- डॉ. सोमनाथ कोमरपंत
माधव जूलियनांच्या ‘अर्थो हि कन्या परकीय एव’ या कवितेत पित्याची भावना तत्सदृश असली तरी आपल्या मुलीची आता ताटातूट होणार आहे ही व्यथा अधिक प्रमाणात व्यक्त झाली आहे. कवितेच्या परिणामाच्या दृष्टीने ही कविता भिन्न आहे.
अर्थो हि कन्या परकीय एव
(वृत्त ः देवप्रिया)
बाळ जा! तप्ताश्रु हे येथेंच ढाळूं दे मला,
जा गडे, कां हात आतां घालिसी माझे गळां?
आग्रहें तूझ्याच घेई दूध मी, याने परी
शांत होई काय हा जो डोंब चित्तीं पेटला?
तें प्रसूतीचे न ठावें दुःख यासाठींच का
लागती जीवास कन्यादान-दुःखाच्या कळा?
वाटतें लक्ष्मीची कोणी ने हृदींची चोरुनी
दान मीं केलें जरी मोठा करूनी सोहळा!
तूज पुत्राच्या ठिकाणीं मानिलें मोहून मीं
कष्टलों की या जगीं लागोत ना तूतें झळा!
सासरीं तुझ्या अतां मी वागणें चोरापरी-
सांगशी कांहीं तरी लाडांत कीं ‘‘तेथें चला’’
तूं स्मृती मंत्प्रीतीची- आतां न तूं माझी अशी.
जागच्या जागींच मी चिंतेंत तूझ्या वेगळा.
बाळ जा! निष्काम सेवा सासरीं सौख्यें करी,
कां न मातेची अशा कन्येस ती साधे कला?
अश्रु कां नेत्रीं तुझ्या सौभाग्यसम्राज्ञी मुली?
देख भावी स्वर्ग- माझा तोड, जाऊं दे लळा!
रम्यरंगीं स्वर्ग तो अश्रूंतुनी भासे जसा
तो गिरी वृष्टींतुनी सौवर्ण तेजानें भला
पूस डोळे, हास बेटा! आणि जातांना असा
चुंबनाने गोड संपो वास तूझा येथला.
ऐक! जा! हाकारितें त्या मंडपीं कोणी तुला
राहणे आशास्मशानीं यापुढे मीं एकला
- माधव जूलियन
‘महाराष्ट्र-रसवंती’च्या तिसर्या भागातील ‘विकारदर्शन’ या गटात माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांची ही कविता आहे. त्यांच्यासारख्या प्रख्यात कवीची मराठी काव्यरसिकांस ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. ‘रविकिरण मंडळा’च्या ऊबदार वातावरणात त्यांची कवित्वशक्ती बहरली. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुपेडी होते. कवित्व हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता. भावनाप्रधानता हा त्यांच्या कवितेचा स्थायी भाव होता. त्यांचे कवितेतील कार्यदेखील चतुर्विध प्रकारचे आहे. त्यांनी स्फुट कविता लिहिली. खंडकाव्ये लिहिली. उमर खय्यामच्या रुबायांचे त्यांनी तीनवेळा तीन प्रकारे ‘उमरखय्यामकृत रुबाया’, ‘द्राक्षकन्या’ आणि ‘मधुलहरी’ या नावांनी भाषांतर केले. ‘काव्यचिकित्सा’ हा काव्यसमीक्षापर ग्रंथ लिहिला. अनेक फारसी वृत्ते त्यांनी मराठीत आणली. मराठीतील छंदशास्त्रावर ‘छंदोरचना’ हा बृहदग्रंथ लिहून मुंबई विद्यापीठाची डी.लिट्. ही पदवी प्राप्त केली. १९३६ साली जळगावला भरलेल्या महाराष्ट्र साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष झाले. फर्ग्युसन कॉलेज आणि राजाराम कॉलेज यांसारख्या नामवंत शिक्षणसंस्थांमध्ये त्यांनी फारसी व इंग्रजीचे अध्यापन केले. नामवंत प्राध्यापक म्हणूनही त्यांनी कीर्ती संपादन केली. ते मनस्वी वृत्तीचे होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील भावनाप्रधानता प्रस्तुत कवितेतही पुरेपूर उतरली आहे.
