‍यावर आहेत. ते व्यक्तिगत मौजमजा करण्यासाठी गेलेले नाहीत हा मोठा फरक आहे. प्रत्येकाला आपले वैयक्तिक आयुष्य असते. आपण काय करावे, कुठे जावे, कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि नेत्यांनाही खासगी आयुष्य आहेच. परंतु नेते असल्याने समाज त्यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षाही निश्‍चित करीत असतो. राहुल यांच्या व्हिडिओमध्ये त्यांची नाईटक्लबसदृश्य ठिकाणची उपस्थिती वगळल्यास तसे आक्षेपार्ह काही नाही, परंतु एखादी चोरी पकडावी अशा प्रकारे हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राहुल गांधींनी कोठे जावे, काय करावे हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. परंतु एकीकडे आपला पक्ष संकटात आहे, फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे, तारणहाराची प्रतीक्षा करतो आहे, देशामध्ये महागाईसारखे प्रश्न ऐरणीवर आहेत, दंगे उसळत आहेत. अशा वेळी प्रमुख विरोधी पक्षाचा एक जबाबदार नेता म्हणून सक्रियपणे सरकारविरोधात मांड ठोकून उभे राहून जनतेला स्वतःप्रती आणि स्वतःच्या पक्षाप्रती विश्वास देणे तर दूरच, उलट अशा प्रकारे वैयक्तिक मौजमजेत व्यस्त असल्याचे चित्र निर्माण होणे त्यांच्या आणि पक्षाच्या प्रतिमेसही मारक ठरणारे आहे हे नाकारता येणार नाही. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा त्यात मारल्या गेलेल्या एनएसजी जवान संदीप उन्नीकृष्णनच्या कुटुंबीयांचे अश्रूही वाळण्याआधी तेव्हा कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदावर असलेले राहुल गांधी आपला मित्र समीर शर्मा यांच्या विवाहाच्या निमित्ताने दिल्लीबाहेरील एका फार्महाऊसमध्ये पहाटे पाच वाजेपर्यंत पार्टी करण्यात दंग होते. तेव्हाही त्यांची अशीच छीः थू झाली होती. एखाद्या वेळेस अचानक एखाद्या प्रश्नावर भूमिका घेऊन उभे राहायचे, जनतेचे लक्ष वेधायचे, देशाच्या अपेक्षा उंचवायच्या आणि बघता बघता अचानक देशाबाहेर सुटीवर निघून जायचे असा प्रकार राहुल यांनी आजवर अनेकदा केला आहे. राजकारण हे असे अर्धवेळ वावरण्याचे क्षेत्र नव्हे. त्यामध्ये झोकून द्यावे लागते. अहोरात्र काम करावे लागते, जनतेचा विश्वास कमवावा लागतो. अनेकांचे अवघे आयुष्य त्यात खर्ची पडले आहे, तेव्हा कुठे यश हाती लागले आहे. राहुल यांना वारसाहक्काने जरी पक्षाचे नेतेपद लाभलेले असले तरी ते टिकविण्यासाठी शेवटी वैयक्तिक करिष्माच लागेल. आजवर ज्या ज्या निवडणुका कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या, त्यामध्ये पक्षाला दारूण अपयशच आलेले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर २०१९ मध्ये पक्षाचे अध्यक्षपद सोडून देण्याची पाळी त्यांच्यावर आली होती. पक्षाच्या २३ नेत्यांनी पक्षाध्यक्षांना पत्र लिहून संघटनात्मक बदलांची केलेली मागणी, त्यानंतरच्या वादळी बैठका, लवकरच होऊ घातलेल्या संघटनात्मक निवडणुका ही सगळी पार्श्वभूमी विचारात घेतली, तर राहुल गांधींनी पक्षामध्ये अधिक सक्रिय होण्याची आणि सध्याच्या र्‍हासापासून त्याला वर काढण्यासाठी पुढाकार घेण्याची ही वेळ आहे. ही जबाबदारी नको असेल तर त्यांनी अधिकृतपणे पक्षापासून दूर तरी व्हावे. सदान्‌कदा अर्धवेळ राजकारणाचा पोरखेळ पुढे चालवू नये.