अर्थसंकल्पीय अधिवेशनात ७४१ प्रश्‍नांचा अंतर्भाव

0
105

विधानसभेच्या येत्या २३ ते २७ दरम्यानच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण ७४१ प्रश्‍न असतील. त्यापैकी २५० प्रश्‍न हे तारांकित असल्याचे सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी काल सांगितले.या अधिवेशनात ३ खासगी विधेयके व पाच खासगी ठराव मांडण्यात येणार आहेत. अधिवेशनाची सुरवात २३ रोजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या अभिभाषणाने होणार आहे. २४ रोजी तारांकित व अतारांकित प्रश्‍न तसेच २४ रोजीपासून अभिभाषणावर चर्चा व आभार प्रदर्शन असा कार्यक्रम असेल.
८०% प्रश्‍न ऑनलाईन
यंदा अधिवेशनासाठी जे तारांकित व अतारांकित प्रश्‍न आलेले आहेत त्यापैकी ८० टक्के प्रश्‍न हे ऑनलाईन आले असल्याचे आर्लेकर यांनी सांगितले. गेले विधानसभा अधिवेशन हे पूर्णपणे ऑनलाईन व पेपरलेस पद्धतीने घेण्यात आले. यंदा त्यात आणखी सुधारणा घडवून आणण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यंदा आमदारांना त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची त्यांना छापील प्रत (हार्डकॉपीच्या स्वरुपात) मिळेल याची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या अधिवेशनात ती सोय नव्हती, असे ते म्हणाले.