‘अर्थोऽ हि कन्या परकीय एव’ या माधव जूलियन यांच्या कवितेची पार्श्वभूमी विशद करणे जरूरीचे आहे. या कवितेच्या जन्माविषयीची एक आठवण माधवरावांची पत्नी कै. लीलाबाई पटवर्धन यांनी आपल्या ‘आमची अकरा वर्षे’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकात सांगितली आहे- ‘‘एक दिवस आमच्या लग्नातल्या काही हकीकती आम्ही बोलत बसलो होतो. तेव्हा माधवरावांना सहज सांगितले की, ‘मंगलाष्टके सुरू झाली आणि बाबा मंडपातून निघून गेले.’ त्यांना फार वाईट वाटले. कन्यादान करताना त्यांनी आपल्या मनावर ताबा ठेवला होता. तरीसुद्धा शेवटी त्यांना अश्रू आवरेनात. जरा वेळाने बाबांचे इंदूरचे स्नेही रा. न. शं. रहाळकर यांनी मला हाक मारून सांगितले, बाबांच्याजवळ जरा जाऊन बस, त्यांना दूध वगैरे काही दे.’’ याच प्रसंगावर माधवरावांनी ‘अर्थोऽ हि कन्या’ ही कविता लिहिली.
कवीच्या मानसात काव्यनिर्मितिपूर्व काळात असा काहीतरी चेतक घटक घडावा लागतो. माधव जूलियनांच्या मनात भावनांदोलने चालू असतानाच समांतरप्रक्रियेने कालिदासाच्या अभिज्ञानशाकुन्तलाच्या चौथ्या अंकातील पुढील श्लोक स्मरणोज्जीवित झाला असण्याची शक्यता आहे. येथे काश्यप उद्गारतात ः
अर्थो हि कन्या परकीय एव
तामद्य संप्रेष्य परिग्रहीतुः|
जातो ममायं विशदः प्रकामं
प्रत्यर्पितन्यास इवान्तरात्मा॥
कन्या हे दुसर्यांचेच धन आहे. आज तिला पतीकडे पाठविल्यामुळे, एखाद्याची ठेव त्याला परत केल्यावर जसा आनंद व्हावा, असा माझ्या अंतरात्म्याला पराकोटीचा आनंद झाला आहे.
माधव जूलियनांच्या ‘अर्थो हि कन्या परकीय एव’ या कवितेत पित्याची भावना तत्सदृश असली तरी आपल्या मुलीची आता ताटातूट होणार आहे ही व्यथा अधिक प्रमाणात व्यक्त झाली आहे. कवितेच्या परिणामाच्या दृष्टीने ही कविता भिन्न आहे.
एका मातृविहीन मुलीच्या विवाहाच्या मंगलाक्षता पडल्यानंतर ती दुःखावेगाने बाजूला जाऊन बसलेल्या बापाच्या गळ्याला मिठी मारते त्यावेळी आसवे गाळणारा बाप तिला म्हणतो, ‘‘बाळ, जा आता! मला आता माझे तप्त अश्रू मोकळेपणाने गाळू दे. आता उगाचच गळ्यात हात कशाला घालतेस? तू दिलेल्या दुधाने माझ्या चित्तवृत्तीतील डोंब शमेल काय? मला हे प्रसूतीचे दुःख माहीत नव्हते म्हणून का देवाने मला या कन्यादानदुःखाच्या कळा दिल्या? माझी लक्ष्मी कोणी माझ्यापासून हिरावून घेतलेली आहे असे मला वाटायला लागलेले आहे. तुला मी पुत्राच्या ठिकाणी मानले होते आणि हा मोठा सोहळा घडवून आणला. जरी या जगात मी कष्टलो तरी त्या झळा तुला लागू नयेत.
तुझ्या सासरी मी यापुढे गेलो तर मला चोराप्रमाणे वावरावे लागणार आहे. तू माझ्या प्रीतीची स्मृती होतीस. पण तू आता माझी नाही आहेस! जा तू आता! जागच्या जागी मी आता असा वेगळा आहे. तू आता सासरी जा आणि तेथे सार्यांची निष्काम सेवा कर.
हे सौभाग्यसम्राज्ञी मुली, मातेची ही कला कशी काय बरे साधत नाही? तुझ्या डोळ्यांतून हे अश्रू का बरे आले?
माझ्यापासून तू आता दूर जाण्याचा प्रयत्न कर. अधिक लळा लावू नकोस. भविष्यकालीन स्वर्ग बघ. सुवर्णतेजाने भरलेला पर्वत जसा वृष्टीतून भासतो तसा तो दिसायला लागेल. डोळे पूस, बेटा हस आता. आजपासून तुझा येथील सहवास संपला. मला मात्र माझ्या आशास्मशानात यापुढे एकट्याने राहणे भाग आहे.’’
पितृवात्सल्याच्या उत्कट भावना माधव जूलियनांनी परमनप्रवेश करून येथे व्यक्त केल्या आहेत.