अयोध्येत ‘गोवा भवन’साठी प्रयत्न ः मुख्यमंत्री

0
7

मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक घेतले रामललाचे दर्शन

अयोध्येत गोव्यातील भाविकांच्या सोयीसाठी गोवा भवन बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. उत्तर प्रदेश सरकारने गोवा सरकारला अयोध्येत जमीन उपलब्ध केल्यानंतर गोवा भवन बांधण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अयोध्येत श्री रामललाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री, काही आमदार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अयोध्येत श्री रामललाचे काल दर्शन घेतले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी श्री रामलला मंदिरात सपत्नीक पूजा केली. आम्ही अयोध्येत गोव्याच्या नागरिकांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. गोव्यातील दोन हजार भाविक श्री रामललाचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत. हे केवळ राम मंदिर नाही तर ‘राष्ट्र मंदिर’ आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवदर्शन योजनेखाली राज्यातील भाविकांना एप्रिलनंतर अयोध्येत आणण्यात येणार आहे. अयोध्येत गोमंतकीयांसाठी भवन उभारण्याचा मानस आहे. उत्तर प्रदेश सरकारने आम्हांला अयोध्येत जमीन दिल्यानंतर गोवा भवन बांधण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.